Kirloskar Vasundhara 2024: ग्रीन कॉलेज क्लिन कॉलेज स्पर्धा
Kirloskar Vasundhara 2024: ग्रीन कॉलेज क्लिन कॉलेज

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करून त्यांना पर्यावरण रक्षणाच्या प्रक्रीयेत सहभागी करून घेणाऱ्या Kirloskar Vasundhara आयोजित ‘ग्रीन कॉलेज क्लिन कॉलेज’ स्पर्धेत कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला.  

किर्लोस्कर वसुंधराच्यावतीने आयोजित ‘ग्रीन कॉलेज क्लिन कॉलेज’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर गोखले इंस्टिट्युटचे उपकुलगुरु अजित रानडे, किर्लोस्कर वसुंधराचे फॅसिलीटेटर आनंद चितळे, केपीसीएलचे, जन. मॅनेजर बीएसएस हेल्थ आणि सीएसआर – ओएचसी डॉ. सुरेश मिजार आणि महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते. 

या स्पर्धेत कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजने प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक (विभागून) मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, गणेशखिंड, पुणे आणि आत्मीय युनिव्हर्सिटी, गुजरात, तृतीय क्रमांक (विभागून) एसयूबीएन थिऑसॉफीकल वूमन्स कॉलेज, होसपेटे, कर्नाटक आणि मारवाडी युनिव्हर्सिटी, राजकोट, चौथा क्रमांक जेएसपीएमचे राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडे, पुणे, पाचवा क्रमांक डीएसटीएस मंडलचे कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर, सहावा क्रमांक सिल्व्हर ओक युनिव्हर्सिटी, अहमदाबाद आणि सातवा क्रमांक सीएचएमई सोसायटीचे डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज, नाशिक यांनी मिळवला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ. सुरेश मिजार, सतीश खाडे आणि ईशा व्यवहारे यांनी काम पाहिले. 
यावेळी बोलताना अजित रानडे म्हणाले की, माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने पर्यावरण संवर्धनात कितीसा फरक पडणार आहे, असा विचार न करता एक एक करून एकत्रित प्रयत्नांव्दारे पर्यावरण संवर्धनाची गुढी उभारली जाईल, असा आशावाद प्रत्येकाने बाळगला पाहिजे. रिड्यूस, रिमूव्ह आणि रियूज या संकल्पनांबरोबर पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या गोष्टींना रिफ्यूज करायला देखील आपण शिकले पाहिजे.

यावेळी बोलताना आनंद चितळे म्हणाले की, किर्लोस्कर वसुंधराची सुरूवात सन 2007 मध्ये पुण्यातून झाली. याला उत्तम प्रतिसाद मिळू लागल्यानंतर आम्ही किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल संपूर्ण देशभर आयोजित करण्यास सुरूवात केली. किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हे काम सुरू झाले. यामुळे पर्यावरणप्रेमी, कलाकार, विद्यार्थी यांना पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अंतर्गत आम्ही ‘ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज’ हा उपक्रम घेतला. तसेच ऑनलाईन किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल देखील आयोजित केला होता. त्याला भारतातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाविषयी जनजागृती होत असल्याचे दिसत आहे. 

यावेळी बोलताना वीरेंद्र चित्राव म्हणाले की, ‘ग्रीन कॉलेज क्लिन कॉलेज’ ही आता एक चळवळ झाली आहे. विद्यार्थी, व्यवस्थापन समिती, प्राचार्य आणि प्राध्यापक यांच्या संयुक्त प्रयत्नातून कॉलेज परिसरात अनेक नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात आणि त्यांचे सादरीकरण या स्पर्धेत केले जाते. करोना काळातील दोन वर्षांमध्ये देखील अनेक महाविद्यालयांनी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाविद्यालयीन संघांनी आपले सादरीकरण केले. आता तर ही स्पर्धा महाराष्ट्राच्या बाहेर देखील पोहोचली आहे. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या युगात पर्यावरण विषयक उपक्रमात विद्यार्थी ज्या उर्जेने आपले सादरीकरण केले, त्यातून या उपक्रमाचा उद्देश साध्य झाल्यासारखे वाटते.

डॉ. सुरेश मिजार यांनी परिक्षकांच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अंजली राजू यांनी केले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment