जागतिक खवले मांजर दिवस World Pangolin Day 18 Feb 2023
जागतिक खवले मांजर दिवस World Pangolin Day

बेकायदा शिकार आणि कातडेविक्रीमुळे देशातील वाघांची संख्या घटत असल्याचे आपण नेहमीच वाचत आलो आहोत. जगभरात जशी वाघांच्या कातडीला आणि इतर अवयवांना मागणी आहे, तशीच मागणी खवले मांजरांनाही आहे. तस्करीमुळे संकटात सापडलेल्या खवले मांजरांना वाचविण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातील तिसरा शनिवार जागतिक खवले मांजर दिवस World Pangolin Day म्हणून साजरा केला जातो. यंदा १८ फेब्रुवारीला खवले मांजर दिन साजरा करण्यात येणार आहे. चला तर, मग या निमित्ताने जाणून घेऊ या खवले मांजराविषयी…

खवले मांजराला इंग्रजीमध्ये Pangolin म्हणतात. हा निशाचर प्राणी आहे. म्हणजेच तो दिवसा बिळात आराम करतो आणि रात्री शिकारासाठी बाहेर पडतो. खवले मांजराचे प्रमुख खाद्य म्हणजे मुंग्या, वाळवी, आणि लहान किडे. त्याला दात नसतात, पण लांबट तोंड आणि खूप चिकट अशी जीभ असते. वारूळाच्या बिळामध्ये जीभ आत घालून ते मुंग्यांना खाते. खवले मांजरांना निसर्गातील पेस्ट कंट्रोलर असेही गमतीने म्हटले जाते. हे महाशय नसते तर जंगलात मुंग्यांचे भाऊबंद किती प्रमाणात वाढतील, याचा जरा विचार करून बघा.

हेही वाचा: राजापूर तालुक्यातील सडे आणि तिथली कातळशिल्प Petroglyphs

चेंडूचे मांजर

गावाकडचे लोक अनेकदा खवले मांजराला चेंडूवाला प्राणी असे म्हणतात. एरवी लांबसडक दिसणारा हा प्राणी शिकाऱ्याची चाहूल लागली की, स्वतःला वाचविण्यासाठी पटकन अंगाची गुंडाळी करतो आणि चेंडूचा आकार करून घरंगळत खाली जातो. खवले मांजराचे शेपूट चार ते पाच फूट लांब असते. छतावर कौलांची रचना जशी असते, त्याचप्रमाणे नक्षी त्यांच्या अंगावर असते.

Pangolin खवले मांजर

कुठे राहतो हा प्राणी?

  • जगात खवले मांजराच्या आठ प्रजाती (भाऊबंद) आढळतात.
  • पश्चिम घाटात प्रामुख्याने भारतीय खवले मांजरं वास्तव्य करते.
  • भारतीय उपखंडात भारतीय खवले मांजर आणि चिनी खवले मांजर आढळते. कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे अगदी विदर्भाच्या जंगलातही खवले मांजर दिसते.

खवले मांजरांच्या तस्करीत वाढ

गेल्या काही वर्षांत राज्यातील खवले मांजरांची तस्करी धक्कादायक प्रमाणात वाढली आहे. लॉकडाउनपूर्वी आणि लॉकडाउनमध्येही वन विभागाच्या गुन्हे तपास यंत्रणेने छापे टाकून खवले मांजराची वाहतूक, विक्री आणि प्रत्यक्ष खवले मांजरही जप्त केले. या प्रकारांना वेळीच थांबविण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने कृती आराखड्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

२०२० मध्ये प्रथमच खवलोत्सवाचे आयोजन

जागतिक खवले मांजर संवर्धन दिनानिमित्त २०२० मध्ये सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि वन विभागाने चिपळूणमधील डुगवे गावामध्ये पहिल्यांदा खवलोत्सव साजरा केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील चोरटा व्यापार आणि तस्करीमुळे धोक्यात आलेल्या खवले मांजराबद्दल ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी ग्रामस्थांनी खवले मांजराच्या प्रतिकृतीला पालखीत घालून नाचविले आणि घराघरांत त्याचे औक्षण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खवले मांजराचे महत्व स्पष्ट करणाऱ्या कविता आणि गाणी सादर केली होती.

हेही वाचा: विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या ‘टू द स्केल’ प्रतिकृती

खवले मांजराला धोका

खवले मांजर या वन्यप्राण्याबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. त्यातूनच सामान्य लोकांकडून खवले मांजराला मांसासाठी, तसेच जादूटोणासारख्या अंधश्रद्धेसाठी पकडण्यात येते. मात्र, वन्यजीन संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन्यप्राणी पकडणे, बंदिवासात ठेवणे, विक्री करणे, शिकार करणे, वाहतूक करणे हा गुन्हा असून, त्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंत कैद आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. अशाप्रकारे कोणत्याही वन्यप्राण्याच्या शिकारीबाबत कोणतीही माहिती असल्यास वन विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून अथवा १९२६ या वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक आहे.    

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment