New Butterfly Species found in Arunachal Pradesh
अरुणाचल प्रदेशात फुलपाखराच्या नव्या प्रजातीचा शोध; भारतीय संशोधकांचे महत्त्वपूर्ण योगदान A New Butterfly Species found in Arunachal Pradesh

अरुणाचल प्रदेशात फुलपाखराच्या नव्या प्रजातीचा शोध; भारतीय संशोधकांचे महत्त्वपूर्ण योगदान A New Butterfly Species found in Arunachal Pradesh

नवी दिल्ली/ईटानगर : प्रसिद्ध फुलपाखरू अभ्यासक कृष्णमेघ कुंटे, फहीम खान आणि उज्वला पवार यांच्या संशोधक पथकाने अरुणाचल प्रदेशातील मायोडिया पास परिसरात फुलपाखराच्या नव्या प्रजातीचा शोध New Butterfly Species लावला आहे. या नव्या प्रजातीला ‘चोनाला अल्बिस्ट्रिक्टा’ (Chonala albistricta) असे वैज्ञानिक नाव देण्यात आले असून, तिचे इंग्रजी नाव ‘नॅरो-बँडेड वॉल’ (Narrow-banded Wall) असे आहे.

हा शोध नुकताच वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे. या शोधा संदर्भातील माहिती प्रसिद्ध फुलपाखरू अभ्यासक डॉ. कृष्णमेघ कुंटे यांनी फेसबूक वर शेअर केली आहे. संशोधकांच्या मते, भारतात आढळणारी ही Chonala वंशातील केवळ दुसरी प्रजाती असून जगभरातील या वंशातील एकूण प्रजातींची संख्या आता दहावर पोहोचली आहे.

Chonala वंशातील फुलपाखरे वर्षातून केवळ एकदाच प्रजनन करतात. त्यांचा उड्डाणकालावधी अत्यंत मर्यादित असून साधारणपणे जूनच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत केवळ दोन महिन्यांचा असतो. ही फुलपाखरे प्रामुख्याने दुर्गम पर्वतीय खिंडींमध्ये आढळतात. या भागांमध्ये पावसाळ्यात वारंवार भूस्खलन होत असल्याने संशोधक किंवा निसर्गप्रेमींची वर्दळ तुलनेने कमी असते.

संशोधकांनी सांगितले की, या नव्या प्रजातीचे निरीक्षण यापूर्वी काही वेळा झाले होते; मात्र तिला सुप्रसिद्ध ‘चुंबी वॉल’ (Chonala masoni) या प्रजातीची समजून चुकीची ओळख करण्यात आली होती. ऑगस्ट २०२५ मध्ये मायोडिया पास येथे प्रत्यक्ष निरीक्षण करताना ही प्रजाती वेगळी असल्याचे डॉ. कृष्णमेघ कुंटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या सखोल अभ्यासातून तिची स्वतंत्र प्रजाती म्हणून ओळख निश्चित झाली.

ईशान्य भारतातील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा शोध मानला जात असून, दुर्गम हिमालयीन प्रदेशांमध्ये अजूनही अनेक अज्ञात प्रजाती दडलेल्या असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

Image Courtesy: MAPRESS.COM

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता  WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!