भरवस्तीत शिरलेल्या मगरीचे वन विभाग आणि सिस्केप तर्फे यशस्वी रेस्क्यू
महाड तालुक्यातील नाते गावात भरवस्तीत आलेल्या सुमारे सहा फूट लांबीच्या मगरीचे वनविभाग आणि सिस्केप संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे रेस्क्यू करण्यात आले. या कारवाईमुळे संभाव्य मनुष्य–वन्यजीव संघर्ष टळला असून मगरीला सुरक्षितपणे तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
गेल्या पंधरा दिवसांपासून नाते परिसरासह कोथुर्डे पंचक्रोशीत मगरी मानवी वस्तीत येणे, तसेच गावातील रस्त्यांवर फिरताना दिसणे अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, सिस्केप संस्था आणि वनविभागाच्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये मगरींबाबत असलेली भीती आणि गैरसमज कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता ग्रामस्थ स्वतः वन्यजीवांचे संरक्षण करत संबंधित यंत्रणांना माहिती देत आहेत.
रविवारी (दि. १५) पहाटे सुमारे १.१५ वाजता नाते येथील टाकीची आळी परिसरातील दत्त मंदिराजवळील रस्त्यावर मगर आल्याची माहिती श्रीकृष्ण गायकवाड यांनी सिस्केप संस्थेला दिली. यानंतर ग्रामपंचायत सदस्य ॲड. सुरज जामदार, सुधाकर गायकवाड, रुपेश पवार, गणेश सावंत आणि प्रवीण गायकवाड यांसह स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखत मगरीला सुरक्षितरीत्या पकडून ठेवले.
माहिती मिळताच सिस्केप संस्थेचे गणेश खातू यांनी सदस्यांना पाचारण केले. त्यानुसार गणेश खातू, चिराग मेथा, स्मरण शिंदे, ओम शिंदे, धर्मेश मेथा आणि योगेश गुरव हे आवश्यक साहित्य व उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले.
सदर मगर ही गोड्या पाण्यातील मार्श क्रोकोडाइल (मगर) असून तिची लांबी सुमारे ५ फूट ९ इंच असल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी मगर इतरत्र जाऊ नये यासाठी तिला दोरीच्या सहाय्याने सुरक्षितपणे पकडून ठेवले होते.
वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संदीप उतेकर, वनरक्षक अंगद भोसले आणि वनरक्षक आदित्य भोसले यांच्या उपस्थितीत मगरीचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. आवश्यक कार्यवाही पूर्ण करून कोणतीही इजा न होता तिला तिच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या संपूर्ण बचाव मोहिमेत ग्रामस्थ, वनविभाग कर्मचारी आणि सिस्केप संस्थेच्या सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे मगरीचे सुरक्षित पुनर्वसन होऊन संभाव्य धोका टळला.
यावेळी वनविभाग आणि सिस्केप संस्थेने नागरिकांना आवाहन केले की, वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता अथवा त्यांना इजा न पोहोचवता तात्काळ वनविभाग किंवा अधिकृत रेस्क्यू टीमशी संपर्क साधावा.
दरम्यान, जागतिक मगर दिनानिमित्त करंजखोल येथील प्राथमिक शाळेमध्ये स्लाईड शो करून मगरींविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नील बनसोडे आणि उपस्थित शिक्षक वृंद यांनी सिस्केप संस्था सदस्य प्रेमसागर मेस्त्री, गणेश खातू, प्रणव शेलार आणि विराज पाटील यांचे स्वागत केले. उपस्थितांचे आभार विषय शिक्षक सौ स्नेहल गणेश खातू यांनी मानले.
महाड शहरालगत सावित्री नदीमध्ये सापडणाऱ्या मगरी नैसर्गिक आणि अनैसर्गिक कारणामुळे मानवी वस्तीत आढळून येतात, त्यांच्या अशा पद्धतीच्या वस्तीमध्ये येण्याने एक प्रकारची भीती निर्माण होते. सावित्री नदीतील मगरी या इंडियन मार्श क्रोकोडाइल या जातीचे आहेत. त्या मानवावर हल्ला करत नाहीत. शालेय विद्यार्थी जीवनापासून जर अशा प्राण्यांबद्दल जनजागृती करून शास्त्रीय माहिती पुढे आणली आणि त्यांना ती व्यवस्थित समजून सांगितली तर विद्यार्थी नक्कीच वन्यजीव संवर्धनाबद्दल साक्षर होतात. महाडमध्ये सिस्केप संस्था, महाड वनपरिक्षेत्र कार्यालय, वनविभाग रोहा तसेच प्रिव्ही आणि प्रीजीव स्पेशलिटी लिमिटेड कंपनी महाड यांच्या संयुक्त विद्यमाने मगर संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.
