Orchid Replantation आणि ऑर्किडचे पुनर्रोपण यशस्वी झाले...
आणि ऑर्किडचे पुनर्रोपण यशस्वी झाले… Orchid Replantation

रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी रस्त्यारुंदीकरणादरम्यान कोल्हापूर ते रत्नागिरी घाट रस्त्यातील अनेक झाडे काही महिन्यांपूर्वी तोडावी लागली. यातील अनेक झाडांवर पश्चिम घाटाचे वैभव असलेली ऑर्किड Orchid (स्थानिक भाषेत आपण त्यांना आमरी किंवा आमर म्हणतो) असल्याचे लक्षात आल्याने नेचर काँझर्वेशन सोसायटी (NACONS), ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशन (TWF) आणि कोल्हापूर वनविभागाने अनोखा उपक्रम राबवला. या सगळ्यांनी एकत्र येऊन रस्त्याचे काम सुरू असलेल्या मार्गाचे सर्वेक्षण केले. यात तीन दुर्मीळ प्रजातींच्या ११०० हून अधिक ऑर्किडस असल्याचे लक्षात आले. शास्त्रीय पद्धतीने ऑर्किड काढून त्यांचे आंबा घाटातील जंगलात बुजूर्ग झाडावर मार्च महिन्यात पुनर्रोपण Replantation करण्यात आले.

या मोहिमेमध्ये वनविभागातील कर्मचाऱ्यांसोबत संस्थेचे अध्यक्ष तबरेज खान, माजी वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, कोल्हापूरचे मानद वन्यजीवरक्षक स्वप्निल पवार, धनंजय जाधव, विवेक कुबेर सहभागी झाले होते. चार टप्प्यांमध्ये दोन हजारांहून अधिक ऑर्किडचे पुनर्रोपण करण्यात आले.

पावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर ऑर्किड जगणार का याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल होते. कौतुकाची बाब म्हणजे पुनर्रोपण केलेल्या ऑर्किडमधील ९० टक्के ऑर्किड जगल्याची बातमी नेचर काँझर्वेशन सोसायटीचे तबरेज खान यांनी शेअर केली आहे. संस्थेचे तरबेज खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच पुनर्रोपण केलेल्या ठिकाणी सर्वेक्षण केले. त्यात ९० टक्के ऑर्किड तजेलदार झाल्याचे बघायला मिळाले. त्यातील काही ऑर्किड आता फुलांनी बहरली आहेत. काही ऑर्किड माकडांमुळे झाडांवरून घसरली होती, पण आम्ही पुन्हा त्यांना बांधले आहे. दुर्मिळ प्रकारच्या ऑर्किडला वाचवून निसर्ग संवर्धनात हातभार लावल्याचे आम्हाला समाधान आहे, असे खान यांनी सांगितले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment