ज्ञानगंगा अभयारण्यातील व्याघ्र संवर्धन अधिक सक्षम व्हावे, जैवविविधतेत वाढ व्हावी आणि अभयारण्याचा नैसर्गिक अधिवास समृद्ध व्हावा, यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून मादी वाघिणीचे खामगाव – बोथा येथील ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वी स्थलांतरण करण्यात आले असून अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ज्ञानगंगा अभयारण्यात दुसरा वाघ दाखल झाल्याने वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
‘मोना’ वाघिणीला काल रात्री उशिरा ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे तिच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ही संपूर्ण प्रक्रिया पहाटे सुमारे ५.३० वाजेपर्यंत काळजीपूर्वक पार पाडण्यात आली.
“मोना” वाघिणीला खामगाव मतदार संघातील माटरगाव डॅम परिसरात सोडण्यात आले. “धुरंधर” वाघाच्या केवळ २ की.मी अंतरावर मोना वाघिणीला सोडण्यात आले.
या सर्व घटना क्रमाचे प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) यशवंत नागुलवार, चेतन राठोड सहायक वनसंरक्षक वन्यजीव अकोला, वनपरिक्षेत्र अधिकारी लोखंडे, सावळे व शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे व त्यांचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चमू यांच्या उपस्थितीत हे स्थलांतरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
यापूर्वी ‘धुरंदर’ या नर वाघाचे पुनर्वसन करण्यात आले होते व आता ‘मोना’ च्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक व्याघ्र प्रजननाला चालना मिळण्यास, जैवविविधता अधिक समृद्ध होण्यास तसेच वन्यजीवांचा अधिवास अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. भविष्यात वन्यजीव पर्यटनालाही याचा निश्चितच लाभ होणार असून, ज्ञानगंगा अभयारण्याच्या संवर्धनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल खामगाव मतदारसंघाच्या पर्यावरणीय समृद्धीत मोलाची भर घालणारे ठरणार आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.