प्रोजेक्ट टायगर ची ५० वर्षे .. भारतात ३,१६७ वाघांची नोंद India Tiger Count 3167
प्रोजेक्ट टायगर ची ५० वर्षे .. भारतात ३,१६७ वाघांची नोंद

शंभर वर्षांपूर्वी हजारोंच्या संख्येने देशातील जंगलात वास्तव असलेल्या वाघांची संख्या शिकारींमुळे वेगाने घटली. नामेशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांना वाचविण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी प्रोजेक्ट टायगरची घोषणा करण्यात आली. वाघांचा वावर, अधिवास असलेल्या जंगलांना प्रोजेक्ट टायगरचा दर्जा देण्यात आला. या जंगलावर वन विभागाने अधिक लक्ष दिले. तेथील सुरक्षा, वाघांच्या संरक्षणासाठी विशेष काळजी घेण्यात आली. जंगलांमधील वाघांची संख्या कमी होते आहे की घटली हे बघण्यासाठी सरकारने दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्याचा निर्णय घेतला. अधिक काळजी घेतल्यामुळे हळूहळू चांगले बदल दिसायला लागले. कौतुकाची बाब म्हणजे दर चार वर्षांनी जाहीर होत असलेल्या व्याघ्र गणनेच्या आकड्यांमध्ये प्रत्येकवेळी वाघांची समाधानकारक संख्येने वाढ झाल्याचे स्पष्ट होते आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वने पर्यावरण आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी कर्नाटकमध्ये रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गेल्या चार वर्षात वाघांची संख्या दोनशे वाढल्याचे जाहीर केले आहे. देशात २०१८ मध्ये जंगलात राहणाऱया वाघांची संख्या २ हजार ९६७ होती. आता ती ३ हजार १६७ झाली आहे. देशात सध्या ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात ताडोबा-अंधारी, उमरेड-कऱहांडला, पेंच, नवेगाव-नागझिरा, मेळघाट, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. देशातील सर्वाधिक वाघ कर्नाटक, मध्यप्रदेशमध्ये आढळतात. या यादीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर च्या पन्नाशी निमित्त ५० रुपयांचे विशेष नाणे

वाघांची गणना कशी करतात?

आपल्या शहरात, राज्यात किंवा देशात किती माणसं राहतात, हे जाणून घेण्यासाठी सरकार काही ठरावीक वर्षांनी जणगणना करते. त्याप्रमाणेच वन्यप्राण्यांचीही मोजणी केली जाते. त्याला प्रगणना म्हणतात. वाघांच्या मोजणीचीही पद्धत जरा वेगळी आणि हटकेच आहे. पूर्वी वन अधिकारी कर्मचारी, संशोधक जंगलात फिरून वाघांच्या पंजाचे ठसे मिळवायचे, प्रत्येक ठशाचा अभ्यास केला जात असे. त्यावरून नर आहे की मादी याचा अंदाज घेतला जायचा. उन्हाळ्यात रात्रभर जंगलातील पाणवठ्यांवर बसून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वाघांची मोजणी केली जात होती. मात्र, त्यामध्ये खूप त्रुटी राहायच्या. हल्ली वाघांची मोजणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून केली जाते. जंगलात विविध ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवतात. पाणवठ्याजवळ, वाघांच्या पायवाटेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅमेरे बसवले जातात. त्यामधून कोणताही प्राणी क्रॉस झाला की कॅमेरा हळूच त्याचा फोटो टिपतो. गंमत म्हणजे हे कॅमेरे रात्रीच्या अंधारातही फोटो काढू शकतात.

All Images: Devendra Gogate

हेही वाचा: SARISKA व्याघ्र प्रकल्पात येणार अस्वल SLOTH BEAR

वाघांना वाचविण्यासाठी जगभर प्रयत्न

  • भारतात १९७३ पासून वाघांना वाचविण्यास सुरुवात झाली.
  • वाघ राहत असलेल्या जंगलांना विशेष संरक्षण देण्यात आले.
  • या जंगलांना व्याघ्र प्रकल्प (टायगर प्रोजेक्ट) असे नाव देण्यात आले.
  • सुरुवातीला देशात फक्त नऊ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्यांची संख्या ५०पेक्षा जास्त झाली आहे.
  • वाघांना वाचविण्यासाठी आपल्याकडे नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन ॲथोरिटी काम करते.
  • जगातील वाघांना वाचविण्यासाठी ग्लोबल टायगर फोरम ही संस्था काम करते.

मनुष्य आणि वाघांचा संघर्ष वाघांची संख्या वाढणे ही चांगली बाब असली तर महाराष्ट्रात विदर्भातील जंगलांलगत सध्या मनुष्य आणि वाघांमधील संघर्ष वाढला आहे. जंगलातील वाघांची संख्या जास्त असल्याने अधिवासाच्या शोधात काही वाघ अभयारण्यांच्या लगतच्या शेतात,वस्तीजवळ जात आहेत. काही घटनांमध्ये वाघाने गावकऱयांवर हल्ला केला आहे तर काही ठिकाणी आमच्या भागात वाघ नको म्हणून त्याची हत्या करत आहेत. त्यामुळे सरकारला, वन विभागाला वाघांची संख्या वाढविण्यात यश आल्याबद्दल वन्यजीव अभ्यासकांनी कौतूक करतानाच वाढलेल्या संख्येला अधिवास कसा मिळवून देणार यावरही विचार करावा असा सल्ला दिला आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment