बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया Dr. Salim Ali
बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया Dr. Salim Ali

भारतीय पक्षी शास्त्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाव घ्यायची वेळ आली तर, पहिले नाव पटकन डोळ्यासमोर येते ते डॉ. सलीम अली… पक्ष्यांच्या संशोधनासंदर्भातील कोणतीही चर्चा या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पक्ष्यांचे निरीक्षण ही संकल्पनाही सर्वसामान्यांना माहिती नव्हती, त्या काळात डॉ. सलीम अलींनी पक्षिशास्त्राचा खजिना उपलब्ध करून दिला.

टीम निसर्गरंग

info@nisargaranga.com

डॉ. सलीम अली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षितज्ञ, शास्त्रज्ञ… आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध पक्षिशास्त्रज्ञ, अभ्यासक संशोधक काम करतात. या सगळ्यांना, तुम्ही पक्ष्यांचा अभ्यास करताना सुरुवातीला कोणते पुस्तक अभ्यासले असे विचारले असता…त्यांचे उत्तर एकच असे… द बुक ऑफ इंडियन बर्ड्स .. पक्षिशास्त्र अभ्यासाचा पाया असलेल्या हे पुस्तक म्हणजे डॉ. सलीम अली यांनी दिलेला मोठा ठेवा आहे.

डॉ. सलीम अली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ रोजी मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं पूर्ण नाव सलीम मोइनुद्दीन अब्दुल अली. सलीम अवघ्या एक वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे आणि दोन वर्षांनी आईचं निधन झालं. मामा अमीरूद्दीन तय्यबजी यांनी त्यांना सांभाळलं. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गळ्यावर पिवळा डाग असलेली चिमणी पाळण्यासाठी विकत घेतली. हा पक्षी कोणता आहे, त्याचे नाव काय हे जाणून घेण्यासाठी हा चिमुरडा मुलगा मामाकडून पत्र घेऊन थेट बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या BNHS ऑफिसमध्ये गेला. तिथे सगळी माहिती जाणून घेतली आणि तिथूनच पक्षी निरीक्षणाचा छंद त्यांच्यात भिनला.

शाळेत असतानाही त्यांचे पक्षी निरीक्षण सुरूच होते. पुढे ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन प्राणिविज्ञान विषयातून बीएची पदवी घेतली. या शिक्षणावर इंडियन झुऑलॉजिकल सर्व्हे या सरकारी संस्थेत त्यांना सहज नोकरी मिळाली असती, पण त्यांनी बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीत व्याख्यात्या म्हणून जबाबदारी स्वीकारली. पुढे ते उच्चशिक्षणासाठी जर्मनीला गेले. बर्लिन विदयापीठाध्ये त्यांना प्रसिद्ध पक्षितज्ञ एर्व्हिन श्झमान हे मार्गदर्शक म्हणून लाभले. या अभ्यासात डॉ. सलीम अली यांनी पक्ष्यांचे वर्गीकरण, शरीररचनाशास्त्र, पक्ष्यांची कातडी काढणे, त्यात पेंढा भरून पुन्हा शिवणे, पक्ष्यांची मोजमापे घेणे यांचा अभ्यास केला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर ते भारतात परतले. बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीत पुन्हा कामाला सुरुवात केली. हैदराबाद राज्य पक्षिनिरीक्षण, त्रावणकोर-कोचीन पक्षिसर्वे क्षण, अफगणिस्तान पक्षिसर्वेक्षण, कैलास मानसरोवर पक्षियात्रा अशा मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या. सलीम अली यांचा सुगरण हा पक्षी (बाया) पक्षी घरटी कसे बांधतो, त्यातील बारकावे याचा विशेष अभ्यास होता. रेखाटने, छायाचित्रे आणि नोंदी घेऊन सुरगण पक्षांचा त्यांनी संशोधन अहवाल प्रसिद्ध केला होता. जॉन हॅरेल कुक या पक्षितज्ञाच्या मदतीने त्यांनी हिमालयातील कुमाऊँ तराई भागात ‘फिन्स बाया’ पक्षी पुन्हा शोधून काढले. कच्छमधील हंसक (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या वसाहतीचा त्यांनी शोध लावला. लडाखमध्ये काळ्या मानेचा सारस (क्रेन) असल्याचे त्यांनी १९७६मध्ये दाखवून दिले.

देशात वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणारी इंडियन बोर्ड ऑफ वाइल्ड लाइफ Indian Board of Wildlife या संस्थेची स्थापना डॉ. सलीम यांच्या पुढाकाराने झाली. त्यांनी द बुक ऑफ इंडियन बर्ड्स The Book of Indian Birds प्रसिद्ध पुस्तकाबरोबरच निरनिराळ्या प्रदेशांतील पक्ष्यांसंबंधी अनेक पुस्तके लिहिली. पक्षी संशोधनातील त्यांच्या अफाट कामाची दखल घेऊन डॉ. सलीम अली यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ते भारतातील नेचर क्लब ऑफ इंडिया चळवळीचे संस्थापक होते. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. दूरदर्शनने डॉ. सलीम अली यांचा जीवनपट उलगडणारा लघुपटही तयार केला आहे.

२० जून १९८७ ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तमिळनाडूमधील कोइमतूर येथे त्यांच्या नावाने द सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्टरी Center for Ornithology and Natural History ही संस्था कार्यरत आहे. गोवा राज्यात चोडण बेटावरील अभयारण्याला डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य हे नाव देण्यात आले आहे.

आपल्याला परिचयाचे असे कोणी अवलिया निसर्गमित्र असतील तर आम्हाला नक्की कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment