Third World Ocean Assessment WOA III by United Nations
समुद्री परिसंस्थेच्या रक्षणासाठी एकत्र या – युएनचे आवाहन Third World Ocean Assessment WOA III by United Nations

समुद्री परिसंस्थेच्या रक्षणासाठी एकत्र या – युएनचे आवाहन Third World Ocean Assessment WOA III by United Nations

‘जागतिक महासागर दिना’चे औचित्य साधून युनायटेड नेशन्सने ‘तिसरा जागतिक महासागर अहवाल’ Third World Ocean Assessment सोमवारी रात्री न्यूयार्कमध्ये प्रसिद्ध केला आहे. महासागरांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारा हा अहवाल मानवी अस्तित्वासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ८६ देशांमधील सुमारे ६०० तज्ज्ञांच्या सामूहिक अभ्यासातून हा एकात्मिक अहवाल तयार करण्यात आला असून, यामध्ये महासागरांचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक पैलू सविस्तर मांडण्यात आले आहेत.

महासागरांवर वाढता ताण आणि प्रमुख धोके

अहवालानुसार, मानवी क्रियाकलाप, प्रदूषण आणि हवामान बदलामुळे समुद्राच्या पृष्ठभागापासून ते थेट खोल तळापर्यंत अभूतपूर्व ताण निर्माण झाला आहे. या दबावामुळे मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचा ऱ्हास होत असून सागरी अन्नसाखळी धोक्यात आली आहे.

अहवालातील काही धक्कादायक आकडेवारी:

  • समुद्राचे तापमान: १९५५ पासून समुद्राच्या तापमानात जितकी वाढ झाली आहे, त्यापैकी १६% वाढ एकट्या २०१८ नंतर झाली आहे. अटलांटिक, हिंदी आणि पॅसिफिक महासागरांच्या दक्षिण भागात ही तापमानवाढ सर्वाधिक जाणवत आहे.
  • पातळीत वाढ: समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा वेग कमालीचा वाढला आहे. २०१५ पूर्वी हा वेग प्रतिवर्ष २.० मिमी पेक्षा कमी होता, तो २०२३ मध्ये प्रतिवर्ष ४.३ मिमी वर पोहोचला आहे.
  • प्लास्टिकचे साम्राज्य: दरवर्षी तब्बल ५.२१ कोटी टन प्लास्टिक कचरा समुद्रात जातो. सध्या समुद्रात २४.४ ट्रिलियन (लाखो करोड) मायक्रोप्लास्टिकचे कण तरंगत असून, याचा फटका ४,००० हून अधिक सागरी प्रजातींना बसत आहे.
  • अपुरे ज्ञान: आपण अजूनही महासागरांच्या बाबतीत अंधारात आहोत. २०२५ पर्यंत समुद्राच्या तळाचा केवळ २७.३% भागाचाच नकाशा (Mapping) तयार करता आलेला आहे.

आज जाहीर झालेला हा तिसरा अहवाल हवामान बदल, अतिमासेमारी, जैवविविधतेचा ऱ्हास आणि सागरी प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटाची साक्ष देतो. आपण महासागराला अमर्याद समजणे आता थांबवले पाहिजे. विज्ञानावर आधारित, आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चौकटीत राहून आणि सर्व देशांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून महासागराशी एक नवीन नाते निर्माण करण्याची गरज आहे.

अँटोनियो गुटेरेस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र

सागरी आरोग्य आणि मानवी जीवन

अहवालात महासागराचे आरोग्य आणि मानवी अन्नसुरक्षा, उपजीविका व संस्कृती यांच्यातील थेट संबंध अधोरेखित करण्यात आला आहे. पहिल्यांदाच या अभ्यासात स्थानिक पारंपरिक ज्ञान आणि लिंगभावाच्या (Gender) समानतेला महत्त्व देण्यात आले आहे.

  • स्थानिक मच्छीमार दुर्लक्षित – लहान प्रमाणावर होणाऱ्या मासेमारीतून ६ कोटींहून अधिक लोकांना रोजगार मिळतो आणि २५.१ दशलक्ष टन उत्पादन मिळते. मात्र, तरीही अनेक स्थानिक आणि आदिवासी समुदाय संसाधनांच्या हक्कापासून वंचित आहेत.
  • आरोग्याला धोका- समुद्रातील रासायनिक प्रदूषके, मायक्रोप्लास्टिक आणि विषारी शेवाळ यामुळे समुद्री अन्न (Seafood) दूषित होत असून मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

कायदे झाले, पण अंमलबजावणी विखुरलेली

या अहवालात प्रथमच ‘समुद्र प्रशासनाचा’ (Ocean Governance) स्वतंत्र विभाग समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या जागतिक स्तरावर सागरी संरक्षणाशी संबंधित ५७ करार अस्तित्वात आहेत. यामध्ये अलिकडेच झालेल्या हानिकारक अनुदाने रोखणारा ‘मत्स्यव्यवसाय अनुदान करार’ आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठीचा ‘BBNJ करार’ यांचा समावेश आहे.

परंतु, प्रगती होत असली तरी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील आणि देशांमधील समन्वयाच्या अभावामुळे (Fragmentation) या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मर्यादा येत आहेत. हवामान, जैवविविधता आणि प्रदूषण या सर्व आघाड्यांवर एकत्रित आणि सुसंगत काम करण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता  WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!