Leopard Woman Vidya Athreya बिबट्यांचा अभ्यास करणारी विद्या
बिबट्यांचा अभ्यास करणारी विद्या

सतत मानवी वस्तीत बिबटे का बरे येत असतील, या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधण्यासाठी त्यांनी वीस वर्षांपूर्वी संशोधन सुरू केले. अनेक महत्त्वाचे पुरावे त्यांनी गोळा केले आणि मनुष्य- वन्यप्राणी संघर्ष नियंत्रणात ठेवण्याचे मार्गही शोधले. आजच्या या भागात आपण लेपर्ड वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. विद्या अत्रेय यांची ओळख करून घेऊया…. Leopard Woman Vidya Athreya

टीम निसर्गरंग

info@nisargaranga.com

गेल्या काही वर्षांत जंगलांमध्ये माणसाने अतिक्रमण केल्यामुळे तिथे राहणारे प्राणी अनेकदा वाट चुकून, कधी खाद्याच्या शोधात तर कधी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी मनुष्यवस्तीत येतात आणि सगळा गोंधळ होतो. या प्राण्यांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा होते ती बिबट्याची… सतत मानवी वस्तीत बिबटे का बरे येत असतील, या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधण्यासाठीच डॉ. विद्या अत्रेय यांनी वीस वर्षांपूर्वी संशोधन सुरू केले. अनेक महत्त्वाचे शास्त्रीय पुरावे त्यांनी गोळा केले आणि मनुष्य – वन्यप्राणी संघर्ष नियंत्रणात ठेवण्याचे मार्गही शोधले. चला तर मग आज आपण लेपर्ड वुमन ओळख असलेल्या विद्या अत्रेय यांची ओळख करून घेऊया…

Leopard Woman Vidya Athreya

त्या वेळी निसर्गातील करिअरच्या संधी मर्यादित होत्या आणि ज्या होत्या त्याबद्दल कुणाला फारशी माहितीही नव्हती. मात्र, डॉ. विद्या यांनी माहिती शोधून काढली आणि पाँडिचेरी गाठले. तेथे वाइल्ड लाइफ इकॉलॉजी या विषयामध्ये एमएससी केले. त्यानंतर विद्या यांचा प्रवास जंगलात जातच राहिला. जंगलांचे विविध अंतरंग त्यांनी उलगडले. वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत संशोधनही केले. त्यांनी आशियायी सिंहांवर काम केले. या प्रोजेक्टसाठी काम करणाऱ्या टीममध्ये विद्या या वयाने कमी असलेल्या संशोधक होत्या. सिंहांच्या वस्ती शोधण्याचा हा प्रकल्प होता. त्याच वेळी त्यांना अंदमानमध्ये एका पक्ष्याशी संबंधित प्रकल्पावर काम करण्याचीही संधीही मिळाली होती. मांजर हा आवडता प्राणी असल्याने त्यांनी मार्जार कुळातील सिंहांच्या प्रकल्पावर काम करण्याचे ठरवले. त्यावेळी गीरच्या जंगलामध्ये क्षेत्रफळातील वनक्षेत्राच्या क्षमतेपेक्षा (कॅरिंग कॅपॅसिटी) आशियायी सिंहांची संख्या वाढली होती. त्यामुळे तेथील सिंहांचे पुनर्वसन करण्यासाठी नवीन वसतिस्थान शोधण्याचे काम विद्या आणि त्यांच्या टीमने केले.

हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया DR. SALIM ALI

या प्रकल्पानंतर त्यांनी अरुणाचल प्रदेशात क्लाउडेड लेपर्डचे सर्वेक्षण केले. तो भाग दुर्गम होता. पण, त्या कंटाळल्या नाहीत. अनेक अचडणी येऊनही त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. पुढे त्यांनी अमेरिकेतही स्मिथसोनियन सेंटर या संस्थेमार्फत उष्ण कटिबंधीय प्रदेशातील वनस्पतींवर संशोधन केले. भारतात आल्यावर त्यांच्या पतीचे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील जीएमआरटीमध्ये काम संशोधन सुरू होते. त्याच वेळी जुन्नरमधील बिबट्याचे प्रकरण चर्चेत आले होते. वस्तीत येणाऱ्या, माणसांवर बिबट्यांकडून हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. गावात बिबट्यांच्या विरोधात बंड पेटले होते. साधारणतः २००२मधील ही घटना असेल….

