‘भारत फोरकास्ट सिस्टम’ प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य! Bharat Forecast System
नैसर्गिक आपत्तींचा अचूक अंदाज घेऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ Bharat Forecast System – BFS या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा आपल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात समावेश करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयामुळे राज्यातील मान्सूनचा अंदाज, चक्रीवादळे, अतिवृष्टी आणि पूरस्थिती यांसारख्या आपत्तींचे व्यवस्थापन अधिक सक्षम आणि अचूक होणार आहे.
‘भारत फोरकास्ट सिस्टम’ काय आहे?
‘भारत फोरकास्ट सिस्टम’ ही पूर्णपणे भारतात विकसित केलेली प्रगत हवामान अंदाज प्रणाली आहे. ही प्रणाली इस्रो (ISRO), भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि देशातील अग्रगण्य संशोधन संस्थांच्या उपग्रहांच्या डेटावर आधारित काम करते.
ही प्रणाली भारत सरकारच्या केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय (Ministry of Earth Sciences – MoES) अंतर्गत येणाऱ्या भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने विकसित केली असून यासाठी इस्रोतर्फे उपग्रहांद्वारे अचूक आणि रिअल-टाइम डेटा पुरविण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी ने हवामानाच्या प्रगत आणि गणितीय मॉडेल्सचे (Numerical Weather Prediction) संशोधन केले आहे.
महाराष्ट्रासाठी ही प्रणाली का महत्त्वाची?
महाराष्ट्राला दरवर्षी कोकण किनारपट्टीवरील चक्रीवादळे, पश्चिम महाराष्ट्रातील पूर, विदर्भ-मराठवाड्यातील अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो.
या स्वदेशी प्रणालीमुळे ढगफुटी, अचानक येणारा पूर (Flash Floods) आणि वादळांची पूर्वकल्पना काही तास आधीच मिळणार आहे.
अचूक अंदाज मिळाल्यामुळे आपत्ती प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला पुरेसा वेळ मिळेल, ज्यामुळे जीवितहानी शून्यावर आणणे शक्य होईल.
अचूक हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पूर्वतयारी करता येईल.
ही प्रणाली अतिशय सूक्ष्म पातळीवर (Micro-level) म्हणजेच अगदी तालुका किंवा गावनिहाय हवामानाचा अचूक अंदाज वर्तवू शकते.
महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला (State Disaster Management Control Room) थेट या ‘भारत फोरकास्ट सिस्टम’शी जोडले आहे. जिल्हा पातळीवरील नियंत्रण कक्षांनाही याचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रणालीच्या एकत्रीकरणामुळे (Integration) आता उपग्रहाकडून मिळणारा डेटा थेट स्थानिक प्रशासनापर्यंत काही मिनिटांत पोहोचेल आणि तात्काळ मदतकार्य सुरू करता येईल. ‘भारत फोरकास्ट सिस्टम’चे हे यंत्रणा प्रामुख्याने आगामी मान्सूनच्या काळात राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.