Leeches Manisha Koirala मनीषा कोईराला आणि जळवा / जळू
मनीषा कोईराला आणि जळवा / जळू  Leeches

तु ही रे गाण्याच्या वेळी मलाही जळवा चावल्या होत्या.. अभिनेत्री मनीषा कोईरालाने सांगितलाय तिचा अनुभव..

पावसाळा सुरू की सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये , घनदाट जंगलात जळवांचा Leeches हंगाम सुरू होतो. जळवांचे किस्से यावर एखादे पुस्तक होईल एवढे अनुभव गिर्यारोहक, भटकंतीप्रेमींकडे असतात. काही दिवसांपूर्वी ओटू इंडिया या वेबसाइटवर प्रसिद्ध अभिनेत्री Manisha Koirala मनीषा कोराईरालानेही तिचा अनुभव शेअर केला.

बॉम्बे चित्रपटातील तु ही रे .. या गाण्याचे शुटिंग सुरू असताना आमचा एक शॉट घनदाट जंगलात होता. त्या रस्त्यावर सगळीकडेच जळवा होत्या आणि मी स्कर्ट घातला होता. जळवांपासून वाचण्यासाठी आम्ही अनेक प्रयोग केले, त्यांच्यावर मीठ टाकले, पायाला मीठ लावले, बूट घातले आणि शुटिंग पूर्ण केले.. हा किस्सा एवढ्या वर्षानंतर ही मनीषा कोईरालाच्या लक्षात राहिला असून तिने नुकताच शेअर केला आहे. एकूणच काय तर पावसाळ्यातील जंगल आणि जळवा हे समीकरण भटकंतीप्रेमी चांगलेच ओळखून आहेत.

निसर्गप्रेमी, पर्यटकांसाठी जळू उपद्रवी ठरत असले तरी अलीकडे जळवांना वरदान म्हणूनही बघितलं जातं आहे. जळवा हा अपृष्ठवंशी बाह्यपरजीवी प्राणी आहे. जगभरात, त्याच्या तीनशेहून अधिक जाती आढळतात. त्याचे शरीर अतिशय लवचिक आणि रबरासारखे ताणता येईल असे असते. गोड्या पाण्यात, ओलसर, कुजलेल्या पानांनी झाकलेल्या पायावाटा, तळी, डबकी, दलदलीच्या जागी जळवा राहतात. काही जळवा मासे, बेडूक, गायी-म्हशी किंवा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर जगतात, तर काही कुजलेल्या पदार्थांवर जगतात. दमट जागा त्यांना आवडतात. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये मे महिन्यापासून ते ऑक्टोबरअखेरपर्यंत जळवा सर्वाधिक सक्रीय असतात.

हेही वाचा : मोजक्याच उरल्या रानम्हशी

जळू कडे असते शरीर बधीर करण्याची कला
जळवा अन्नग्रहण आणि रक्त शोषण्यासाठी लहान अग्र चूषकाचा वापर करतात. त्यांच्या जबड्यावर ८५ ते १२८ सूक्ष्म दात असतात. अन्ननलिकेतील ग्रसनीभोवती असंख्य एकपेशीय लालोत्पादक ग्रंथी असतात. या ग्रंथी हिरुडिन स्रवतात. या स्रावामुळे जखम झालेली जागा बधिर होते, तेथील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे जळवा आपल्याला चावतात, रक्त शोषतात, त्यावेळी आपल्याला काही कळत नाही. या स्रावामुळे रक्त गोठण्याला प्रतिबंध होऊन जळू नकळत रक्त शोषून घेते. शोषलेले रक्त ग्रसनीमधून अन्नमार्गाद्वारे पोटात येते. त्याच्या शरीरात रक्त कोठारे असताता. त्यात ते साठवले जातात. पुढे रक्तातील पाणी शोषले जाऊन रक्त जेलीसारखे घट्ट आणि काळसर रंगाचे होते. जळू एकावेळी तिच्या वजनाच्या तीनपट रक्त शोषून घेते. जळवांमुळे जखम होते, पण माणसाचा मृत्यू झाल्याचे ऐकीवात नाही. काही देशात पाण्यात राहणाऱ्या जळवा आढळतात, त्या मात्र पाण्यावाटे शरिरात गेल्यास गंभीर प्रसंग उद्भवून वेळप्रसंगी माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. मासे पकडण्यासाठीही अनेक भागात जळवांचा वापर केला जातो. गळाला जळवा अडकवून माशांना आकर्षित केले जाते.

जळवा ठरत आहेत वरदान
आपल्या पूर्वजांनी जळवांचा उपयोग वैद्यकीय शास्त्रातही केला आहे. प्रामुख्याने आयुर्वेदाचे तज्ज्ञ जळवांचे अनेक उपयोग सांगतात. शहरांमध्येही उपचार पद्धतीत जळवांना मागणी वाढली आहे. रुग्णाच्या शरीरातील साखळलेले व दूषित रक्त काढून टाकण्यासाठी जळवांचा वापर केला जातो. यासाठी विशिष्ट प्रकारच्या जळवांचा वापर केला जातो. त्यांना जंगलात जाऊन शोधून प्रयोगशाळेत रितसर पाळले जाते ज्या भागातील रक्त काढावयाचे तिथे डॉक्टर त्या जळवा ठेवतात. जळवा त्यांच्या सूक्ष्म दातांनी त्या जागी जखम करतात. तो भाग बधीर होतो. त्यामुळे रक्त वाहू लागले की त्या शोषून घेतात. रक्त साखळले तर ते वाहते करण्यासाठी हिरुडिनयुक्त मलमही वापरला जातो. जळवांना मिळालेल्या या नैसर्गिक कौशल्याचा अजून कुठे वापर करता येऊ शकेल याबाबत संशोधकांचा अभ्यास सुरू आहे. 

हेही वाचा: “लाडके डोंगर योजना” 

जळवांचा चावा टाळण्यासाठी
पायांना जळवा चावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पावसाळ्यात, थंडीच्या सुरुवातीच्या काळात जळवा असलेल्या भागातील जंगलामध्ये जाताना सँडल, चप्पल ऐवजी तळवे पूर्ण झाकले जातील असे शूज वापरावेत. आता जळवा चावणार नाहीत, अशा प्रकारचे डिझाइन केलेले शूजही काही मॉलमध्ये बघायला मिळतात. पूर्ण पाय झाकतील अशा पँट घालाव्यात, त्यातही पँटच्या तळाशी लावण्यासारखी साडीच्या फ़ॉलच्या आकाराची वेलक्रोची पट्टीही मिळते. त्याने पँटमधून पायाकडे शिरण्याचा कोणत्याही कीटकाचा मार्ग बंद होतो.

गावाकडचे लोक बुटाला, पायाला तंबाखूचे, मीठाचे पाणी लावतात, जळू आणि कीटक जवळ येत नाही, असे ते सांगतात. गिर्यारोहक जवळ मीठ आणि हळदीच्या छोट्या पिशव्या ठेवतात. अंगाला कुठेही जळू चावला तर, पटकन त्यावर मीठ टाकतात. त्यामुळे जळू पटकन निघतो. मीठ टाकल्याने माणसाला काही वेळासाठी असह्य वेदना होतात, पण जळू निघण्यासाठी ते सहन करावेच लागते, असे जाणकार सांगतात. ओडोमॉस लावून जंगलात जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, पण जंगलातल्या किड्यांसमोर या डासाच्या मलमाचा किती उपयोग होतो याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही.

Photo Courtesy : Leech – Wikipedia

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!