विद्या अत्रेय यांनी नारायणगावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मित्र संजय ठाकूर यांच्यासोबत पुन्हा मनुष्य- बिबट संघर्षावर संशोधन सुरू केले. त्या स्वतः टीमबरोबर गावागावात फिरल्या आणि वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या घरांतील माणसांवर, जनावरांवर बिबट्याने हल्ला केला आहे, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेतली. बिबटे दिसलेल्या ठिकाणी जीपीएसचा वापर करून मॅपिंग केले. एवढेच नव्हे तर वन कर्मचाऱ्यांनी पकडलेले बिबटे पकडून दुसरीकडे सोडण्यापूर्वी त्यांना मायक्रो चीप बसविण्यामध्येही त्यांचा सहभाग होता.

हेही वाचा: जादाव पेयांग – दी फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया

जंगलात आता खाद्य राहिले नाही, म्हणून बिबट्या गावात येतो असे गावकरी आणि वनाधिकाऱ्यांचे मत होते. मात्र, विद्या यांच्या सर्वेक्षणाने हा समज खोटा ठरवला. बिबट्या गावाच्या जवळच राहतो. पण, स्वभावाने लाजाळू असल्याने तो गावकऱ्यांना दिसत नाही. बिबट्यांची निर्माण झालेली समस्या मानवनिर्मित होती, असा सिद्धांतही त्यांनी मांडला. बिबट्यांना जर त्यांच्या मूळ वसतिस्थानी राहू दिल्या गावकऱ्यांना त्रास होणार नाही, हे त्यांनी पटवून दिले. कालांतराने वन विभागानेही बिबट्यांना दुसऱ्या जंगलांमध्ये सोडणे बंद केले आणि हळूहळू प्रश्न मिटला. विद्या यांनी गावकऱ्यांना बिबट्यापासून स्वसंरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा… बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्षाचा विषय निघतो, तेव्हा ज्या मोजक्या संशोधकांची नावे पुढे येतात, त्यामध्ये विद्या अत्रेय यांचे नाव अग्रस्थानी आहे. जुन्नरबरोबरच विद्या यांनी बोरीवली, अकोला संगमनेरमध्ये बिबट आणि मनुष्य संघर्ष सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे.

बिबट्याचा प्रवास चित्रपटाच्या पडद्यावर

आजोबा या बिबट्यामुळे विद्या अत्रेय यांची संपूर्ण कारकिर्द चित्रपटाच्या पडद्यावर झळकली. डॉ. विद्या नगर जिल्ह्यात काम करीत असताना टाकळी ढोकेश्वर या गावामध्ये विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती त्यांना मिळाली. वन विभागाच्या मदतीने त्यांनी बिबट्याला बाहेर काढले आणि त्याचा ट्रॅक ठेवण्यासाठी गळ्यात रेडिओ कॉलर बसवली. विद्या यांनीच त्या बिबट्याचे नाव आजोबा ठेवले. काही दिवसांनी बिबट्याला माळशेज घाटात सोडण्यात आले. गंमत म्हणजे आजोबाने अवघ्या २९ दिवसांमध्ये रेल्वेचे रूळ, महामार्ग, या औद्योगिक वसाहती आणि वसईची खाडी पोहून तब्बल १२० किलोमीटरचा टप्पा पार केला आणि तो बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचला. डॉ. विद्या यांनी रेडिओ कॉलरच्या माध्यमातून या प्रवासाचा मागोवा घेतला. बिबट्याचा हा प्रवास प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हा प्रवास आजोबा चित्रपटातून पडद्यावर साकारला आहे. बिबट्याच्या या रंजक प्रवासाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सुजय डहाके  दिग्दर्शित आजोबा हा चित्रपट नक्की पहा.

आपल्याला परिचयाचे असे कोणी अवलिया निसर्गमित्र असतील तर आम्हाला नक्की कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

2 Comments

  • Tusharr
    Posted February 13, 2023 2:15 pm 0Likes

    Hi! Myself Tusharr Suryawanshi, I have work on Grassland, Wetland and Mangroves Ecosystem.

    • Nisarga Ranga
      Posted February 14, 2023 12:19 pm 0Likes

      Nice meeting you sir.. how can we help you? Please share your contact details so we can get in touch with you. Thank you.

Leave a comment