माणदेशातील जैवविविधतेने समृद्ध असे किरकसाल Biodiversity of Kirkasal Satara
माणदेशातील जैवविविधतेने समृद्ध असे किरकसाल  Biodiversity of Kirkasal Satara

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील आदर्शगाव किरकसाल हे  छोटंसं गाव.  माणदेशातील एक डोंगराळ गाव ज्याची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे, गावात अनेक वर्षांपासून जलसंधारणाची कामे केली गेली, त्यामुळे गाव दुष्काळमुक्त झाले.  या गावात ना संरक्षित क्षेत्र आहे ना घनदाट जंगल, पण या भागात चांगली  जैवविविधता नांदत आहे, लोकसहभागातून हा प्रदेश संवर्धनाचा प्रयत्न येथील ग्रामस्थ करत आहेत.

मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात गावातील काही निसर्गप्रेमी तरुणांनी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्ट्रार (पीबीआर) तयार करण्यास सुरवात केली. गावातील संपूर्ण जैवविविधता, गावपातळीवरील माहितीसह विविध वनस्पती आणि प्राण्यांची माहिती नोंदविण्यासाठी रजिस्टर तयार करण्यात आले. डॉक्युमेंटेशनच्या या कामाला पक्षीनिरीक्षणापासून सुरुवात झाली, आणि किरकसाल जैवविविधता व्यवस्थापन समिती नावाचा एक उत्साही गट तयार झाला. या भागातील गवताळ जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थानिकांचे प्रबोधन करणे हे या समूहाचे मुख्य उद्दिष्ट होते. पक्षी निरीक्षण करताना किरकसाल गावातील वनस्पती आणि प्राण्यांची नोंद आणि निरीक्षण करण्याचे कामही सुरू झाले. गेल्या तीन वर्षांत  या समूहाने पक्ष्यांच्या २०४ प्रजाती, फुलपाखरांच्या ७३ प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या १६ प्रजाती, उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० प्रजाती आणि फुलांच्या विविधतेच्या २०० हून अधिक प्रजातींची नोंद केली आहे.

हेही वाचा : यंदाचे पक्षिमित्र संमेलन सांगली मध्ये

पर्यावरणाला हानीकारक असलेला विकास गावागावांत पोहोचत असल्याने आज महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागाला निसर्ग संवर्धन चळवळीची आणि किरकसाल सारख्या गावात निसर्ग संवर्धनाची बीजे पेरणाऱ्या तरुण निसर्गप्रेमींची  गरज आहे. किरकसाल या गावाला डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया WWF India कन्झर्वेशन कॅटलिस्ट प्रोग्राम (सीसीपी) तर्फे गवताळ प्रदेश जैवविविधता आणि इंडियन वुल्फ कन्झर्वेशन प्रकल्प २०२३-२४ हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

नुकतेच किरकसालच्या वनक्षेत्रात वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणासाठी बोंबाळे फॉरेस्ट ( वाघजाई तलाव) आणि डांभेवाडी घाटात सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच किरकसाल माध्यमिक शाळे जवळ ; किरकसाल परिसरातील प्रेक्षणीय स्थळांचे दिशादर्शक फलक लावण्यात आले. किरकसाल परिसरात होत असलेल्या लांडगा संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून हे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अमोल काटकर, फुलपाखरू अभ्यासक विशाल संपत काटकर, प्रकल्प प्रमुख चिन्मय सावंत, वन्यजीव स्वंयसेवक अभिजीत माने, प्रथमेश काटकर आणि धर्मराज विष्णू काटकर  यांचे मोलाचे योगदान आहे.   

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment