Maharashtra Pakshimitra Award Announced महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर Maharashtra Pakshimitra Award Announced

अमरावती: गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२३ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार नाशिक येथील दिगंबर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला आहे. इतर पुरस्कारांपैकी पक्षी संशोधन पुरस्कार, सालिम अली सेंटर फॉर ऑर्निथालॉजी (SACON) कोइम्बतुर येथील पक्षी शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची यांना, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार अमरावती येथील प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी राघवेंद्र नांदे यांना तर पक्षी जनजागृती पुरस्कार अकोला येथील निसर्ग कट्टा चे अमोल सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे.

पक्ष्यांसंदर्भात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येत असतात. या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे अमरावती येथे संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी केली. या पुरस्कारांचे वितरण २३ आणि २४ डिसेंबर २०२३ दरम्यान सांगली येथे होणाऱ्या येत्या ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.

हेही वाचा: बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया

यावर्षीचा स्व. रमेश लाडखेडकर स्मृती पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार हा दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून, पक्षी संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत पक्षिमित्र, चळवळीतील मार्गदर्शक, जेष्ठ सभासद, तथा पक्षी विषयक पुस्तकांचे लेखक, पक्षिमित्र अंकाचे संपादक, नाशिक येथील दिगंबर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंच द्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. दुसरा पुरस्कार स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षी संशोधन पुरस्कार हा पक्षिमित्रचे सभासद व सालिम अली सेंटर फॉर ऑर्निथालॉजी कोइम्बतुर येथील पक्षी शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची यांना जाहीर करण्यात आला. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार स्व. डॉ. जी. एन. वानखेडे मेमोरिअल फंड तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे.

यावर्षीचा पक्षिमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीतील पक्षी संवर्धन, तथा जखमी पक्षी प्राणी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत अमरावती येथील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक पक्षिमित्र राघवेंद्र नांदे यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार नागपूर येथील महाराष्ट्र पक्षिमित्रचे सदस्य अनिल बहादुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. चौथा पुरस्कार स्व. रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती पक्षिमित्र जनजागृती पुरस्कार हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास आणि जनजागृती आणि शालेय विद्यार्थी पक्षिमित्र संमेलनांचे माध्यमातून पक्षी विषयक जनजागृती आदी क्षेत्रात कार्यरत अकोला येथील सभासद अमोल सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार अविनाश शिरोडे, नाशिक यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.

हेही वाचा: ADOPT A NEST, SAVE GREAT HORNBILL

या पुरस्काराचे वितरण ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सांगली येथे २३-२४ डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी कळविली आहे

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment