नेपाळच्या बाजारात गेंड्यांची ‘टक्कर’ Rhino Fight in Nepal
नेपाळच्या मुख्य बाजारपेठेत दोन अवाढव्य एकशिंगी गेंडे एकमेकांशी जीवघेणी फाइट करतानाचा Rhino Fight in Nepal व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन अवाढव्य एकशिंगी गेंडे थेट एका शहराच्या मुख्य रस्त्यावर एकमेकांशी जीवघेणी फाईट करताना दिसत आहेत.
ही धक्कादायक घटना नेपाळमधील जगप्रसिद्ध ‘चितवन नॅशनल पार्क’च्या (Chitwan National Park) वेशीवर असलेल्या सौराहा (Sauraha) या गजबजलेल्या पर्यटन शहरात घडली आहे.
घडलय असं की, चितवन राष्ट्रीय उद्यानातून एक मोठा वयस्क गेंडा चुकून शहरात शिरला होता. त्याच्या पाठोपाठ आणखी एक तरुण गेंडा तिथे आला. भर वस्तीत आणि वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावर हे दोन महाकाय प्राणी आमनेसामने आले आणि त्यांच्यात थेट वर्चस्वाची लढाई सुरू झाली. एकमेकांवर शिंगांनी वार करत, रस्त्यावरील दुकानांच्या दिशेने धावून जात त्यांनी तब्बल काही वेळ धुमाकूळ घातला. एका पर्यटकाने हॉटेलच्या बाल्कनीतून हा संपूर्ण थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
नागरिकांची धावपळ, बाजारपेठ बंद
रस्त्यावरील हे भयंकर युद्ध पाहून स्थानिक नागरिक, दुकानदार आणि पर्यटकांची मोठी धावपळ उडाली. भीतीपोटी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. सुदैवाने, या गेंड्यांनी कोणत्याही माणसावर किंवा वाहनावर हल्ला केला नाही. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून, विशिष्ट आवाज करत दोन्ही गेंड्यांना सुखरूपपणे पुन्हा जंगलाच्या दिशेने हाकलून लावले.
हा प्रसंग सोशल मीडियावर एक रंजक किंवा अंगावर काटा आणणारा प्रकार म्हणून पाहिला जात असला, तरी वन्यजीव तज्ज्ञांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
अधिवासावर मानवी अतिक्रमण: वन्यजीव संशोधकांच्या मते, “गेंडे मानवी वस्तीत घुसलेले नाहीत, तर माणसांच्या वस्त्या आणि हॉटेल्स त्यांच्या जंगलात घुसले आहेत.” सौराहा हे शहर चितवन राष्ट्रीय उद्यानाला लागूनच विकसित झाले आहे. येथे पर्यटकांसाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिमेंटचे रस्ते मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहेत.
जागा कमी पडतेय: चितवन पार्कमध्ये संवर्धनाचे प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे गेंड्यांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी त्यांच्यासाठी असणारा मूळ नैसर्गिक अधिवास आकुंचन पावत आहे. प्राण्यांना फिरण्यासाठी आणि त्यांच्या हद्दी (Territory) निश्चित करण्यासाठी पुरेशी जागा न मिळाल्यामुळे, त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता थेट मानवी वस्त्यांमध्ये आणि रस्त्यांवर येऊ लागला आहे.
नेपाळमधील ही घटना केवळ एका व्हिडिओपुरती मर्यादित नसून, संपूर्ण जगासाठी एक धोक्याची घंटा आहे. वन्यजीवांच्या कॉरिडॉरमध्ये (फिरण्याच्या मार्गावर) होणारे मानवी अतिक्रमण जर वेळीच रोखले नाही, तर भविष्यात ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ आणखी तीव्र होऊन दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.