Padmashree Saalumarada Thimmakka कथकनृत्यातून समोर येणार पर्यावरण संवर्धनाची कथा
कथकनृत्यातून समोर येणार पर्यावरण संवर्धनाची कथा Padmashree Saalumarada Thimmakka

कथकनृत्यातून समोर येणार पर्यावरण संवर्धनाची कथा Padmashree Saalumarada Thimmakka

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकमधील पद्मश्री सालूमरदा थिमक्का Padmashree Saalumarada Thimmakka यांचा जीवनप्रवास अनुभविण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमीत्त आहे कथक गुरु शमा भाटे यांची नाद-रूप संस्था व आर्ट हब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांच्या सहकार्याने आयोजित ‘उन्नयन’ या नृत्यनाटिकेच्या शुभारंभाच्या प्रयोगाचे.

शनिवार, दि १६ नोव्हेंबर, २०२४ रोजी विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील ओपन थिएटर या ठिकाणी सायं ७ वाजता सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. कार्यक्रमातील काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील.

Arun4speed - During a photosession, CC0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=75435880 द्वारा
Padmashree Saalumarada Thimmakka | Image: Wikimedia commons

पद्मश्री सालूमरदा थिमक्का या कर्नाटक राज्यातील बेंगळूरूपासून ८० किमी अंतरावर असणाऱ्या हुलिकल या गावात राहत असून पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. आज त्यांचे वय ११३ वर्षे असून त्यांनी हुलिकल व कुडूर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग व परिसरात आजवर तब्बल ८ हजारांहून अधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे. २०२९ साली त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. याबरोबरच बीबीसीच्या १०० प्रभावी पर्यावरणवादी महिलांच्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश आहे हे विशेष.

हेही वाचा: हवामान बदलांना रोखण्यासाठी बाकू मध्ये भरली परिषद

या नृत्यनाटिकेबद्दल अधिक माहिती देताना गुरु शमा भाटे म्हणाल्या, “थिम्माक्का यांचे हे कार्य जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावे यासोबतच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतून नाद-रूपच्या वतीने आम्ही ‘उन्नयन’ या नृत्यनाटिकेचे आयोजन करीत आहोत. या नृत्य नाटिकेत थिम्माक्का यांचा प्रेरणादायी प्रवास, त्यांचा संघर्ष, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा त्यांनी घेतलेला वसा, कालातीत असलेले त्यांचे कार्य यांचा आढावा घेत एक कथा रचण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. परिणामकारक नृत्य, कथा आणि भावनाप्रधान प्रस्तुती हे या नाटिकेचे वैशिष्ट्य असेल.”

या प्रस्तुतीद्वारे निसर्गाप्रती असलेली आपली सामुहिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धनाचा वसा आणि तुलसी गौडा, किंद्री देवी, सुगुथा कुमारी, राहीबाई पोपेरे, मेधा पाटकर व डॉ. वंदना शिव यांसारख्या पर्यावरण संवर्धनात मोलाचे काम करणाऱ्या महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे भाटे यांनी नमूद केले. अशा प्रकारे पर्यावरण संवर्धनावर करण्यात आलेली ही नृत्यनाटिका प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास देखील शमा भाटे यांनी व्यक्त केला.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!