पळसाला पानं तीनच.. Flame of Forest - Palash - Parrot Tree
पळसाला पानं तीनच.. Flame of Forest

फ्लेम ऑफ द फॉरेस्ट Flame of Forest, पॅरट ट्री Parrot Tree, पलाश Palash, पळस… अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा पळस वृक्ष सध्या रानावनात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. तांबड्या रंगाच्या फुलांनी बहरलेला पळस वृक्ष .. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्याना लाभलेला जणू एक दागिनाच.

असंख्य दुर्मिळ वनस्पतींनी समृद्ध असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये हंगामानुसार चर्चेत येणारे, लक्ष वेधणारे वृक्ष दर काही दिवसांनी बदलत जातात. हिवाळा आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. रस्त्याच्या कडेच्या झाडांची पानगळतीही सुरू झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल घेऊन येणाऱ्या वृक्षांमधील सगळ्यांचा लाडका वृक्ष म्हणजे पळस. शहरी भागांमध्ये हे वृक्ष क्वचितच दिसत असले तरी गावाच्या वेशीवर, घाट रस्त्यांवर, लहान मोठ्या टेकड्यांवर पळस वृक्ष फुलांच्या हंगामात प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो.  निसर्गाने या वृक्षाला अतिशय देखणी, सुंदर तांबडी फुले बहाल केली आहेत.

हेही वाचा: सह्याद्रीतल्या अंजनीची भुरळ

आता आपण पळसाची थोडीशी शास्त्रीय माहिती घेऊ. पळस वृक्षाला स्थानिक भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये त्याला पलाश, याज्ञिक, किंशुक तर इंग्रजीत त्याला पॅरेट ट्री, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट या नावाने ओळखले जाते. पळस हा पानझडी प्रकारातील हा वृक्ष आहे. भारतात सर्वत्र हा वृक्ष आढळतो. महाराष्ट्रात पानझडीच्या जंगलांमध्ये हा हमखास सापडतो. श्रीलंका, पाकिस्तान आणि ब्रह्मदेशात देखील पळस वृक्ष आहेत.  

मराठी कुटुबांमध्ये पळस पोहोचला तो पळसाला पाने तीनच या म्हणीमुळे. या म्हणीमागे काही पौराणिक कथाही लोकप्रिय आहेत. पण शास्त्रीय दृष्ट्या हा पळसाची पाने संयुक्त, त्रिदली असतात, त्यामुळे पळसाला पाने तीन असे विश्लेषण झाले असावे, असे काही अभ्यासक सांगतात. थंडीचा जोर वाढला की पानगळती सुरू होते आणि एप्रिलमध्ये नवीन पालवी येते. मध्यतंरीच्या काळात हा वृक्ष चर्चेत येतो तो फुलांमुळे. पळसाची फुले मोठी, नारिंगी लाल व बिनवासाची असतात. साधारण फेब्रुवारी मध्यात आणि मार्च महिन्यात पळस वृक्ष फुलांनी बहरलेला दिसतो. उन्हामुळे ओसाड, बोडक्या वाटणाऱया डोंगररांगाकडे बघताना भडकरंगी फुलोऱ्यामुळे पळस पटकन नजरेत भरतो. जणू डोंगरातील वनाग्जीच भासतो. त्यामुळेच या वृक्षाला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ हे इंग्रजीत नाव दिले असावे.

हेही वाचा: माळढोक वाचविण्यासाठी BREEDING CENTER

पक्षी, मधमाशा आणि कीटक फुलांच्या रंगामुळे आकर्षित होतातच शिवाय त्यांना मकरंदाची मेजवानीही मिळते. पळसाच्या वृक्षावर संमेलन भरविणारे हे छोटेसे सजीव परागीभवनाचे कामही चोख करतात. विशेष म्हणजे पळसाच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्मही लपलेले आहेत. पळसाच्या पानांचा अनेक ठिकाणी पत्रावळी बनविण्यासाठी वापर केला जातो.

पळसाची फुले, कळ्या अर्धचंद्राकृती असतात. पळसाला किंशुक असेही एक नाव आहे. कारण पोपटाला संस्कृतमध्ये ‘किंशुक’ म्हणतात. पळसाची पाने नारंगी, लालभडक आणि अगदी पोपटाच्या चोचीसारखी दिसतात. त्यामुळे फुलांना ‘किंशुक’  तर इंग्रजीत ‘पॅरट ट्री’ असेही नाव सापडते.  सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पिवळा पळसही दिसतो, पण तो दुर्मिळ आहे.

चला तर मग, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये या दीड महिन्यात फिरायला जाणार असला तर पळसाचे दर्शन आवर्जून घ्या. चांगले फोटो काढा आणि आम्हाला पाठवा. आमचा इमेल … आणि फोन तुमच्याकडे आहेच.

पळस

मेघांच्या पळसाचा 
अस्तावर जाळ 
अस्ताच्या कंठात 
माणकांची माळ 
माणकांच्या माळेला 
केशराचे पाणी 
केशराच्या पाण्यात 
बालकवींची गाणी 
बालकवींच्या गाण्यात 
एक उदास पक्षी 
पक्षांच्या पंखांवर 
श्रावणाची नक्षी 
श्रावणाच्या नक्षीत 
देवळाचे कळस 
कळसावर पुन्हा 
मेघांचे पळस 

पळस 
छंदोमयी, कुसुमाग्रज 

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment