पश्चिम घाटातील बांबू लागवडीवर महत्त्वपूर्ण संशोधन; सावलीतील झाडांमुळे जैवभार वाढीस चालना The Power of Native Shade: How Trees and Soil Boost Bamboo Growth
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील पर्यावरणशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. मिलिंद दिगंबर पाटील आणि डॉ. संजय वसंत देशमुख यांचा बांबू लागवडीवरील महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या Frontiers in Ecology and Evolution या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
“स्थानिक वृक्षांची सावली आणि मातीचे गुणधर्म मेश बांबूच्या वाढीस व जैवभार निर्मितीस कशी चालना देतात?” (Native shade tree proximity and soil synergy enhance biomass accumulation in bamboo Pseudoxytenanthera stocksii (Munro)) या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या या संशोधनात पश्चिम घाटातील स्थानिक बांबू प्रजाती Pseudoxytenanthera stocksii (मेश बांबू) च्या वाढीवर सावली देणाऱ्या स्थानिक वृक्षांचा आणि मातीच्या गुणधर्मांचा होणारा परिणाम अभ्यासण्यात आला आहे.
संशोधकांनी पूर्ण सावली, अंशतः सावली आणि मोकळे वातावरण अशा तीन परिस्थितींमध्ये बांबूच्या वाढीचे आणि जैवभार (Biomass) साठवणीचे तुलनात्मक विश्लेषण केले. पश्चिम घाटातील नैसर्गिक वितरण क्षेत्रातील दहा प्रतिनिधिक ठिकाणांवर हा अभ्यास करण्यात आला.
अभ्यासात असे आढळून आले की स्थानिक वृक्षांच्या घनदाट सावलीखाली वाढणाऱ्या बांबूमध्ये सर्वाधिक जैवभार साठवला जातो. पूर्ण सावलीतील बांबूचा जैवभार अंशतः सावली आणि मोकळ्या जागेतील बांबूपेक्षा अनुक्रमे सुमारे ४६ टक्के आणि ७६ टक्के अधिक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. तसेच सावलीमुळे मातीतील ओलावा, पोषकतत्त्वांची उपलब्धता आणि एकूण मृदा आरोग्य अधिक चांगले राहते, ज्याचा थेट फायदा बांबूच्या वाढीस होतो.
संशोधनात बांबूच्या खोड, फांद्या आणि पानांमधील जैवभाराचे वितरणही तपासण्यात आले. खोडामध्ये सर्वाधिक जैवभार साठवला जात असला तरी वातावरणातील बदलांनुसार त्याचे प्रमाण बदलत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
संशोधकांच्या मते, पश्चिम घाटातील पारंपरिक कृषिवनशास्त्र (Agroforestry) पद्धतीमध्ये स्थानिक सावलीदार वृक्षांच्या सहवासात बांबूची लागवड केल्यास उत्पादनक्षमता वाढू शकते. कमी खर्चातील आणि पर्यावरणपूरक शेती व्यवस्थापनासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. विशेषतः उच्च पर्जन्यमान असलेल्या भागांमध्ये बांबू लागवडीसाठी या संशोधनाचे निष्कर्ष महत्त्वाचे मार्गदर्शक ठरणार आहेत.
या संशोधनामुळे पश्चिम घाटातील स्थानिक बांबू संवर्धन, शाश्वत शेती आणि जैवविविधता व्यवस्थापनाच्या दृष्टीने नवे वैज्ञानिक आधार उपलब्ध झाले आहेत.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.