उपद्रवी तणांची होळी - Weed Bon Fire
उपद्रवी तणांची होळी – Weed Bon Fire

वाईट प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी दर वर्षी आपल्याकडे हुताशिनी पौर्णिमेला होळी पेटवली जाते. पूर्वी यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जात होती. गेल्या काही वर्षात वृक्षसंवर्धानाबद्दल झालेल्या जागृतीमुळे नागरिक होळीसाठी लाकडांचा वापर टाळतात. पर्यावरणस्नेही संदेश देण्यासाठी पारंपरिक होळीचा उपयोग करून घेण्यासाठी पुण्यातील बायोस्फिअर्स या संस्थेचे प्रमुख डॉ. सचिन पुणेकर यांनी गेल्या काही वर्षांपासून तणांची होळी Weed Bon Fire ही नवीन चळवळ सुरू केली आहे. स्थानिक वनस्पतींसाठी त्रासदायक ठरलेल्या उपद्रवी परदेशी वनस्पतींचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी विविध संस्था, निसर्गप्रेमींना एकत्र आणले आहे. पुणेकर वर्षभर उपद्रवी तणांबद्दल जागृती करतात, टेकड्यांवर तण हटाव मोहिमही त्यांनी राबवल्या आहेत. याशिवाय अभिनव उपक्रम म्हणून ते गेल्या काही वर्षांपासून तणांची होळी पेटवत आहेत.

आपण या तणांबद्ल जरा सखोल जाणून घेऊ या…

खर तर कुठल्याही शेतीमध्ये किंवा फळबागांमध्ये अनावश्यक वाढणारी वनस्पती म्हणजे तण होय. तण हे एक त्रासदायक (उपद्रवी) वनस्पती आहे. तणाचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वन-तणे, जल-तणे आणि शेतीतील तणे (शेती-तणे) असतात. तणे ही देशी व परदेशी असतात. या पैकी परदेशी (आगंतुक) तणांविषयी व त्यांच्या दुष्परिणामांविषयी जनमानसात प्रबोधन व्हावे ह्या साठी हा उपक्रम.

हेही वाचा : महाराष्ट्रातील आदिवासींची आगळीवेगळी होळी

परदेशी तणे कुठली?

  • वन-तणे : रानमारी, टणटणी (घाणेरी), उंदिरमारी, कुबाभूळ, कॉसमॉस (सोन कुसुम), टिथुनिया (कनकगोल), लाजाळू, हिप्टीस इ.
  • जल-तणे : जलपर्णी, पिवळा धोत्रा (सत्यानाशी), जलकुंभी, बेशरम (महानंद) इ.
  • शेती-तणे: धनुरा (गाजर गवत किंवा चटक चांदणी), चिमुक काटा- रेशीम काटा इ.

परदेशी तणांचे धोके :

  • वन व जल परिसंस्थांचा पर्यावरणीय समतोल बिघडणे
  • स्थानिक वनस्पती नष्ट होणे
  • स्थानिक जैव विविधता (जिविधता) कमी होणे.
  • पिकांचे उत्पादन घटणे

तणाव्दारे होणारा किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव.

  • तणांची जागेसाठी, जमिनीतील पोषक घटक व पाण्यासाठी स्थानिक वनस्पती व पिकांबरोबर होणारी स्पर्धा.
  • तण नाशकामुळे जमिनीचा पोत कमी होतो व भूगर्भिय पाण्याचे प्रदूषण होते.
  • तणांमुळे माणसांना व पाळीव तसेच वन्य प्राण्यांच्या आरोग्याच्या विविध समस्या.
  • जल- तणांमुळे जल वाहतुकीमध्ये निर्माण होणारे अडथळे.
  • जल-तणांमुळे डासांची अपरिमित वाढ व त्यामुळे होणारे भयंकर आजार.

तणांचे नियंत्रण :

  • तणांचे समूळ उच्चाटन
  • पिक लागवड पध्दतीत सुधारीत बदल
  • तणांबाबत राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक व कायदेशीर निर्णय
  • जैविक तणनाशकांचा वापर स्थानिक किटकांचा तण नियंत्रणासाठी वापर स्थानिक वनस्पतींव्दारे तणांचे नियंत्रण.
  • जनमानसात तणांविषयी साक्षरता निर्माण करणे (प्रबोधनात्मक कार्यक्रम)
  • तण-होळी / जाळून निर्माण होणाऱ्या राखेचा खत म्हणून वापर
  • तणांचा विविध गोष्टींसाठी वापर

सर्वांचे लक्ष वेधणारे कॉसमॉसही उपद्रवी – कॉसमस बद्दल डॉ. सचिन पुणेकर सांगतात

कॉसमॉस या उपद्रवी आगंतुक/परदेशी तणाचा शहरांमध्ये, रस्त्याच्या दुतर्फा, टेकड्यांवर, गवताळ कुरणांवर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आहे. ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील. ती सूर्यफुलाच्या कुळातील वनस्पती असून तिची फुलं चटकन लक्ष वेधून घेतात.

हेही वाचा: पळसाला पानं तीनच.. FLAME OF FOREST

कॉसमॉसचे फुलांचे सौंदर्य जनसामान्यांना, पर्यटकांना भुरळ घालत असते. कॉसमॉस या वनस्पतीचा वाढण्याचा वेग हा अधिक आहे. ही वनस्पती कमी पाण्यावर, अगदी ओसाड जमिनीतदेखील उत्तम तग धरू शकते. तसेच हीचा बीजप्रसार थोड्या कालावधीत सर्वदूर होतो. इतका की या वनस्पतीचाच मोठा पट्टा तयार होतो त्यामुळे भरपूर जागा या वनस्पतीने व्यापली जाते. या उपद्रवी परदेशी वनस्पतीमुळे स्थानिक गवताच्या व अन्य वनस्पतींच्या जाती-प्रजाती मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत.

अनेक कीटकांच्या जाती जसे की मधमाशी, भुंगे, फुलपाखरे आता मोठ्या प्रमाणात याचे परागकण गोळा करताना दिसतात. त्याचा देखील परिणाम स्थानिक वनस्पतींच्या परागीभवनावर होत आहे. आपल्या गुरांचे, वन्य तृणभक्षी प्राण्यांचे स्थानिक खाद्य वनस्पती या कॉसमॉस मुळे मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. गुरांना आणि मानवाला देखील या उपद्रवी वनस्पतीची एलर्जी होते.

या वनस्पतीला भरपूर फळे येतात. बीजधारणा मोठ्या प्रमाणात होते. या बिया वाऱ्याबरोबर किंवा इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्वदूर पसरतात. टायरच्या नक्षीमध्ये देखील बिया अडकून बीज प्रसार सर्वदूर होतो, प्राण्यांच्या केसाला चिटकून किंवा इतर माध्यमातून देखील ही वनस्पती इतर ठिकाणी पसरते. काही अतिउत्साही लोक या फुल झाडाच्या बिया आपल्या घराकडे, बागेमध्ये लावण्यासाठी सोबत नेतात. अनेक जणांनी कॉसमॉस चे बीज मोठ्या प्रमाणावर सीड बॉल करून फेकल्या तसेच काही गिर्यारोह्कांकडून देखील दुर्गम भागामध्ये या आगंतुक तणांच्या बियांचा फैलाव अजाणतेपणे करण्यात आला. या वनस्पतीवर कुठलेच नैसर्गिक नियंत्रण नसल्याने ही मोठ्याप्रमाणात फोफावत आहे. त्यामुळेच आम्ही कॉसमॉस व इतर आगंतूक तण हटविण्याची राज्यभरात मोहीम राबवित आहोत.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment