पर्यावरण संवर्धनासाठी Ideas4Life Bhupendar Yadav
पर्यावरण संवर्धनासाठी  Ideas4Life

पर्यावरण संवर्धनासाठी Ideas4Life

पर्यावरणीय समस्यांवर उपायवर शोधण्यासाठी, तसेच पर्यावरण संरक्षणाचे नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी केंद्रीय वने पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालय आणि महाराष्ट्र पर्यावरण विभागाच्या सहकार्याने ‘आयडियाज फॉर लाइफ’ Ideas4Life हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या कल्पना, प्रकल्प सुचवावेत, असे आवाहन पर्यावरण मंत्रालयाने केले आहे.

यामध्ये यूजीसी, एआयसीटीई, आयआयटी आणि देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सहभागी होता येणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत स्पर्धकांना प्रस्ताव पाठवता येणार आहेत. आयडियाज फॉर लाइफ या उपक्रमाचा उद्देश आणि माहिती देण्यासाठी पर्यावरण मंत्रालायतर्फे नुकताच आयआयटी मुंबई येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन सत्रामध्ये शाश्वत जीवनशैली आणि विकास या दोन्हीचा समतोल साधण्याबाबत चर्चा केली.

या कार्यक्रमाला विविध शैक्षणिक संस्थांमधील बाराशे विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण दिनानिमित्त सुरू केलेल्या ‘एक पेड मां के नाम’ या मोहिमेअंतर्गत भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आयआयटी मुंबईमध्ये वृक्षारोपण केले.

हेही वाचा: BioE3 Policy ला मंजुरी

जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने पर्यावरण संरक्षण, संवर्धनाकडे गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. यासाठी विकासाच्या दिशेने वाटचाल करताना परिसंस्थेचा विचार करून शाश्वत पर्याय निवडले पाहिजे, असे आवाहन यादव यांनी केले.आर्थिक प्रगती आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांचा यापुढील काळात समतोल साधावा लागणार आहे. विकासासाठी मानवकेंद्रित दृष्टिकोन अपुरा आहे, असे सांगून त्यांनी अधिकाधिक पर्यावरणविषयक जागरूक योजना राबविण्याचा गरज असल्याचे सांगितले.

यादव यांनी या वेळी वाढते तापमान आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या विकासाच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत अन्न, ऊर्जा, औषधे आणि इतर संसाधने पुरविण्यात निसर्गाची आवश्यक भूमिका अधोरेखित केली. प्रत्यक्षरित्या मानवी जीवनाशी जोडलेल्या किंवा अवलंबून आहेत, असे सांगून पृथ्वीचा एक तृतीयांश भाग जैवविविधतेसाठी जतन करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्रालयाचे विशेष सचिव तन्मय कुमार, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (पर्यावरण) प्रवीण दराडे उपस्थित होते. अमनदीप गर्ग, शिरेश बी. केदारे, आयआयटी मुंबईचे संचालक, आणि पर्यावरण मंत्रालायचे, राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते.

आयडियाज फॉर लाइफच्या संकल्पना या उपक्रमासाठी सात संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत. यात पाणी वाचवा, ऊर्जा वाचवा, कचरा कमी करा, ई-कचरा कमी करा, सिंगल यूज प्लास्टिकला नाही म्हणा, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करा आणि निरोगी जीवनशैली चा अवलंब करा, या संकल्पनांचा समावेश आहे. देशभरातील विविध कॉलेज, विद्यापीठांमधील प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या विषयाशी निगडीत नाविन्यपूर्ण पर्याय, कल्पना सुचविणे अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती https://ideas4life.in/lp/ या वेबसाइटवर दिली आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!