पाला पाचोळा कलात्मकता प्रदर्शनाचे उद्घाटन Green Hills Group – World Environment Day
पर्यावरण कि विकास हा नेहमी द्विधा निर्माण करणारा मुद्या असून विकासाला पर्यावरणीय चेहरा प्राप्त करून दिल्यास विकास आणि पर्यावरणीय समतोल साधता येईल असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि माजी आयपीएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केला.
गेल्या २३ वर्षांपासून पुणे परिसरातील ६ टेकड्यांवर सुमारे ८० हजार झाडे लावून त्यांची पूर्ण काळजी घेऊन पुण्याचे हवेचे प्रदूर्षण कमी करण्यात सक्रिय योगदान देणाऱ्या ग्रीन हिल्स ग्रुप, Green Hills Group पुणे महानगरपालिका आणि नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जून ते शनिवार दिनांक ६ जून या कालावधीत बालगंधर्व रंग मंदिर कलादालनात “पालापाचोळ्या पासून कलानिर्मिती, कलात्मकता आणि पालापाचोळ्याचे विविध उपयोग” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी दळवी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे मनपा पर्यावरण विभागाचे सह आयुक्त माधव जगताप हे उपस्थित होते. तसेच ग्रीन हिल्स ग्रुपचे अतुल वाघ आणि नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटी संस्थेच्या अध्यक्षा श्यामला देसाई, एनएससीसीचे सदस्य आशिष संकपाळ आणि ग्रीन हिल्स ग्रुपचे माजी अध्यक्ष संजय आठवले हे उपस्थित होते.
दळवी यावेळी म्हणाले, आपण हवा पाणी, ध्वनी आदी प्रदूषणामुळे त्रस्त आहोत त्याचे उत्तर निसर्गाकडेच असून मानव जातीच्या सर्वांगिण विकास आणि संरक्षणासाठी पर्यावरण सातत्याने पूरक भूमिका निभावत आला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून विकास साधण्याचे संतुलन आपणांस सांभाळता येणे आवश्यक आहे. बोडक्या टेकड्या हिरव्या गार होणे ही आपली गरज आहे.
माधव जगताप यावेळी म्हणाले, पर्यावरणीय काम हे पांडुरंगाच्या पालखित सहभागी होण्यासारखे असून आपण सारे पर्यावरणीय दिंडीतील वारकरी आहोत. ज्याप्रमाणे सर्व अडीअडचणींवर मात करत वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणा पर्यंत पोहोचतो त्याच भक्ती भावाने आपणांस पर्यावरणीय वारीत सहभागी होऊन अंतिम ध्येय गाठायचे आहे .
प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ८ या कालावधीत पर्यावरण प्रेमी पुणेकरांसाठी हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामुल्य प्रवेश आहे. पर्यावरणीय प्रदूर्षण कमी करण्यासाठी पालापाचोळ्याकडे नागरीकांनी वेगळ्या पद्धतीने पहावे हा प्रदर्शन आयोजना मागील मुख्य हेतू आहे. प्रदर्शनात पालापाचोळा आणि काड्यांच्या उपयोगाने निर्माण करण्यात आलेल्या कलाकृती, नैसर्गिक रंगांचा उपयोग करून बनविण्यात आलेले पेंन्टिंग म्युरअल्स, Sculptures, तसेच नारळाच्या झावळ्या, पालापाचोळा आणि इतर पर्यावरणीय घटकांच्या साह्याने बनविण्यात आलेल्या २० कलाकारांच्या सुमारे ८० हून अधिक कलाकृती मांडण्यात आलेल्या आहेत.
प्रदर्शन पहायला येणाऱ्यां लहान मोठ्या थोरांना पालापाचोळ्या पासून कलाकृती निर्मितीचा आनंद घेता यावा म्हणून प्रदर्शनात पालापाचोळा आणि पूरक नैसर्गिक घटक आणि साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जेणेकरून नवनिर्मितीच्या आनंदासह प्रदर्शन पाहचला येणाऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढेल. या प्रदर्शना निमित्त पर्यावरणाशी संबंधित विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्यास प्रदर्शनातच एक फुल झाड बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे . तसेच प्रदर्शना दरम्यान रोज सायंकाळी ४ ते ६ या कालावधीत प्रदर्शनात सहभागी कलाकार “ड्राय फ्लॉवर” कलाकृती प्रत्यक्ष साकारणार आहेत . प्रदर्शनात पर्यावरणासाठी काम करणारे आदर्श व्यक्तिंचा सचित्र आणि सखोल अभ्यासपूर्ण माहिती मांडण्यात आली आहे.
प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्याचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग वाढावा म्हणून प्रदर्शन पहायला येणाऱ्या प्रत्येक पर्यावारण प्रेमींना एक रोप भेट म्हणून देण्यात येणार आहे. भेट मिळालेल्या रोपाचे त्या त्या व्यक्तिने पुढील वर्षाच्या पर्यावरणदिना पर्यंत संवर्धन आणि जतन करून पुढील वर्षीचे प्रदर्शन पहायला आल्यावर संस्थेस परत द्यायचे . संस्थेतर्फे त्या पूर्ण वाढ झालेल्या रोपाचे पुण्यातील टेकड्यांवर पुर्नरोपन करून संस्थेतर्फे त्या व्यक्तिच्या नावाने त्या रोपाला टॅग लावून त्या रोपाचे वृक्षात रूपांतर होण्या पर्यंत संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. प्रदर्शनात पुणे परिसरातील पर्यावरणीय विषयांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या कामाची माहितीचा प्रचार प्रसार करण्यासाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या प्रदर्शनांद्वारे उपलब्ध स्टॉल्सवर पालापाचोळ्यापासून घरगुती पद्धत्तीने खत निर्माण करण्यापासून गृहनिर्माण सोसायटी पातळी पर्यंत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प मांडण्यात आले आहेत. देवराई संकल्पनेवर आधारित जगातील २० देशांतील संकल्पना आणि त्यांचा देवराई संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन याचे सचित्र मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे.
नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटी संस्थेच्या अध्यक्षा श्यामला देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ग्रीन हिल्स ग्रुपचे अतुल वाघ यांनी आभार मानले .
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.


