Chukrasia Tabularis रगत वडा - All That Glitters is not Gold
रगतवडाची झाडं आली धोक्यात Chukrasia Tabularis – All That Glitters is not Gold

लोकप्रिय ठरलेल्या पुष्पा या चित्रपटामुळे रक्तचंदनाचे झाड अलीकडेच चर्चेत आले आणि त्यातून अनेक संभ्रमही निर्माण झाले. रक्तचंदनाच्या झाडाच्या तस्करीची ओळख लोकांना झाली, मात्र रक्तचंदनाचे झाड कसे ओळखायचे याची माहिती नसल्याने त्याचा फटका रगत वडा Chukrasia Tabularis या झाडाला बसला आहे. अज्ञानामुळे सध्या लोक रगतवडाच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे हॉर्नबीलचा अधिवास धोक्यात आलाय.

Great Hornbill

ही गोष्ट आहे कोकणातील चाफवली गावातील.  रत्नागिरीमध्ये विविध गावांमध्ये हॉर्नबीलच्या संवर्धनाचे उल्लेखनीय काम करणारे प्रतीक मोरे यांनी ‘निसर्गरंग’ च्या ही बाब लक्षात आणून दिली. प्रतीक मोरे हे हॉर्नबील पक्ष्याच्या अधिवासाचा, त्यांच्या वसतिस्थानांना संरक्षित ठेवण्यासाठी काम करत आहेत. यासाठी त्यांनी हॉर्नबील राहत असलेल्या झाडांना दत्तक घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मात्र, या उपक्रमात त्यांच्यासमोर नवीन अडसर आलाय तो म्हणून रक्तचंदनाचे झाड आणि रगत वडा या झाडांमधील फरक ओळखण्याचे अज्ञान. या दोन्ही झाडांमध्ये काही साम्य असल्याचा फायदा घेत काही हजार रुपयांचे मोल असलेले रगतवडाचे झाड सध्या रक्तचंदनाचे असल्याची खोटी माहिती देऊन कोट्यवधी रुपयांचे असल्याचे भावसले जाते आहे.

हेही वाचा : Adopt a Nest, Save Great Hornbill

रगतवडा या स्थानिक नावाने ओळखले जाणाऱ्या झाडाला शास्त्रीय भाषेत Chukrasia Tabularis या नावाने ओळखले जाते. समृद्ध निसर्गाचे प्रतीक असलेल्या धनेश (हॉर्नबील) पक्ष्यांचे हे आवडते झाड. त्याची फळे खाण्यासाठी धनेश पक्षी अनेकदा या झाडावर रेंगाळतात. त्यामुळे हे झाड वाचविणे गरजेचे आहे. या पूर्वीही या झाडाला रक्तचंदन समजून तोडण्याचा प्रयत्न झाला होता. आताही असे प्रयत्न होऊ शकतात. ज्या वृक्षाची लाकडाच्या गिरणीतील किंमत काही हजार रुपये आहे, त्याचे खोड फक्त लाल असल्यामुळे रक्त चंदन ठरवून त्याची किंमत कोट्यवधी रुपये ठरवणे म्हणजे तस्करांना निमंत्रण देण्यासारखे आहे. चुकीची माहिती दिल्यामुळे वर्षानुवर्षे टिकाव धरून राहिलेला, अनेक पावसाळे बघितलेला आणि शेकडो पक्ष्याप्राण्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेला वृक्ष बळी तर पडणार नाही….?, अशी भीती प्रतीक मोरे व्यक्त करतात. त्यामुळे सध्या सोशल मीडियासह स्थानिक लोकांच्या व्हॉटस् अप ग्रुपवरून ते रगतवडाला संरक्षण मिळावे यासाठी जागृती करत आहेत.

All That Glitters is Not Gold ही म्हण इथे अगदीच लागू पडत आहे ..

रक्तचंदन शास्त्रीय नाव Pterocarpus Santalinus

रगत वडा शास्त्रीय नाव Chukrasia Tabularis

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment