‘तेर पॉलिसी सेंटर’ संस्थेने टाटा मोटर्सच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘ तेर ऑलिंपियाड २०२२-२३’ या पर्यावरणविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धे चा पारितोषिक वितरण समारंभ आज माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री व खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेचे हे ८ वे वर्ष होते.
याप्रसंगी प्रदीपकुमार साहू, प्रमोद काकडे, डॉ. शंकरभट कुलसत्यम यांचा पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तेर पॉलिसी सेंटर आयोजित तेर ऑलिंपियाड पर्यावरणविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. या मध्ये सर्व राज्यांमधून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. आजपर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पेन ड्राईव्ह, स्मार्ट फोन, टॅबलेट संगणक अशी पारितोषिके प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते देण्यात आली.
भूस्खलन, पूर, सततचा पाऊस हे चिंतेचे विषय आहेत. हे सर्व जागतिक तापमानवाढीचे हे दुष्परिणाम आहेत. ओझोन स्तर कमी होत आहे.जमिनीचे, पर्यावरणाचे आपले एक नाते आहे,एक संतुलन आहे, ते बिघडू देता कामा नये. आपली स्वतःची ऑक्सीजन बँक आपण तयार केली पाहिजे. त्यासाठी त्यासाठी प्रत्येकाने किमान ७ वृक्ष लावले पाहिजेत. ते जगवले देखील पाहिजेत. स्कुल नर्सरी प्रोग्राम ‘ सारखे उपक्रम राबवले पाहिजे. कोळशाचा उपयोग कमी केला पाहिजे. सौर उर्जा वापरली पाहिजे. कोची सारखे विमानतळ सौर उर्जेवर चालत आहे. हायड्रोजन वर लवकरच गाडया चालतील. असे मत प्रकाश जावडेकरांनी व्यक्त केले.
भारतीय संस्कृती सुरुवातीपासून पर्यावरणस्नेही आहे. देवराई, वृक्ष पूजन सारख्या संकल्पना फक्त भारतात आहेत.विकसित देशांच्या तुलनेत भारतातून प्रदूषण प्रमाण फारसे नाही.विकसित देशांनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात हरित उर्जा संकल्पना मोठया प्रमाणात राबवली जात आहे. जंगले वाढत आहेत. वृक्ष,वीज, पाणी, पर्यावरण वाचवण्यासाठी घराघरातून प्रयत्न झाले आहेत. रियूज, रिसायकल हा मंत्र जपला पाहिजे असेही ते म्हणाले.
हेही वाचा: पुण्यातल्या ‘या’ आजी ७० वर्षांपासून विजेशिवाय राहतात
तेर पॉलिसी सेंटर तर्फे वर्षभर पर्यावरण विषयक अनेक उपक्रम सुरू असतात. याचाच एक भाग म्हणून संस्थेने ७ लाखांहून अधिक वृक्ष दुर्गम, डोंगराळ भागात लावले आहेत असे तेर पॉलिसी सेंटर च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे यांनी नमूद केले.
पर्यावरणाबद्दल विद्यार्थ्यांमधील सामान्य ज्ञान वाढण्याची गरज आहे . फक्त अभ्यासक्रमात आहे म्हणून परीक्षा द्यायची या पेक्षा हवामान बदल व त्या अनुषंगाने आपल्या रोजच्या जीवनातले किंवा निसर्गातले बदल बघताना विदयार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले तर पर्यावरण विषयक जाणीवा जागृत होतील व निसर्गा प्रती संवेदनशीलता येईल . अशा परीक्षांमुळे अवांतर वाचन तेही पर्यावरणाशी निगडित वाचन वाढेल या उद्देशाने या स्पर्धेचं नियोजन केले जाते. अगदी कोवीड च्या काळातही परीक्षा उत्तम पार पडली व त्या काळातही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम होता . ग्रामीण व अति दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग निश्चितच प्रोत्साहन देणारा आहे असे मत डॉ. आपटे यांनी व्यक्त केले
तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे, टाटा मोटर्सचे रोहित सरोज, महेश गावसकर, मयुरेश कुलकर्णी , संस्थेचे विश्वस्त अजय फाटक व्यासपीठावर उपस्थित होते. तेर पॉलिसी सेंटर ‘ चे विश्वस्त अजय फाटक यांनी आभार मानले. गीत धोकते यांनी सूत्र संचालन केले
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com