वळवाच्या पावसात फुलणारं मे फ्लॉवर
वळवाच्या पावसाची हजेरी आणि मान्सूनचा पाऊस लवकर येणार असे संकेत देणारं एक वैशिष्ट्यपूर्ण फुल तुम्हाला माहिती आहे का.. फुटबॉसारखं गोल दिसणारं हे फुल अनेकांच्या कुड्यांमध्ये सध्या उमललं आहे. फुलप्रेमी लोक याला मे फ्लॉवर, फुटबॉल लिली, ब्लड लिली या नावांनी ओळखतात. शास्त्रीय भाषेत ‘स्कॅडॉक्सस मल्टिफ्लोरस’ (Scadoxus multiflorus) या नावाने हे फूल ओळखले जाते.
कुंडीत वाढणाऱ्या या वनस्पतीच्या एकाच भक्कम दांडीवर अनेक लहान-लहान नाजूक फुले एकत्र येऊन याचा एक गोलाकार चेंडूसारखा आकर्षक गुच्छ तयार होतो, जो लांबूनही लक्ष वेधून घेतो. या फुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण वर्षातून केवळ एकदाच, आणि तेही साधारणपणे मे महिन्याच्या मध्यात किंवा वळवाच्या पहिल्या पावसाच्या सरी पडल्यानंतर फुलते.
कडक उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत असलेल्या याच्या कंदांमधून (Bulbs) पावसाची चाहूल लागताच अचानक एक दांडी वर येते आणि अवघ्या काही दिवसांत हे फूल पूर्ण आकाराने उमलते. हे फूल झाडावर साधारणपणे एक ते दोन आठवडे टिकून राहते.
आफ्रिकतून आलयं भारतात..
हे फूल मूळचे आफ्रिका खंडातील, प्रामुख्याने उष्णकटिबंधीय भागातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, बगिचांमध्ये, घरांच्या गच्चीत गॅलरीत सहज बघायला मिळते. या फुलाने भारतीय हवामानाशी उत्तम प्रकारे जुळवून घेतले आहे. नर्सरीमध्ये याचे कंद सहज उपलब्ध होतात आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या मातीत ते लावता येतात. या वनस्पतीला फार मोठ्या कुंडीची किंवा रोज खूप देखभालीची गरज नसते. फूल सुकल्यानंतरही याचे कंद मातीत सुरक्षित राहतात आणि पुढील वर्षी मे महिन्यात पुन्हा न चुकता अंकुरून फुलतात.
हे फूल दिसायला जेवढे आकर्षक आहे, तेवढेच याचे कंद काहीसे विषारी असतात; त्यामुळे घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असल्यास ही कुंडी सुरक्षित अंतरावर ठेवावी, असे अभ्यासक सांगतात
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.