दर वर्षी किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करा. तुमच्यासोबत ते झाडही वाढताना पाहून तुम्हाला जो आनंद होईल, त्याची कशाशीच तुलना करणं शक्य नाही. झाड वाढेल, त्यावर पक्षी येतील, घरटी बांधतील, त्यांची पिल्लं किलबिलाट करतील, झाडावरची फळं ते पक्षी खातील आणि तुम्हालाही मिळतील. झाड मोठं झाल्यावर सुखाच्या सावलीत तुम्ही बसू शकाल. या सगळ्यातून आपोआपच तुमचं त्या झाडाशी नातं तयार होईल आणि ते नातं चिरकाळ टिकणारं असेल, यात शंका नाही. हे बोल आहेत…आपल्या देशातील जादाव पेयांग Jadav Payeng यांचे…या माणसाने आजवर कैक झाडांची लागवड आणि जोपासणूक केली आहे…त्यांच्याविषयी….
अनिकेत कोनकर
जंगलाबद्दलच्या गोष्टी आपण अगदी लहानपणापासून ऐकत असतो. जंगल म्हणजे निसर्गाचं एक नितांतसुंदर रूप आहे. निसर्गातील सगळे घटक गुण्यागोविंदाने तिथे नांदत असलेले आपल्याला अनुभवायला मिळतात. तऱ्हेतऱ्हेच्या पक्ष्यांपासून वेगवेगळ्या प्राण्यांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या कीटकांपासून सूक्ष्म बुरशी आणि शेवाळापर्यंत असे सगळे प्रकार जंगलात असतात. या सगळ्या परिसंस्थेचा मूळ आधार कोणता असतो? तर, त्याचं उत्तर आहे झाडं.
छोट्याशा गवतापासून उंचच उंच बांबूंपर्यंत, जांभळं-आंब्यांसारख्या गोड फळांच्या झाडांपासून कडू कारंद्यांच्या वेलांपर्यंत हरेकप्रकारची झाडं जंगलात असतात. प्रत्येक झाडावर वेगवेगळ्या प्रकारचे सजीव अवलंबून असतात. जंगलांची ही परिसंस्था वर्षानुवर्षांच्या कालावधीनंतर तयार झालेली असते. अलीकडच्या काळात आपल्याला हे वाक्य हमखास वाचायला मिळतं, की ‘माणसाने जंगलतोड केली आणि सिमेंटची जंगलं उभारली.’ पृथ्वीवर कमी-अधिक प्रमाणात सगळीकडेच हे सुरू आहे. एकीकडे, जंगलं कमी होत असल्यामुळेच हवामानबदलासारखे दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचं संशोधन करणारा माणूसच आहे. दुसरीकडे, हे दुष्परिणाम माहिती असूनही अगदी निर्दयपणे जंगलतोड करून पृथ्वीला उघडं-बोडकं करणाराही माणूसच आहे. या पार्श्वभूमीवर, स्वतःचं जंगल उभारणारा माणूसही आहे आणि तो आपल्या भारतात आहे, हे सांगितलं तर खरं वाटेल का? खरं वाटत नसलं, तरीही ते खरं आहे. जादाव पायेंग असं त्या व्यक्तीचं नाव. जादाव यांच्या कार्यामुळे त्यांना फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया असा किताब मिळालेला आहे.
आसाम राज्यातल्या जोरहाटजवळ मजुली नावाचं एक बेट ब्रह्मपुत्रा नदीत आहे. नदीत असलेलं हे जगातलं सर्वांत मोठं बेट. जादाव यांनी त्या बेटावर ५५० हेक्टर क्षेत्रावर जंगल वाढवलंय. म्हणजे किती मोठं क्षेत्र आहे याचा अंदाज बांधण्यासाठी एक छोटं गणित मांडू या. ५५० हेक्टर म्हणजे जवळपास १३६० एकर. एक एकर म्हणजे ४० गुंठे. एक गुंठा क्षेत्रात एक मध्यम आकाराचं घर व्यवस्थिपणे बांधता येऊ शकतं. यावरून ५५० हेक्टर म्हणजे किती भव्य क्षेत्र आहे, याचा अंदाज आला असेल. जादाव यांच्या ३०हून जास्त वर्षांच्या मेहनतीतून हे जंगल उभं राहिलं आहे. १९७९ साली साधारण १६ वर्षांचे असताना जादाव यांनी लागवडीला सुरुवात केली. अतिप्रचंड पावसामुळे मजुली बेटावर पूर आला आणि नंतर प्रचंड उन्हाळा झाला. पुरामुळे बेटावर वाहून आलेले शेकडो साप नंतर या उन्हामुळे मरून पडलेले जादाव यांना दिसले. तेव्हा त्यांना खूपच वाईट वाटलं. जमिनीची धूप रोखण्यासाठी काय करता येईल, याचा विचार ते करू लागले. जवळच्या एका गावातल्या आदिवासींना त्यांनी याबद्दल विचारल्यावर त्यांनी झाडं लावायचा सल्ला दिला.
