MTDC Celebrates International Year of Millets 2023
MTDC साजरे करणार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष….

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” International Year of Millets 2023 म्हणुन घोषित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना पर्यटनाच्या अद्ययावत सुविधांबरोबर महामंडळांच्या उपहारगृहांमध्ये तृणधान्याचे खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देणार आहे.

पौष्टिक तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या पिकांचा समावेश होतो. पौष्टिक तृणधान्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन इ. सारख्या सुक्ष्म पोषक घटकाने समृध्द असुन ग्लुटेन मुक्त आहेत. पौष्टिक तृणधान्य डायरिया, बध्दकोष्टताण्‍ आतडयाचे आजारास प्रतिबंध करतात तसेच त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, ह्दयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक आहेत. पोष्टिक तृणधान्य आधारित पदार्थ कॅल्शियमची कमतरता कमी करु शकत असल्याने आहारामध्ये त्यांना महत्वाचे स्थान आहे. यामुळे तृणधान्यांची गणना पौष्टिक तृणधान्य अशी करण्यात आली आहे. सदर पिकांचे लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमात सर्व उपहारगृहामध्ये पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा पिकांच्या विविध आणि रुचकर पाककृती तयार करुन त्यांचा अंतर्भाव आरोग्यदायी पदार्थ (Healthier Options) या सदराखाली हॉटेलच्या मेनु कार्डमध्ये जसे की, इटली, डोसा, उत्तप्पा, धिरडे, खिचडी, बिस्किट, केक, मोदक, भाकरी, पापड, लाडु, उपमा इ. तृणधान्यापासुन तयार होणाऱ्या स्थानिक पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. सदरचा पौष्टिक तृणधान्याचा मेनू पर्यटकांना वर्षभर उपहारगृहात उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. पर्यटक निवास / उपहारगृहाच्या दर्शनी भागात पौष्टिक तृणधान्य पदार्थ उपलब्धतेबाबत व त्यांच्या आहारमुल्याबाबत फलक लोगोसह लावण्यात येणार आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने अजिंठा उपहारगृह, लोणार, फर्दापुर, औरंगाबाद, वेरुळ, नाशिक, सोलापुर व इतर प्रादेशिक कार्यालयाच्या शक्य असेल त्या ठिकाणी हुरडा पार्टीचे (ज्वारी) आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक बचत गट, शेतकरी यांच्यामार्फंत नाचणीचे वाळलेले खाद्यपदार्थ्यांचे दर्जेदार प्रकार जसे की पापड, कुरडया, बिस्किट पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. शक्य असलेल्या ठिकाणी स्थानिक अल्प भू-धारक शेतकरी यांना महामंडळाच्या पर्यटक निवासात पौष्टिक तृणधान्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी स्टॉल उभा करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.

जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाशी समन्वय करुन पौष्टिक तृणधान्याबाबत विविध कार्यक्रम राबविणे, स्थानिक शेत ते थेट पर्यटक अशा संकल्पना राबविणे, कृषी महाविद्यालयाशी समन्वय साधुन महामंडळाच्या मोकळया जागेमध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पौष्टिक तृणधान्याची लागवड करणे. स्थानिक शेतकऱ्याशी समन्वय करुन महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांची फार्म टुर आयोजित करणे, अशा संकल्पना अंमलात आणुन पर्यटकांना आरोग्यदायी पर्यटन घडवुन आणावे अशा सुचना मा. व्यवस्थापकिय संचालक श्रध्दा जोशी यांनी दिल्या आहेत.

“महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या निवास व न्याहरी व महाभ्रमण योजनाधारकांना त्यांच्या एककामध्ये तृणधान्याचे पदार्थ पर्यटकांना उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच तृणधान्याचे माहिती फलक लोगोसह लावण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे ही निसर्गरम्य परिसरात, डोंगररांगामध्ये, ऐतिहासिक आणि जागतिक वारसा स्थळांच्या ठिकाणी आहेत. पर्यटनाबरोबरच निसर्ग, पर्यावरण आणि आरोग्य यांची काळजी महामंडळाकडुन घेण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी पर्यटकांना जबाबदार आणि आरोग्यदायी पर्यटन घडवुन आणण्यासाठी महामंडळ कटीबध्द राहणार आहे.” – दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment