रंगबिरंगी फुलपाखरांना मराठमोळी नावं...
रंगबिरंगी फुलपाखरांना मराठमोळी नावं…

निसर्गसंपत्तीने श्रीमंत असलेल्या परिसंस्थेचे इंडिकेटर किंवा प्रतिक असलेली फुलपाखरं सगळ्यांची आवडती. मुलं लहानपणी चित्र काढायला शिकली की फुल आणि त्यावर बसलेलं रंगीत फुलपाखरू हे त्यांचं आवडतं चित्र असतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधणारी चिमुकली तर काही आकारानं मोठ्या फुलपाखरांची नाव सगळ्यांना कळाली पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र जैविविधता मंडळ आणि फुलपाखरू अभ्यासकांनी एकत्र येऊन राज्यातील सर्व फुलपाखरांना मराठी नावं दिली आहेत.

महाराष्ट्रात सुमारे तीनशे प्रकारची लहान मोठी फुलपाखरं आढळतात. यातील बहुतांश फुलपाखांना शंभर दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिश अभ्यासकांनीच नावं दिली आहेत. त्यामुळे ती लॅटिन भाषेत म्हणजे आपल्या सारख्यांना लक्षात राहण्यासाठी किचकट आहेत. काही फुलपाखरांना ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांचीच नावं देण्यात आली. आत्तापर्यंत फुलपाखरू अभ्यासक ही नाव वापरत होते. पण महाराष्ट्र जैविविधता मंडळाचे अध्यक्ष आणि फुलपाखरू अभ्यासक डॉ. विलास बर्डेकर यांनी फुलपाखऱांची नाव मराठीत करण्यासाठी पुढाकार घेतला.

हेही वाचा: पळसाला पानं तीनच.. FLAME OF FOREST

फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले, जयंत वडतकर, दिवाकर ठोंबरे आणि राजू कसंबे या तज्ज्ञांनी राज्याच्या विविध भागात फिरून गावकऱ्यांशी चर्चा केली, ते फुलपाखरांना कोणत्या नावाने ओळखतात चे विचारले. अभ्यासकांबरोबर संवाद साधला. त्यांचे रंग, रुप, पंखाचे आकार, त्यांच्या सवयी, कोणत्या झुडपांवर त्यांचा वावर असतो याचाही विचार केला. सर्व माहिती एकत्र करून त्यांनी अडीचशे फुलपाखरांचं बारसं करून मराठी नावं दिली. यात कृष्णकमलिनी, चारुलता, चांदवा, नकाशक, गोलू, चिंगी,  झिंगोरी, ढवळ्या, प‌वळ्या, छाया, नवाब, रुस्तम, भटक्या, नीलायम, कवडा, तारका, नीलांबरी, गुब्बी, अशोका अशी गंमतीदार नाव त्यांना मिळाली आहेत. भारतात बहुदा पहिल्यांदाच स्थानिक भाषेत फुलपाखरांना नावं देण्याचा एखाद्या राज्याने केलेला हा प्रयोग असेल…

हेही वाचा : पक्षिमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू

फुलपाखरांना मराठी नावं देताना त्यांनी त्यांची कुळही निश्चित केली. म्हणजे निम्फालिडी या फुलपाखरू कुळाचे नाव ‘कुंचलपाद’ तर लायसनेडीचे ‘नीळकुळ’ झाले. ‘चपळ’, ‘पुच्छ’, ‘मुग्धपंखी’ असे वर्गीकरण केले. निसर्गाचा अद्भूत चमत्कार असलेली या फुलपाखरांची आकर्षक छायाचित्रे आणि मराठी नावांचे पुस्तकही सरकारने प्रसिद्ध केलं आहे. यात फुलपाखरांचे वर्णन करणाऱ्या उत्तम कविताही दिल्या आहेत.

Blue Mormon
‘ब्लू मॉरमॉन’ Blue Mormon हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे

फुलपाखरांबद्दल जागृती करण्यासाठी महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने काही वर्षांपूर्वी पुढाकार घेऊन राज्याचा प्राणी शेकरू, राष्ट्रीय प्राणी वाघ तसं राज्याचं फुलपाखरू जाहीर करण्याचा निर्णय घेतला. अभ्यासकांकडून आलेल्या सूचनांनंतर सर्वांनी एकत्रित पश्चिम घाटाची ओळख असलेल्या ‘ब्लू मॉरमॉन’ या फुलपाखराची निवड करण्यात आली. महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू जाहीर करणारे पहिले राज्य ठरले. मराठीत या फुलपाखराला नीलवंत असे सुंदर नाव देण्यात आलय.

फुलपाखरांबद्दलची विविधता जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ बघता येईल.

महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची ईप्रत (पीडीएफ फाइल) हवी असल्यास या आमच्या  WhatsApp Group मध्ये मेसेज करा

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment