पाचगणी टेबललँड पर्यावरण संवर्धन पुस्तिकेचे प्रकाशन Pachgani Table Land Coffee Table Book Published
पर्यावरण संवर्धन हीच भावी पिढ्यांसाठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यसाठी आपण प्रत्यक्ष कृतीमधून आपले योगदान दिले पाहिजे. मागील पिढ्यांनी येथील परिसराचे वैशिष्ट्य व वारसा जतन करुन ठेवला आहे. यापुढेही हा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचगणी नगर परिषद व ‘रानवा’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘पाचगणी टेबललँड’ पर्यावरण संवर्धन व जनजागृती विषयक कॉफी टेबल बुकचे प्रकाशन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, महाबळेश्वर-पाचगणी इको सेन्सीटीव्ह झोनच्या संनियत्रण समितीचे अध्यक्ष सुधाकर नांगनुरे, सदस्य अंकूर पटवर्धन, रानवा संस्थेचे उत्कष घाटे आदी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, पाचगणीच्या अद्वितीय नैसर्गिक वारसा, जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती, पक्षी व पर्यावरण संवर्धनाची माहिती पाचगणी टेबललँड या माहिती पुस्तिकेत समाविष्ट असल्याचे सांगून पर्यावरण संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
पाचगणीच्या टेबललँड पठारावर वनस्पती आणि प्राण्यांच्या ६-७ प्रजातींचा उगम झालेला आहे. जगामध्ये कुठेही न आढळणाऱ्या या प्रजाती आपल्याकडे आहेत. म्हणूनच पाचगणी टेबललँड हे पठार वैशिष्ट्यपूर्ण आहे. निसर्गातील काही वनस्पतींचे वैशिष्ट्य व सौंदर्य हे ज्या त्या ठिकाणीच वाढते त्यामुळे याची जपणूक जपणूक करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. येथील पर्यटनविषयक व्यवसाय हा येथील वैशिष्ट्यावरच अवलंबून आहे. आपण हे वैशिष्ट्य जेवढं चांगलं सांभाळू, तेवढे जास्त पर्यटक येतील. जेवढे जास्त पर्यटक येतील. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून अनावधानाने नुकसान होऊ नये यासाठी पर्यटकांना योग्य शिस्त लावण्याची जबाबदारी इथल्या स्थानिक प्रशासन, वन विभाग, गाईड व्यावसायिक तसेच नागरिकांची आहे.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी पुस्तीका तयार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या छायाचित्रकार, माहिती सकंलकांचे, मुद्रकांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच पठारावर प्लास्टीकच्या १०० टक्के रिसायकलद्वारे बनविण्यात आलेल्या बेंचचे उ्दघाटन जिल्हाधिकारी पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.