वणवा म्हणजेच Forest Fire म्हंटलं की समोर येतात ते म्हणजे ॲमेझॉन किंवा ऑस्ट्रेलिया मधले वणवे. पण आपल्या भारतात देखील दर वर्षी वणव्यामुळे शेकडो एकर जंगले अथवा वन जमिनी जाळून खाक होतात. याचाच परिणाम म्हणजे तिथला अधिवास पण पूर्णपणे नष्ट होतो. तर आज माहिती घेऊया या वणव्याबद्दल
यंदा आपण भरपूर पाऊस पाहिला आणि वादळेही अनुभवली. वाढत्या थंडीमुळे अधूनमधून हुडहुडीही भरली. मागील आठवड्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पाणी आता आटत जाणार, कोरडी हवा वाढणार अन् झाडांची पानेही गळणार. त्याचसोबत जंगलातील वणव्यांचा (मानवनिर्मित अन् नैसर्गिक) हंगाम सुरू होणार. त्यामुळे पुढील तीन महिने जंगलांसाठी काळरात्र ठरण्याची शक्यता आहे.
वणव्यांची धग, त्यातील उष्णता एवढी प्रचंड असते की झाडे, गवत, लहान झुडपे, पक्षी, प्राणी, कीटक, सरपटणारे प्राणी होरपळून मरतात. जंगलातील तापमान वाढते, वायू प्रदूषण होते आणि जमिनीची धूप होते. एकूणच जंगलांचे खूप नुकसान होते.
Flame of Forest बद्दल वाचा .. नक्की आवडेल
जंगलात लागणारे ९५ टक्के वणवे मानवनिर्मित आहेत. जंगलांबद्दलचा राग व्यक्त करण्यासाठी किंवा चक्क अतिक्रमण करण्यासाठी वणवा लावला जातो. वणवा विझल्यानंतर रिकामी झालेली जागा लोकांना ताब्यात घ्यायची असते. पायथ्याला शेती करणारे काही लोक डोंगरांवरील जंगलाला आग लावतात. त्यामुळे पावसाळ्यात डोंगर उतारावरील राख पायथ्याला येईल आणि झाडांना खत मिळेल असा लोकांचा उद्देश असतो. काही लोक गंमत म्हणून, तर काही वनाधिकाऱ्यांबद्दलचा रोष म्हणून जंगलात आग लावतात.
जंगलांमध्ये, टेकड्यांवरील वाटांवरून चालणाऱ्या अनेकांना सिगरेट, बिडी ओढायची सवय असते. काही मंडळी टेकडीवर, रानावनात बांधलेल्या छोट्या मंदिरातीत उदबत्ती, दिवा लावतात. अनेकदा जोराचा वारा आल्यावर ही उदबत्ती किंवा दिवा गवतावर कलंडतो आणि ते पेट घेते. जानेवारीच्या अखेरीस पानगळ सुरू होते. चैत्र महिन्यापर्यंत जंगलात सर्वदूर पानांचा थर साचतो. त्यातच हवा कोरडी असते. त्यामुळे कोणताही ज्वलनशील पदार्थ पटकन पेट घेतो. सर्वाधिक वणवे मार्च आणि एप्रिलमध्ये लागतात. वन विभागाकडून जानेवारी महिन्यातच वणवा रोखण्यासाठीचे काम सुरू झालेले असते.
माळढोक वाचविण्यासाठी वन विभागाचे विशेष प्रयत्न
जंगलात वणवा लागू नये यासाठी वन विभाग, स्थानिक जंगलप्रेमी खूप प्रयत्न करतात. वणवा लागलाच तर तो पसरू नये म्हणून हातातील कामे सोडून आग विझवायला जातात. जंगलात पाणी आत न्यायचे कसे हा एक मोठा प्रश्न असतो. वणवा लांबवर पसरू नये यासाठी वन विभागातर्फे दर वर्षी वणव्यांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी जाळ रेषा काढल्या जातात. विस्तारलेल्या जंगलामध्ये गवताचे काही पट्टे निवडले जातात. त्या पट्ट्यावरील गवत काढून टाकले जाते. त्यामुळे वणवा लागला तरी, या लांबवरील पट्ट्यांमुळे गवतावरील आग पसरण्याचा मार्ग खंडीत होतो. जानेवारी महिन्यापासूनच जंगलांमध्ये जाळरेषा काढायला सुरुवात होते. वणवा दिसल्यास गावकरी, टेकडीप्रेमी, जंगलप्रेमी मंडळीही यामध्ये मदत करतात.
परदेशात ड्रोन आणि हेलिकॉप्टर च्या साहाय्याने वणव्याची आग विझविण्याची यंत्रणा विकसित झाली आहे. भारतातल्या निसर्ग प्रेमींकडून ही यंत्रणा आपल्या येथेही राबविण्याची मागणी करण्यात येत आहे.
आपण भटकंती करत असताना जारका आपल्याला कुठे वणवा दिसला तर वन विभागाला जरूर संपर्क करा. वन विभाग हेल्पलाइन नंबर 1926
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.