पावसाळा सुरू झाला की वेधशाळेकडून पडलेल्या पावसाचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात होते. पावसाच्या नोंदी मिलीमीटरमध्ये सांगितल्या जातात. मुसळधार असेल तर काही अभ्यासक इंचामध्येही पावसाची माहिती देतात. हे सगळे सुरू असतानाच धरणसाठ्याच्या बातम्या सुरू होतात. गेल्या वर्षी या काळात एकढा धरणसाठा होता आता तो किती आहे. पावसामुळे त्यात किती वाढ झाली. पण विस्तीर्ण पसरलेल्या धरणातील पाणी मोजले कसे जात असेल, असा प्रश्ने अनेकांना पडतो. त्यामुळेच जाणून घेऊ या धऱणातील पाणी मोजण्याची पद्धत.
पावसाचे पाणी वर्षभर वापरायला मिळावे यासाठी धरणे बांधायला सुरुवात झाली. या पाण्यातून वर्षभर शेतीला, पिण्यासासाठी, दैनंदिन गरजांसाठी पाणी शहरात, गावात सोडले जाते. पावसाळ्यामध्ये धरणे शंभर टक्के भरली की या वर्षभराची चिंता मिटली असं सगळी मोठी माणसं सांगतात. पाऊस पडायला लागला की धरणाचे आकडे प्रसिद्ध करायला सुरुवात होते.
आपण पाणी कसे मोजतो
पाणी मोजण्याचे एकक (युनिट) वेगवेगळी आहेत. आपण स्थिर पाणी हे लीटर, घनफूट (क्युबिक फूट), घनमीटर (क्यूबिक मीटर) या परिमाणाने मोजतो. वाहते पाणी हे क्सूसेस आणि क्यूमेक यापरिणामाने मोजले जाते. तर धरणातील पाणी हे टीएमसी (थाउजंड मिलियन क्यूबिक फूट) (अब्ज घनफूट) या परिमाणाने मोजतात.
१ क्सूसेस म्हणजे – एका सेकेंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह. या प्रमाणात एका सेकेंदाला २८.३ लिटर पाणी धरणातून वाहत जाते.
१ क्यूमेक म्हणजे – एका सेकेंदाला एक घनमीटर पाण्याचा प्रवाह. या प्रमाणात एका सेकेंदाला एक हजार लिटर पाणी धरणातून वाहत जाते.
१ टीएमसी म्हणजे तब्बल १ अब्ज घनफूट पाणी किंवा २८ अब्ज ३१ कोट ६८ लाख ४६ हजार ५९२ लीटर पाणी.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण उजनीची क्षमता तब्बल ११७.२७ टीएमसी आहे.
त्या पाठोपाठ कोयना धरणामध्ये १०५.२७ टीएमसी पाणी साठवले जाते.
हेही वाचा: आणि ऑर्किडचे पुनर्रोपण यशस्वी झाले
जुलैमध्ये भरपूर पाऊस झाला तर अनेकदा ऑगस्टच्या सुरुवातीलाच धरणे शंभर टक्क्यांनी भरतात, अशा वेळी जल व्यवस्थापनाचे अभ्यासक, इंजिनिअर चर्चा करून धऱणाचे काही दरवाजे उघडतात. अशा धरणाच्या पाणी साठवणीच्या क्षमतेनुसार किती पाणी सोडायचे हे ठरवले जाते. शंभर टक्के धरण भरलेले असताना पाऊस वाढत राहिला तर धरणाच्या क्षमतेवर ताण येण्याची शक्यता आहे. धरणातील पाणी साठा आणि त्याचे व्यवस्थापन खूप बारकाईने केले जाते. पुण्यातील लोकांनी पानशेत धरण फुटल्याचा भयानक अनुभव या पूर्वी घेतला आहे. धरणाची वर्षभर नियमित देखभालही सुरू असते.
या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील बहुतांश धरणे जुलै महिन्याच्या मध्यातही समाधानकारक भरलेली नाहीत. पुढील महिनाभरात किती पाऊस पडतो, त्यावर धरणांमधील पाणीसाठा अवलंबून आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाचा पाऊस सरासरीएवढा तर काही भागात कमी पडणार आहे. त्यामुळे धरणात साठलेले पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह इतर कारणांसाठी लागणाऱया पाण्याचा पुरवठा करण्याबरोबरच शेतकऱयांनाही पाणी द्यायचे आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत सगळी धरणे शंभरटक्के भरावीत, अशी प्रशासनही आशा ठेवून आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.