Water for Birds पक्ष्यांनाही लागते तहान
पक्ष्यांनाही लागते तहान

उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याची सर्वाधिक गरज भासते. पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची अविरत धडपड सुरू असते. या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज आहे वाटीभर पाण्याची..

वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. मात्र, याचे पक्ष्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत.

दर वर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या की पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती जाणकारा व्यक्त करत आहेत

अलीकडे अनेक पक्षी शहरातील जाहिरातींचे मोठे फलक (होर्डिंग), विजेच्या ताराच्या खांबावर घरटी करतात. उन्हात पत्रे तापतात आणि त्यामुळे उन्हाचा दाह अधिक तीव्रतेने जाणवतो. त्यातच पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने प्राणी आणि पक्षी यांच्याअडचणीत भर पडते.

गावाकडे तलाव, विहिरी, लहान-मोठी पाण्याची डबकी किंवा उघड्यावर पाणी भरून ठेवलेले असते. त्यामुळे प्राणी, पक्षांची तहान भागते. मात्र, शहरात काँक्रिटच्या जंगलात वास्तव्य करणाऱ्या पक्ष्यांना पाणवठे आणि जलस्रोत सापडत नाहीत त्यामुळे उपाशीपोटी उडत असताना अशक्तपणामुळे ते जमिनीवर कोसळतात. पोटात अन्न नसल्याने उडण्याची शक्ती त्यांच्याकडे नसते. रस्त्यावर पडणाऱ्या या पक्ष्यांना कावळे, शिकारी पक्षी आणि भटकी कुत्री मारण्याचा प्रयत्न करतात.

बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया बद्दल माहिती आहे का ?

या पार्श्वभूमीवर कोणताही पक्षी घराजवळ, रस्त्यावर सापडल्यास लगेच पक्षिमित्रांशी संपर्क साधा. जखमी पक्षाला घरातील एखाद्या जुन्या खोक्यात ठेवा. त्यानंतर साखर आणि किंचित मीठ घातलेले पाणी त्याला द्या. हे पाणी सलाइनसारखे काम करते. अनेकदा पाणी प्यायल्यावर ताकद आली की पक्षी स्वतःहून उडून जातात

Image by Swara Chandorkar

पक्ष्यांसाठी काय कराल ?

  • घर अथवा इमारतीवर पाण्याची भांडी ठेवावीत.
  • ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलणे आवश्यक आहे.
  • या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.
  • घराच्या खिडकीत, गॅलरीत, बागेमध्ये, सोसायटीच्या भिंतींवर कोपऱ्यांत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल.
  • शक्यतो स्टीलचे भांडे ठेवणे टाळा, कारण ते पटकन गरम होतं आणि पाणीही तापतं.
  • नर्सरीमध्ये अलीकडे मातीची पसरट भांडी मिळतात. पक्ष्यांना पाणी पिणे सोयीस्कर ठरते. ही मातीची भांडी शक्यतो सावलीत ठेवावीत.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment