Mitra Kida Foundation मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या किटकांचे संवर्धन आवश्यक
मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या किटकांचे संवर्धन आवश्यक

मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या किटकांचे संवर्धन आवश्यक – Dr. Rahul Marathe, Mitra Kida Foundation

आपल्या स्वयंपाकघराच्या ओट्यापासून घरातील बागेपर्यंतच्या परिसरात सुमारे ३२ किटक आपल्या आजुबाजूला वावरत असतात, मात्र ते आपल्या लक्षातही येत नाही. जैवविधतेमध्ये सुमारे ७० टक्के किटक असून मानवी जीवन समृद्ध करण्यात किटकांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या स्वार्थापोटी होणारा किटकांचा नाश धोकादायक असून किटकांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध किटक विज्ञान संशोधक आणि Mitra Kida Foundation मित्रकिडा फौंडेशनचे संस्थापक-संचालक डॉ. राहुल मराठे यांनी व्यक्त केले. 

करम प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध किटक विज्ञान संशोधक आणि मित्रकिडा फौंडेशनचे संस्थापक-संचालक डॉ. राहुल मराठे यांचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत डॉ. राहुल मराठे बोलत होते. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, भालचंद्र कुलकर्णी आणि डॉ. मंदार खरे आदी मान्यवर उपस्थित होते.  सन्मान सोहळ्यानंतर निसर्गमैत्र हे निमंत्रितांचे मराठी कवी संमेलन झाले. 

भालचंद्र कुलकर्णी आणि डॉ. मंदार खरे यांनी प्रकट मुलाखीव्दारे डॉ. राहुल मराठे यांच्याशी संवाद साधला.

याप्रसंगी बोलताना डॉ. राहुल मराठे म्हणाले की, लहानपाणापासून मला चतुर, फुलपाखरे यांसारख्या नेहमी आढळणाऱ्या किटकांचे आकर्षण वाटत होते. पुढे मी प्राणीशास्त्र विषयात बी.एससी. आणि एम.एससी. केले. तर किटकशास्त्र विषयात पीएच.डी. केली. या क्षेत्रात काम करताना सुरूवातीला मी पेस्ट कंट्रोलसाठी औषधे निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. २०१६ मध्ये मित्रकिडा सोल्यूशन्स आणि मित्रकीडा फौंडेशनची सुरूवात केली. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात माझी पत्नी अश्विनीची मोलाची सोबत मला मिळाली.

हेही वाचा: जीवाश्म इंधनांच्या उच्चाटनासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक नवकल्पना निर्माण झाल्या पाहिजेत

कीटकशास्त्रातील संशोधनाच्या दिशेने सुरू झालेला प्रवासही त्यांनी या वेळी उलगडला. मराठे म्हणाले, नैसर्गिक गोष्टींच्या विघटनाची सोय स्वतः निसर्गाने केली असून त्यामध्ये किटकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे, या जाणीवेतून आम्ही काम सुरू केले. घरातच अनेक प्रकारचे किटक जोपासणे, पाळणे आणि निसर्गाला पूरक ठरतील असे त्यांचे विविध प्रयोग मी केले. यातूनच संरक्षण विभागातील स्फोटके झुरळांच्या मदतीने निकामी करण्यात मला यश आले. एवढेच नाही, तर मधमाशांच्या रिकाम्या पोळ्यातील मेण खाणाऱ्या अळ्यांची शारीरिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्याच प्रकारची मिमिक्री करून आजपर्यंत लष्कराची तीन टनपेक्षा जास्त स्फोटके निकामी करण्याचे काम मी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. तसेच विमानाला पक्षी धडकून होणारे अपघात आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी देशातील विविध विमानतळांच्या परिसरात देखील मी अळ्यांचा योग्य वापर करीत आहे. 

सीयाचीनमधील १४ हजार फूट उंच जागेवर कचऱ्याच्या विघटनाची समस्या सोडविण्यासाठी देखील या अळ्यांचा वापर केला असल्याचे त्यांनी सांगितले. तिथे दर दिवशी २०० किलो कचऱ्याचे विघटन करण्याचा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे. भविष्यामध्ये जागतिक पातळीवर प्रोटीनची कमतरता निर्माण होणार असून या पार्श्वभूमीवर आज किटकांमधील प्रोटीन मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. भारतातही याविषयी संशोधन सुरू असून जैवविविधतेला धोका न पोहोचवता मानवी गरजा पूर्ण करण्याचे आव्हान आज आपल्यासमोर आहे, याची जाणीव संशोधकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी ठेवणे आवश्यक आहे, असेही डॉ. मराठे यांनी यावेळी सांगितले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!