इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स International Big Cat Alliance (IBCA)
मार्जार कुळातील मोठ्या वन्यप्राण्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स International Big Cat Alliance (IBCA) ची पहिली बैठक येत्या १ आणि २ जूनला भारतात होणार आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ, या विशेष उपक्रमाबद्दल..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी ९ एप्रिल २०२३ रोजी प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या आंतरराष्ट्रीय आघाडीची घोषणा केली होती. जगातील ज्या देशांमध्ये ‘बिग कॅट्स’ म्हणजेच वाघ, सिंह यांसारखे हिंस्त्र प्राणी आढळतात, त्या देशांना एका मंचावर आणणे हा याचा मुख्य हेतू आहे. वन्यजीवांची तस्करी रोखणे, त्यांचे नैसर्गिक अधिवास (जंगले) सुरक्षित करणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी एकमेकांना तांत्रिक व आर्थिक मदत करणे यासाठी ही आघाडी काम करते.
मार्जार कुळातील सात प्रमुख वन्यप्राणी
वाघ (Tiger)
सिंह (Lion)
बिबट्या (Leopard)
हिमबिबट्या (Snow Leopard)
चित्ता (Cheetah)
जग्वार (Jaguar)
पुमा (Puma)
(यातील पहिले ५ प्राणी हे आजच्या घडीला भारतात नैसर्गिक अधिवासात वास्तव्यास आहेत.)
या अलाायन्समध्ये जगातील साधारण ९५ हून अधिक देश (ज्या देशांमध्ये या ७ पैकी किमान एक तरी प्रजाती आढळते) सहभागी झाले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय संस्था, वैज्ञानिक, आणि वन्यजीव संवर्धन करणाऱ्या संस्थाही यात भागीदार आहेत. याचे मुख्यालय भारतात आहे.भारताने ‘प्रोजेक्ट टायगर’ आणि ‘प्रोजेक्ट लायन’ द्वारे वाघ आणि सिंहांची संख्या वाढवण्यात मोठे यश मिळवले आहे. हा यशस्वी पॅटर्न इतर देशांमध्ये कसा राबविता येईल, यासाठी भारतातर्फे मार्गदर्शन करण्यात येते आहे. शिवाय गरीब किंवा विकसनशील देशांना वन्यजीव संरक्षणासाठी निधी आणि आधुनिक तंत्रज्ञान (कॅमेरा ट्रॅपिंग, डीएनए मॅपिंग) उपलब्ध करून देण्यासाठीही मदत करण्यात येते आहे.
याच मोहिमेचा एक भाग म्हणून १ आणि २ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ‘IBCA समिट २०२६’ (जागतिक परिषद) आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीचे पडघम गीरमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या लायन स्पेसिस स्पॉटलाइट या परिषदेत वाजले.
दिल्लीत होत असलेल्या बैठकीमध्ये मोठ्या मांजरांना वाचवा, मानवता वाचवा, परिसंस्था वाचवा (Save Big Cats, Save Humanity, Save Ecosystem) ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेसह ९५ देशांचे राष्ट्रप्रमुख, शास्त्रज्ञ आणि चारशेहून अधिक प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. परिषदेमध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या (Snow Leopard), चित्ता, जग्वार आणि पुमा अशा सात प्रजातींच्या जागतिक संवर्धनासाठी चर्चा, परिसंवाद आणि बैठका होणार आहेत.
“गीर” ठरलय “मनुष्य- वन्यप्राणी सहजीवना”चे मॉडेल
सासन गीर (गुजरात):
गुजरात राज्याचे ‘गीर’ जंगल हे पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवून आर्थिक प्रगती आणि वन्यजीव संवर्धन कसे हाताहात चालवून दाखवता येते, याचे जिवंत उदाहरण आहे,” असे गौरवद्गार गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काढले. मनुष्य-वन्यप्राणी सहजीवनाचे हे उत्तम मॉडेल असल्याचा मुद्दा त्यांनी भाषणातून अधोरेखित केला
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पुढाकाराने सासन, गीर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लायन’ स्पेसिस स्पॉटलाइट (Lion Species Spotlight Event) कार्यक्रमात ते ऑनलाइन माध्यमातून बोलत होते. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम आगामी ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ (IBCA) समिट २०२६ चा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या वेळी गुजरातचे वनमंत्री अर्जुन मोढवाडिया, राज्यमंत्री प्रवीण माळी आणि केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘वसुधैव कुटुंबकम’ आणि ‘प्रोजेक्ट लायन’
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे कौतुक केले, या संकल्पनेतूनच ‘बिग कॅट’ (मोठ्या मांजरांच्या प्रजाती) संवर्धनासाठी ‘IBCA’ सारख्या जागतिक उपक्रमाची सुरुवात झाली. आशियाई सिंहांच्या संवर्धनात स्थानिक लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून सिंह हा येथील संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच सिंहांच्या नैसर्गिक प्रसारासाठी ‘बर्डा वन्यजीव अभयारण्य’ (Barda Wildlife Sanctuary) विकसित केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
जगभरात वास्तव्य असलेल्या सिंहांची संख्या अधिवास नष्ट झाल्यामुळे ३० टक्क्यांहून अधिक घटली आहे. मात्र, भारतात ‘ग्रेटर गीर’ क्षेत्रात सिंहांची संख्या २०२० च्या तुलनेत २०२५ मध्ये ३२ टक्क्यांनी वाढून ८९१ वर पोहोचली आहे. आशियाई सिंहांना ‘वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’ च्या अनुसूची-१ अंतर्गत सर्वोच्च कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.
भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते ‘सिंह संवर्धन माहितीपत्रकाचे’ (Lion Conservation Brochure) प्रकाशन करण्यात आले. प्रादेशिक शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संवर्धनावर आधारित शैक्षणिक चित्रपट दाखविण्यात आले. हा कार्यक्रम जागतिक पातळीवर भारताचे सिंह संवर्धन मॉडेलचे यश अधोरेखित करणारा आणि मानवी-वन्यजीव संघर्ष, हवामान बदल यांसारख्या आव्हानांवर चर्चा करणारा ठरला
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.