जम्मू येथे देशातील ७ वे प्रादेशिक हवामान केंद्र सुरू; Seventh Regional Meteorological Centre in Jammu
देशाच्या हवामान अंदाज यंत्रणेचा विस्तार करत केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जम्मू येथे नवीन प्रादेशिक हवामान केंद्राचे Regional Meteorological Centre – RMC उद्घाटन केले. हे देशातील ७ वे प्रादेशिक हवामान केंद्र असून, याद्वारे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना थेट व अचूक हवामान सेवा पुरवल्या जातील. यासोबतच, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी लवकरच लखनऊ येथे अशाच प्रकारचे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
पूर्वी या संपूर्ण हिमालयीन क्षेत्राचे नियंत्रण दिल्ली केंद्रावरून केले जात होते, परंतु आता जम्मू केंद्रामुळे या दुर्गम भागाला अधिक अचूक आणि विशिष्ट सेवा मिळतील. “आता केवळ प्रादेशिक नव्हे, तर जिल्हावार हवामान अंदाज, पर्यटकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना आणि पर्वतीय क्षेत्रांसाठी विशेष अंदाज वर्तवले जातील,” असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले. या केंद्रामुळे अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रेकरू, शेतकरी, वाहतूकदार, जलविद्युत प्रकल्प, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः हिमालयीन क्षेत्रातील ढगफुटी (Cloudbursts) आणि अचानक येणारा पूर (Flash Floods), हिमस्खलन (Avalanches) आणि अतिवृष्टी/बर्फवृष्टी, भूस्खलन (Landslides) आणि विजांसह होणारे वादळ या आपत्तींची पूर्व कल्पना मिळणार आहे

गेल्या दशकात या भागातील हवामान विषयक पायाभूत सुविधांमध्ये मोठी क्रांती झाली आहे.
डोप्लर वेदर रडार (DWR): २०१४ मध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये एकही डोप्लर रडार नव्हते. आज जम्मू, श्रीनगर, लेह आणि बनिहाल टॉप येथे ४ रडार कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, ‘मिशन मोसम’ अंतर्गत अनंतनाग, राजौरी, बारामुल्ला, किश्तवार आणि डोडा येथे ५ नवीन रडार प्रस्तावित आहेत.
हवामान निरीक्षणे (Observatories): या क्षेत्रातील वेधशाळांची संख्या वाढून आता ५६ झाली आहे. यात १५ मॅन्युअल वेधशाळा, २५ स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS) आणि १६ स्वयंचलित पर्जन्य मोजके (ARG) समाविष्ट आहेत (२०१४ मध्ये केवळ १३ AWS आणि १४ ARG होते).
नवे बदल: नुकतेच कारगिल, उखराल (रामबन) आणि माता वैष्णोदेवी भवन येथे स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS) सुरू करण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षात आणखी ८ AWS आणि ५ ARG उभारले जातील. तसेच, दैनिक पाऊस देखरेख योजनेअंतर्गत केंद्रांची संख्या ३० वरून ८५करण्यात आली आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.