हेही वाचा: बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया DR. SALIM ALI
खासकरून बांबूची लागवड करायला त्यांनी सांगितलं. कारण वाईट हवामानातही बांबू तग धरून राहू शकतात. त्या आदिवासींनी जादाव यांना २०-२५ रोपं आणि काही बियाही दिल्या. त्यांची जादाव यांनी लागवड केली. मोठ्या जंगलासाठीची ती छोटीशी मुहूर्तमेढ होती. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. वृक्षारोपणाची त्यांनी सवयच लावून घेतली. त्यातूनच एवढ्या वर्षांनी एक सदाहरित जंगल उभं राहिलं आहे. ते शाळेतही गेले नाहीत. निसर्गालाच त्यांनी आपला गुरू मानलं. दर वर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात ते नवी लागवड करतात. उर्वरित नऊ महिन्यांत आपल्या जंगलातून बियाणं गोळा करतात. त्यांच्या जंगलात किमान १२० प्रकारचे पक्षी, हत्ती, एकशिंगी गेंडे, वाघ असे प्राणीही वास्तव्याला आहेत. दुधाच्या उद्योगातून ते आपला चरितार्थ चालवतात. दुधासाठी पाळलेल्या गायींना ते जंगलात चारतात. त्यांच्या जंगलाला मुलाई फॉरेस्ट असं नाव पडलं आहे. कारण मुलाई हे जादाव यांचं टोपण नाव आहे.
हेही वाचा: सीड मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई!
ते म्हणतात, की जंगल वाढवणं तितकंसं कठीण नाही; निसर्ग त्याचं काम करत असतो. त्यामुळेच जंगल वाढतं; पण त्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे माणूस. त्यांचं हे वाक्य आपल्याला लाजेने खाली मान घालायला लावणारं आहे. त्यांच्या जंगलातही अनेक शिकाऱ्यांचा अनुभव त्यांना आला आहे. पत्रकार आणि वन्यजीव फोटोग्राफर जितू कालिता यांनी २०१०मध्ये सर्वप्रथम जादाव यांच्याबद्दल लेख लिहिला आणि त्यानंतर अनेक माध्यमांमध्ये त्यांची गोष्ट प्रसिद्ध झाली. त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या कार्याचं कौतुक झालं. फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया हा किताब त्यांना मिळाला. शिवाय पद्मश्री सन्मानानेही त्यांचा गौरव झाला आहे.
‘द हिंदू’मध्ये जादाव यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. ती सगळी मुलाखतच प्रेरक आहे; पण त्यातलं एक वाक्य मनाला विशेष भावणारं होतं. जगभरात जंगलं कमी होत आहेत. त्यावर काय उपाय करता येऊ शकेल, असा प्रश्न मुलाखतकाराने त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर विचार करण्यासारखं आहे. ‘लहान मुलांना निसर्गावर प्रेम करायला शिकवा. बाकीचं काम आपोआप घडत जाईल,’ असं त्यांनी सांगितलं. मुलांवर त्यांना किती विश्वास आहे, हे यातून दिसतंच; शिवाय जंगलांचं भविष्य मुलांच्या हाती आहे, हा त्यांचा संदेशही विशेष महत्त्वाचा आहे. त्यावर अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. निसर्गावरचं प्रेम हे बेगडी असून उपयोगी नाही, तर ते कृतीतून दिसायला लागतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दुसऱ्या कोणी सांगून होत नाही, स्वतःला वाटलं तरच होतं. म्हणूनच तुम्हीही या फॉरेस्ट मॅनकडून प्रेरणा घ्या आणि दर पावसाळ्यात तुम्हाला शक्य असेल तिथे कमीत कमी एक तरी झाड लावा. जास्त झाडं लावणं शक्य असेल तर उत्तमच; पण किमान दर वर्षी किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करा. तुमच्यासोबत ते झाडही वाढताना पाहून तुम्हाला जो आनंद होईल, त्याची कशाशीच तुलना करणं शक्य नाही. झाड वाढेल, त्यावर पक्षी येतील, घरटी बांधतील, त्यांची पिल्लं किलबिलाट करतील, झाडावरची फळं ते पक्षी खातील आणि तुम्हालाही मिळतील. झाड मोठं झाल्यावर सुखाच्या सावलीत तुम्ही बसू शकाल. या सगळ्यातून आपोआपच तुमचं त्या झाडाशी नातं तयार होईल आणि ते नातं चिरकाळ टिकणारं असेल, यात शंका नाही.
आपल्याला परिचयाचे असे कोणी अवलिया निसर्गमित्र असतील तर आम्हाला नक्की कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.