शेकरू आणि भारतीय नक्षत्र कासवांची तस्करी रोखली, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील मोठी कारवाई
पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रतिबंधित वन्यजीवांची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करण्याचा एक मोठा डाव महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (DRI) उधळून लावला आहे. ‘डीआरआय’च्या पुणे प्रादेशिक युनिटने अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोन संशयित तस्करांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३ दुर्मिळ ‘शेकरू’ (Malabar Giant Squirrel) आणि ७ ‘भारतीय नक्षत्र कासवे’ (Indian Star Tortoise) जप्त केली आहेत.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी २० मे २०२६ रोजी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील एका निश्चित केलेल्या ठिकाणी पाळत ठेवली. यावेळी पहिल्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या दोन पुठ्ठ्यांच्या खोक्यांमध्ये (Corrugated Cartons) ३ जिवंत ‘शेकरू’ अत्यंत क्रूरपणे लपवून ठेवल्याचे आढळून आले. पहिल्या आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, डीआरआयच्या पथकाने पुण्यातच दुसऱ्या एका ठिकाणी तातडीने धाड टाकली. तिथून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले, ज्याच्याकडून ७ जिवंत ‘भारतीय नक्षत्र कासवे’ जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेले दोन्ही प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत (वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार) संरक्षित श्रेणीत येतात.
शेकरू (Malabar Giant Squirrel) – वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ (परिशिष्ट-१) – हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असून, याच्या शिकारीवर आणि व्यापारावर कायद्याने पूर्णपणे बंदी आहे. भारतीय नक्षत्र कासव (Indian Star Tortoise) – वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ (परिशिष्ट-१) – या प्रजातीला कायद्यानुसार सर्वोच्च दर्जाचे संरक्षण असून, ते बाळगणे, वाहतूक करणे किंवा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा आहे.

पुढील कायदेशीर कारवाई
डीआरआयने रेस्क्यू केलेले सर्व वन्यजीव, दोन्ही आरोपी आणि तस्करीसाठी वापरलेले साहित्य पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे वन विभागाकडे सुपूर्द केले आहेत. वन विभागाकडून आता वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.
डीआरआयचे मत – वन्यजीवांचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी डीआरआय पूर्णपणे कटिबद्ध आहे. आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळ्यांच्या आणि शिकार करणाऱ्या सिंडिकेट्सच्या विरोधात आमची ही गुप्त माहितीवर आधारित मोहीम अशीच सुरू राहील.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.
