जंगलातील शाल्मलीची फुले - जंगलातील सावर Silk Cotton Tree
जंगलातील शाल्मलीची फुले Silk Cotton Tree

महाराष्ट्रात तसा सर्वत्र वाढणारा, कमी पावसाच्या प्रदेशात विपुल प्रमाणात आढळणारा काटेसावर किंवा शाल्मली या नावांनी ओळखला जाणारा सावर हा महत्त्वाचा आणि सुंदर वृक्ष आहे..

सरळसोट वाढणाऱ्या  सावरीच्या खोडावर बरेच काटे असतात. सावरीची हाताच्या पंजासारखी दिसणारी, हिरवीगार पाने जानेवारी- फेब्रुवारीत पिवळी पडायला सुरुवात होते. ती पाने एकेक करून खाली पडतात आणि खालच्या पाचोळ्यात जमा होतात. ही पानगळ झाली की सावरीच्या काटेरी फांद्यांवर नवे कळ्यांचे कोंब दिसून येतात. कळ्यांपाठोपाठ अवतरतात लाल भडक फुले. एका तळहातात एक मावेल इतकी ही फुले मोठी असतात.

ही फुले मोठ्या सुट्या, पाच पाकळ्यांची अन एखाद्या वाटीसारखी असतात. या पाच पाकळ्यांच्या आत असंख्य पुंकेसरांची गर्दी असते. फुलांमध्ये भरपूर मधुरस किंवा मध असतो. त्यामुळे हा गोड मध पिण्यासाठी सावरीवर अनेक पक्षांची गर्दी होते. कोतवाल, मैना, सातभाई, भोरड्या असे कितीतरी पक्षी या काळात सावरीच्या झाडावर दिसतात. या मधाच्या बदल्यात पक्षीगण सावरीचे परागीभवन करतात. निसर्गात जेव्हा पाण्याची कमतरता असते, तेव्हा सावरीसारखे वृक्ष पक्ष्यांची तहान भागवतात. पक्ष्यांच्या नजरेला सावरीच्या फुलांचा भडक रंग चटकन भरतो.

हेही वाचा: सह्याद्रीतल्या अंजनीची भुरळ

हेही वाचा: पळसाला पानं तीनच..

फुले येऊन गेल्यावर सावरीच्या झाडावर दोडक्यासारखी दिसणारी फळे अवतरतात, मार्च दरम्यान येणाऱ्या या फळांमध्ये बियांना लपेटलेला मऊ, मखमली कापूस असतो. हा कापूस उशा तयार करण्यासाठी वापरता जातो. या कापसामुळेच सावरीला इंग्रजीत Silk Cotton Tree असे म्हणतात. हाँगकाँगमध्ये मुलांच्या परीक्षांच्या काळात फुलत असल्याने सावरीला Hero Tree असे गमतीदार नाव आहे.

सावर औषधी गुण असलेला वृक्ष आहे. सावरीची जाड साल फ्रैक्चर झाल्यावर त्या भागावर लावतात. तसेच दातदुखीवरदेखील ती गुणकारी आहे. सावरीच्या फुलांच्या पाकळ्यांचा मुरंबा करतात. खाली गळून पडलेली फुले वाळवून त्यांच्यापासून रंगही तयार करतात. चीनमध्ये काही ठिकाणी या वाळलेल्या फुलांचा चहाही करतात. पूर्वी दुष्काळाच्या काळात लोकांनी सावरीची मुळे भाजून खाल्ली आहेत. या सगळ्या वर्णनावरून सावरीची महती तुमच्या लक्षात आली असेलच. तेव्हा लक्ष ठेवा… सावरीच्या फुलण्याचा हंगाम जवळ येतोय. आपल्या आसपास फुलणान्या सावरीचे आणि तिच्या फुलांवर येणाऱ्या पक्ष्यांचे जरूर निरीक्षण करा. पुढे बिया गोळा करून त्यातील कापूस वेगळा करून उशी अवश्य तयार करा.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment