“व्हिलेज फार्मसी” कडुनिंब - Neem Tree Azadirachta indica
“व्हिलेज फार्मसी” कडुनिंब

आपल्या मराठी संस्कृती आणि परंपरांमध्येही कडुनिंब या वृक्षाला महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाचा आरंभही कडुनिंबाची पाने खाऊन होतो. या दिवशी गुढी उभी करताना त्यातही कडूनिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तर आज जाणून घेऊया कडुनिंबाविषयी.

महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात वाढणारा औषधी गुणांचा वृक्ष म्हणजे कडुनिंब. तो इतका औषधी आहे की इंग्रजीत त्याला व्हिलेज फार्मसी म्हणजे गावचा दवाखाना असेही म्हणतात.

कडुनिंब ही एक भारतीय औषधी वनस्पती असून, औषधी वनस्पती क्षेत्रातील कडुनिंबाचे वाढते महत्त्व पाहून खूप वर्षांपूर्वीच भारताने या वनस्पतीचे पेटंट आपल्या नावावर करून घेतले.

हेही वाचा: सह्याद्रीतल्या अंजनीची भुरळ

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कडुनिंबाचा उपचार केल्यास रक्त, पचन आणि त्वचेशी निगडीत कित्येक असाध्य रोग दूर होऊ शकतात. कडुनिंबाच्या औषधी उपयोगांची यादी मोठी आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडुनिंबाच्या काड्यांनी दात घासतात. कडुनिंबाची साल औषधात वापरतात. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने अंघोळ करायची प्रथा आहे. त्याच्या याच गुणामुळे साबणामध्येही कडुनिंब वापरतात. कडुनिंब जंतुनाशक असल्यामुळे त्याची वाळलेली पाने धान्यात घातल्याने कीड लागत नाही.

दर वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान कडुनिंबाला बहर येतो आणि पाठोपाठ येतात निंबोण्या… याची पाने जरी कडवट असली तरी, कडुनिंबाच्या गोडसर आणि औषधी असतात. निंबोण्यांपासून तेलही मिळते. तेल केल्यानंतर मिळणारी पेंडही जंतुनाशक म्हणुन वापरली जाते. हिंदी आणि इंग्रजीत कडुनिंबाला नीम असे नाव आहे. कडुनिंबाचे शास्त्रीय नाव आहे ऍझाडिरेक्टा इंडिका Azadirachta Indica. यातल्या इंडिका शब्दाचा अर्थ आहे भारतात वाढणारा. ऍझाडिरेक्टा या नावात एक गंमत आहे. हे शास्त्रीय नाव आले आहे आझाद दरख्त या फारसी भाषेतल्या नावावरून. आझाद म्हणजे स्वतंत्र आणि दरख्त म्हणजे वृक्ष. कमी पाण्यात, वाळवंटी प्रदेशातही तो वाढत असल्याने हे नाव मिळाले आहे. औषधातही कडुनिंबाचे उपयोग असून, अन्नातही त्याचा वापर केला जातो.

हेही वाचा: पळसाला पानं तीनच.. FLAME OF FOREST

तमिळनाडूमध्ये कडुनिंबाच्या फुलांपासुन वेप्पम्पु रस्सम नावाचा आमटीसारखा पदार्थ तयार करतात. ब्रह्मदेशात टोमॅटो घालून कडुनिंबाच्या पानाचे लोणचे तयार करतात. कडुनिंबासंदर्भात अजून एक गोष्ट… उस्मानाबाद जिल्ह्यात तेर या गावी आणि महाराष्ट्रात आणखीही कुठे कुठे कडू पाने नसलेले कडुनिंबाचे वृक्ष आहेत. त्याची पाने खायला तुम्हाला नक्कीच आवडतील. कडुनिंबाचे उल्लेख अनेक कथांमध्ये आणि कवितांमध्येही आहेत. लहानपणी ऐकलेली निंबोणीच्या झाडामागे ही अंगाई तुम्हाला नक्कीच आठवत असेल.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!