अवघ्या ५ रुपयांत मिळणार स्थानिक प्रजातींची रोपे; पुणे महानगरपालिकेचा ‘वन महोत्सव २०२६’ उपक्रम Pune Municipal Corporation Van Mahotsav 2026
पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या हरित पट्ट्यात वाढ करण्याच्या हेतूने पुणे महानगरपालिकेच्या उद्यान-वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘वन महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत खास पुणेकर नागरिकांसाठी अत्यंत सवलतीच्या दरात म्हणजेच अवघ्या ५ रुपये प्रति रोप या दराने स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या अभिनव उपक्रमाची सुरुवात उद्या शुक्रवार, दिनांक ५ जून रोजी (जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून) होत असून, हा उपक्रम १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
स्थानिक प्रजातींच्या रोपांवर भर
नागरिकांना आपल्या परिसरात सहज लावता येतील आणि ज्यांचे जतन करणे सोपे जाईल, अशा स्थानिक हवामानाला पूरक असलेल्या प्रजातींच्या वृक्षांची रोपे या महोत्सवात विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. नागरिकांमध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्येकाला परवडणाऱ्या दरात रोपे मिळावीत, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
महोत्सवाचा सविस्तर तपशील:
- कालावधी: शुक्रवार, दि. ५ जून ते १४ ऑगस्ट २०२६
- वेळ: सकाळी ८:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस सोडून)
- स्थान: छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रोड (JM Road), शिवाजी नगर, पुणे – ४११००५.
- दर: फक्त रु. ५/- प्रति रोप
आवाहन:
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुणेकर नागरिकांना या पर्यावरणपूरक उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. “आपले शहर अधिक सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या घरी, परिसरात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे,” असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.