पुण्यातल्या 'या' आजी ७० वर्षांपासून विजेशिवाय राहतात...!
पुण्यातल्या ‘या’ आजी ७० वर्षांपासून विजेशिवाय राहतात…!

शहरी भागांत बहुतांश ठिकाणी २४ तास आणि ३६५ दिवस विजेची उपलब्धता असते; ग्रामीण भागात विजेच्या उपलब्धतेचं प्रमाण इतकं नसलं, तरी विजेशिवाय कोणीही राहत नाही; पण पुण्यासारख्या आधुनिक शहरात एक आजी गेल्या ७० वर्षांपासून विजेशिवाय राहतायत आणि तेही स्वतःच्या इच्छेने, असं सांगितलं, तर पटेल तुम्हाला ? नाही ना! पण खरं आहे ते… त्याच आजींची ही गोष्ट…

टीम निसर्गरंग

info@nisargaranga.com

दोन-चार तास लाइट गेले, तरी आपण किती अस्वस्थ होतो. आजी म्हणते, ‘आता पंखा लावता येणार नाही.’ आजोबा म्हणतात, ‘टीव्ही कधी सुरू होणार ?’ आई म्हणते, ‘मिक्सरवरची कामं खोळंबली आहेत.’ बाबा म्हणतात, ‘मला मोबाइल आणि लॅपटॉप चार्ज करायचा होता… ‘

किती अवलंबून आहोत ना आपण विजेवर ! विजेशिवाय आपलं पानही हलत नाही, असं आपल्याला वाटतं. असं असलं तरी, पुण्यासारख्या प्रगत शहरात राहूनही एक आजी गेल्या सत्तर वर्षांपासून विजेशिवाय राहत आहेत. आपलं जगणं निसर्गाशी पूरक असलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे, विशेष म्हणजे वीज नाही म्हणून त्यांचं काहीच अडत नाही. रात्री त्यांचं दार वाजवलं, की अजूनही त्या कंदील घेऊन दार उघडतात. या आजींचं नाव आहे डॉ. हेमा साने Dr. Hema Sane. पुण्यातल्या वनस्पतिशास्त्र संशोधन क्षेत्रातल्या नामांकित तज्ज्ञांमध्ये डॉ. हेमा साने यांचं नाव मोठं आहे.

मध्यवर्ती पुण्यात श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडून तुळशीबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचं घर आहे. आजपर्यंत त्यांनी घरामध्ये कधीच विजेचा वापर केलेला नाही. अलीकडे त्या कंदिलाऐवजी सौर ऊर्जेवरचा दिवा वापरायला लागल्या आहेत, एवढंच काय ते नवीन. ‘पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करा, तुमच्या गरजा कमी ठेवा,’ असं सातत्यानं सांगितलं जातं. डॉ. साने यांनी या पद्धतीने प्रत्यक्षात ७० वर्षं राहून दाखवलं आहे. डॉ. साने या विज्ञानाच्या पुरस्कर्त्या आहेत; पण त्याचा वापर चांगल्या कामासाठी झाला पाहिजे, असं त्यांना वाटतं. तुम्ही त्यांना कधी भेटलात आणि विचारलंत, की ‘वीज नाही म्हणून तुम्हाला काही अडचणी येतात का,’ तर त्या हसतात. ‘दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. त्या वेळेत, वाचन-लेखन करते. रात्री प्रकाशाची गरज पडत नाही,’ असं त्या सांगतात.

या आजींचं घर म्हणजे पक्ष्यांचं हक्काचं निवासस्थान आहे. त्यांच्या घरालगतच्या झाडा-झुडपांमध्ये दयाळ, नाचण, साळुंकी, भारद्वाज, धनेश, चष्मेवाला, सूर्यपक्षी असे वेगवेगळे पक्षी राहतात. त्यांच्यावर दोन तीन मांजरं नजर ठेवून असतात. त्यांच्या घराला लागूनच एक विहीर आहे. घरात  महापालिकेचं पाणी येतं; पण त्याचा वापर त्या फक्त पिण्यापुरता करतात. इतर कामासाठी लागणारं पाणी विहिरीचंच वापरतात.

हेमा साने यांनी १९६२मध्ये एमएस्सी आणि पीएचडी केली आहे. पुण्यातल्या आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. कॉलेजला जाताना त्यांनी बस, रिक्षा, दुचाकी वापरली नाही. त्या घरापासून कॉलेजपर्यंत चालत जात होत्या. पुढे त्यांनी इंडॉलॉजी या विषयातही बीए, एमए आणि ‘एमफिल’ पर्यंत शिक्षण घेतलं. निवृत्त झाल्यानंतरही त्या शांत बसल्या नाहीत. त्यांनी वनस्पतिशास्त्र, पर्यावरण, प्राच्यविद्या अशा विविध विषयांवर तीसहून अधिक पुस्तकं लिहिली आहेत.

वीज वापरत नाहीत, म्हणून अनेक लोक त्यांच्यावर टीकाही करतात; पण त्या तिकडे दुर्लक्ष करतात. ‘लोकांना आता विजेची सवय झाली आहे; पण आपले पूर्वज तर विजेशिवाय राहत होतेच की; मग मी तसा जगण्याचा प्रयत्न केला तर बिघडलं कुठे,’ हा प्रश्न त्या आपल्याला विचारतात. वनस्पतिशास्त्र विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी साने आजींकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. मुलं त्यांना लॅपटॉपवर केलेलं काम दाखवतात आणि आजी त्यांना हातातल्या पुस्तकांचे संदर्भ देतात. निसर्गाबद्दलचे प्रगत विच ऐकण्यासाठी या आजींना सगळ्यांनी एकदा तरी भेटलंच पाहिजे.

आपल्याला परिचयाचे असे कोणी अवलिया निसर्गमित्र असतील तर आम्हाला नक्की कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment