देशात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पाड्यापाड्यांमध्ये आदिवासी बांधव खूप वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. शहरांपेक्षा ग्रामीण भागांमधील होळी आगळी वेगळी असते. आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासींचे प्रमाणे कमी असले तरी, निसर्गाशी जवळचे नाते सांगणाऱ्या या आदिवासींनी आपल्या पूर्वजांच्या परंपरा अजूनही जपल्या आहेत.
होळीबद्दल बोलायचे झाल्यास, काही खेड्यांमध्ये पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत तर काही भागात पुढील पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. जळगावजवळील यावल गावात महिनाभर होळीचा उत्सव चालतो. हाताने तयार केलेला संपूर्ण नैसर्गिक गुलाल खेळत सगळे आदिवासी बांधव महिनाभर उत्सवात दंग होतात.
हेही वाचा – उन्हाळा आला की निसर्गाची एक वेगळीच रंगपंचमी सुरु होते, त्यातलाच एक सुंदर रंग म्हणजे पळस
सातपुड्याच्या डोंगररांगांतील होळी आदिवासींमध्ये मोठी आणि मानाची समजली जाते. पंधरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक गावातील / पाड्यातील होळीचे भल्या पहाटे सूर्यो दयासोबत दहन करण्यासाठी थोडथोडके नव्हे तर दीड लाख आदिवासी एका गावात जमतात. होळीसाठी कीड न लागलेला निरोगी बांबू महिनाभर आधी जंगलातून शोधून आणला जातो. हत्यार न वापरता, बांबू आणि घरातील सरपणाची लाकडे वापरून बांधलेली होळी जेव्हा पेट घेते, तेव्हा बांबू सर्वांत शेवटी एका दिशेला पडतो. तो ज्या दिशेला पडेल, त्यावरून गावातील ज्येष्ठ मंडळी पुढच्या वर्षीचा पाऊस किती असेल, शेतीचे उत्पन्न किती मिळेल, याचा अंदाज बांधतात.
अमरावतीजवळच्या धारणीमध्ये आदिवासी होळीत फगवा मागण्याची पद्धत आहे. फगवा म्हणजे सणासाठी मागितलेली देणगी. होळीमध्ये विशेष पारंपरिक वाद्ये वाजवली जातात आणि पारंपरिक सुसुन -गादुली नावाचे नृत्य केले जाते. कोकणात होळीला सावरीच्या झाडाचा एक फोक वापरला जातो. सावरीचा फोक जितका मोठा तितकी होळी मोठी. हा फोक दहनाआधी नाचवला जातो. यथासांग पूजा होऊन मगच त्याचे दहन होते. प्रत्येक आदिवासी जमातीत प्रमुखाला होळीपूजनाचा पहिला मान दिला जातो.
होळीचे हे रूप पौराणिक देवतेच्या कथेपेक्षा निसर्गदेवतेच्या/ आदिवासी कुलदेवतांच्या पूजनाला अधिक महत्त्व देणारे आहे. नृत्य-वादन, आवडती वेशभूषा करण्याचा आनंद आदिवासी घेतात. शेतीची आणि अन्य कामे संपवून चांगल्या उत्पन्नाची वाट पाहत, नवीन वर्षाचे आडाखे बांधत शरीर-मनाला विश्रांती देणारी ही होळी म्हणून विशेष ठरते.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.