सिंधुदुर्गात साकारतय पहिलं आशियातील सागरी संग्रहालय INS Guldar
सिंधुदुर्गात साकारतय पहिलं आशियातील सागरी संग्रहालय INS Guldar

सिंधुदुर्गात साकारतय पहिलं आशियातील सागरी संग्रहालय INS Guldar

कोकणच्या पर्यटन वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय नौदलात चार दशके शौर्य गाजवलेली आणि जानेवारी २०२४ मध्ये निवृत्त झालेली युद्धनौका ‘आय एन एस गुलदार’ INS Guldar आता एका नव्या ऐतिहासिक पर्वासाठी सज्ज झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्रकिनाऱ्याजवळ, २० ते २२ मीटर खोल सागरतळाशी गुलदार ही युद्धनौका मंगळवारी सुरक्षितरित्या पोहोचली. भारत आणि आशिया खंडातील अशा प्रकारचे हे पहिलेच सागरी पर्यटन संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळभित्ती प्रकल्प ठरणार आहे. या नौकेला तळाशी स्थिर करण्याची मोहीम ३६ तास सुरू होती.

गुलदारचा आव्हानात्मक प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या दूरदृष्टीतून ही युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाला (MTDC) विनामूल्य देण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये याचे औपचारिक हस्तांतरण झाले.

इंजिन नसलेल्या या महाकाय नौकेला टग बोटींच्या साहाय्याने खेचून विजयदुर्ग किनारपट्टीवर आणण्यात आले.  नौकेच्या पोटात असलेले सर्व पर्यावरणास हानिकारक घटक काढून पूर्ण स्वच्छता करण्यात आली. १८ मे २०२६ रोजी प्रथम भागाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर, १९ मेला ही नौका सागरतळाशी यशस्वीरित्या विराजमान झाली.

पर्यटकाच्या सेवेत लवकरच दाखल होणार

हे संग्रहालय पर्यटकांसाठी एक वेगळेच जग असणार आहे. स्कूबा डायव्हिंग आणि पाणबुडीच्या (Submarine) सहाय्याने पर्यटक थेट सागरतळाशी जाऊन या युद्धनौकेचा थरारक अनुभव घेऊ शकतील. कृत्रिम प्रवाळभित्तीमुळे अवघ्या एका वर्षात येथे रंगीबेरंगी मासे, प्रवाळ, स्पंज आणि सागरी वनस्पतींचे एक स्वयंपूर्ण जग विकसित होणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘PADI’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमाणित स्कूबा डायव्हर्स मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत.  तरुणांसाठी ‘PADI’ शी संलग्न ‘डाइव्ह मास्टर्स’ चे शैक्षणिक अभ्यासक्रम येथे उपलब्ध होणार आहेत यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.

सेवानिवृत्त जहाजांचे अशा प्रकारे पाणबुडी संग्रहालय व कृत्रिम प्रवाळभित्तीत रूपांतर केल्यामुळे त्यांचा इतिहास पुढील अनेक शतकांसाठी जपला जाणार आहे. या प्रत्येक जहाजामागे सेवा बजावलेले नौसैनिक आणि त्यांची शौर्यगाथा यामुळे जिवंत राहील.

निलेश गटणे, व्यवस्थापकीय संचालक, MTDC

प्रशासकीय आणि राजकीय नेतृत्व

मुख्यमंत्री यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली MTDC ने हे ‘शिवधनुष्य’ पेलले आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचेही या प्रकल्पाला विशेष मार्गदर्शन मिळाले.

हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी एमटीडीसीचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र सोनवणे, वरिष्ठ व्यवस्थापक शिप्रा बोरा, प्रादेशिक अधिकारी दीपक माने आणि व्यवस्थापक (बांधकाम) दीपक हरणे व त्यांच्या टीमने या मोहिमेचे नियोजन आणि संयोजन केले आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!