सह्याद्रीतल्या अंजनीची भुरळ
सह्याद्रीतल्या अंजनीची भुरळ

सह्याद्रीत भटकंती करताना तुम्हाला ही फुले कधी दिसली आहेत का, सोशल मीडियावर सध्या या फुलांचे फोटो शेकडो लाइक्स मिळवत आहेत. या फुलांचे नाव आहे अंजनी. आपल्या सह्याद्रीच्या म्हणजेच पश्चिम घाटातील आकर्षक फुलांमध्ये अंजनीचा आवर्जून उल्लेख केला जातो. चला तर मग यावेळी जाणून घेऊ या अंजनीची माहिती….

पश्चिम घाटात भटकंती करताना साधारण जानेवारीनंतर अंजनीची फुले फुलायला लागतात. जांभळ्या, तर कधी मोरपंखी, फिकट गुलाबी रंगांची रेखीव, नाजूक फुले म्हणजे निसर्गाच्या कलाकुसरीचा जणू चमत्कारच.

अंजनीचे शास्त्रीय नाव Memecyclon Umbellatum. पश्चिम घाट प्रदेशनिष्ठ असणारा हा वृक्ष निमसदाहरीत वनांमध्ये आढळतो. हा सदाहरीत वृक्ष ३ मी. पर्यंत वाढतो. याची पाने जाड, गुळगुळीत व लंबगोलाकार असतात. साल जाड व मऊ असते. फेब्रुवारी ते जून दरम्यान याला फळे व फुले येतात. फुले गुच्छामध्ये निळसर गुलाबी रंगाची येतात. फळे गोलाकार गुलबस रंगाची असून कालांतराने गडद जांभळ्या रंगाची बनतात.

Anjani Memecyclon Umbellatum
फोटो गौरी इनामदार यांच्या कडून साभार

अंजनीला आपल्या प्रांतरचनेप्रमाणे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. इंग्रजी भाषेत त्याला Delek air tree किंवा Ironwood tree, मराठीमध्ये अंजनी, हिन्दी मध्ये अंजन, काया, कन्नड भाषेत आराचारे, आराचाटे,अलमारू, उडीतल्ली, अल्ली आणि हुलीसोप्पु तर तेलगू मध्ये मंडी, मल्याळम मध्ये कांजवू आणि ओरिया भाषेत नेमारू नावाने ओळखले जाते      

Anjani Memecyclon Umbellatum
फोटो गौरी इनामदारयांच्या कडून साभार

झुडूप (shrub) प्रकारातील या झाडाला सुमारे १ सेमी लहान जांभळ्या फुलांचे गुच्छ तयार होतात. ही झाडे वर्षातून एकदा किंवा दोनदा बहरतात आणि तो देखावा अतिशय मोहक असतो. फळे लहान (सुमारे १ सें.मी.) व हिरवी असतात, पिकल्यावर गडद जांभळ्या रंगाची बनतात. झाडाचे साल पातळ असते. अंजनी हे Singapore Rhododendron (Melastoma Malabathricum) सारख्याच कुळातील आहे.  हे झाड सुंदर तर आहेच, पण उपयुक्तही आहे. घरे आणि बोटी बांधण्यासाठी लागणारे कडक लाकूड यातून मिळते. पानांमधून पिवळा रंग काढता येतो आणि साल जखमांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते.

हेही वाचा: जादाव पेयांग – दी फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया

अंजनीची फुलं दिसणारी ठिकाणं: ताम्हीणी, सुधागड, भीमाशंकर , भोरगिरी, आंबा घाट , वासोटा, राधानगरी, दाजीपूर, फणसांड, भैरवगड, कोकणातील देवराई लगतची जंगल, चांदोली, राजगड, या व्यतिरिक्त सह्याद्री मधील बहुतांश डोंगर वाटावर

या व्यतिरिक्त भटकंतीमध्ये तुम्हाला ही फुलं कुठे आढळली असतील तर ठिकाणासह तुमचा अनुभव या बातमीच्या शेवटी Comment मध्ये नक्की शेअर करा .

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment