मान्सूनचे रहस्य उलगडतेय; जमिनीखालील ओलावाही ठरवतो पावसाचा अंदाज
पुणे: भारतीय मान्सूनचा विचार केला की डोळ्यासमोर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, ढग आणि वारे यांचे चित्र उभे राहते. मात्र, मान्सूनचा खरा खेळ केवळ आकाशातच नाही तर जमिनीवर आणि जमिनीखालीही चालतो, असे एका महत्त्वाच्या संशोधनातून समोर आले आहे. भारतातील हवामान संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार मातीतील ओलावा, जमिनीचे तापमान, वनस्पती आच्छादन आणि बाष्पोत्सर्जन यांसारख्या भूमी-पृष्ठीय प्रक्रिया मान्सूनच्या पावसावर लक्षणीय परिणाम करतात.
‘मौसम’ या भारतीय हवामान विभागाच्या प्रतिष्ठित संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात भारतीय उन्हाळी मान्सून आणि जमिनीतील प्रक्रियांमधील परस्परसंबंधांचा सखोल उहापोह करण्यात आला आहे. नुकतीच याबद्दलची माहिती आयएमडी तर्फे समाज मध्यमावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांच्या मते, समुद्राच्या तुलनेत जमिनीची रचना अधिक विविध आणि गुंतागुंतीची असते. त्यामुळे विविध प्रदेशांतील मातीचा प्रकार, आर्द्रता आणि वनस्पतींचे प्रमाण स्थानिक पावसाच्या स्वरूपावर परिणाम करू शकते.
मान्सूनच्या काळात सूर्यप्रकाशामुळे जमिनीवरील पाणी बाष्पीभवन होते. झाडेही बाष्पोत्सर्जनाद्वारे वातावरणात आर्द्रता सोडतात. ही अतिरिक्त आर्द्रता वातावरणात जाऊन ढग निर्मितीस हातभार लावते. त्यामुळे एखाद्या प्रदेशातील मातीतील ओलावा आणि वनस्पती आच्छादन हे स्थानिक पावसाच्या तीव्रतेवर परिणाम करू शकतात, असे संशोधकांनी नमूद केले आहे.
या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे भारतासाठी High-Resolution Surface Dataset विकसित करण्याची गरज. अनेकदा हवामान अंदाज मॉडेलमध्ये जमिनीशी संबंधित माहिती कमी तपशीलवार असते. त्यामुळे पावसाचे अंदाज चुकू शकतात. संशोधकांनी अधिक सूक्ष्म माहितीचा वापर केल्यास मान्सूनविषयक हवामान मॉडेल्सची अचूकता वाढू शकते, असे दाखवून दिले आहे.
विशेष म्हणजे, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर या संशोधनाचे महत्त्व आणखी वाढते. वाढते तापमान, बदलणारे जमीन वापराचे स्वरूप, जंगलतोड आणि शेती पद्धतीतील बदल यामुळे मातीतील आर्द्रतेवर परिणाम होत आहे. परिणामी भविष्यात मान्सूनच्या स्वरूपातही बदल होण्याची शक्यता आहे.
भारतातील शेती, जलसंपदा आणि अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस नेमका कसा पडतो आणि त्यामागे जमिनीची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे समजून घेणे भविष्यात अधिक अचूक हवामान अंदाज आणि जलव्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मान्सूनचे रहस्य केवळ ढगांमध्ये नसून मातीच्या कणांमध्येही दडलेले आहे, हे या संशोधनाने अधोरेखित केले आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.