Amorphophallus Titanum Australia दुर्गंध येणारं एक आकर्षक फूल
दुर्गंध येणारं एक आकर्षक फूल Amorphophallus Titanum Australia

दुर्गंध येणारं एक आकर्षक फूल Amorphophallus Titanum Australia

पावसाचा जोर ओसरला की सह्याद्रीतील पठरावर फुलांचे ताटवे बहरतात. सोशल मीडियावर हौशी छायाचित्रकांकडून फोटो पोस्ट झाले की पर्यटकांची गर्दी वाढत जाते. ऑस्ट्रेलियातील जिलोंग शहरातही सध्या असच काही घडल आहे. जिलोंग या शहरातील वनस्पती उद्यानात दुर्मिळ टायटन अरूम, अमॉर्फोफॅलस टायटॅनम, Amorphophallus Titanum हे फुल फुलले आहे.

टायटन अरूमला कॉर्प्स् फ्लॉवर या नावानेही ओळखले जाते. जगातील सर्वात मोठ्या फुलांपैकी हे एक असून त्याची उंची दहा फुटांपर्यंत मोठी असते. हे फुल झाडाला किंवा वेलीवर येत नाही. ते थेट जमिनीतून कंदातून वर येते. मध्ये मोठे लाल, जाड मेणबत्तीसारखे देठ आणि कडेने स्कर्ट प्रमाणे त्यांची एकच अखंड पाकळी पसरेली दिसते. गंमत म्हणजे दिसायला अतिशय देखणे असलेल्या या फुलाचा वास कुजलेल्या, मृतावस्थेत जास्त काळ बाहेर राहिलेल्या मृतदेहाप्रमाणे येते. तर असे वैशिष्ट्यपूर्ण फुल उद्यानात बहरल्याची माहिती मिळताच नागरिकांनी जिलोंग बॉटनिक गार्डनमध्ये गर्दी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उद्यानाबाहेर पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत.

वर्तमानपत्राचे छायाचित्रकार, सोशल मीडियाचे प्रतिनिधींची फुलांच्या छायाचित्रीकरणासाठी गर्दी होते आहे. आकर्षणामुळे लोक फुलाजवळ जातात, त्यात वाकून बघण्याचा प्रयत्न केला की दुर्गंधीमुळे दूर पळतात. अधिकाधिक लोकांनी हे फुल पाहावे, अशी वनस्पती प्रेमींची इच्छा आहे.

हेही वाचा: हवामान बदलांना रोखण्यासाठी बाकू मध्ये भरली परिषद

निसर्गाने या फुलाला असा कुजलेल्या प्राण्याचा वास देण्यामागे विशेष कारण असल्याचे अभ्यासक सांगतात. या फुलाचे परागीकण वाहून नेण्याचे काम वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या करतात. प्रामुख्याने या माश्यांचा आहार मांस, किंवा कुजलेले मृतदेहा असल्याने वासामुळे त्या फुलाकडे आकर्षित होतात. फुलाच्या मध्यभागापर्यंत जातात, त्यांना खाद्य तर मिळत नाही, पण परत बाहेर पडताना नकळत फुलाचे परागकण वाहून नेतात. या फुलांचे वजन ४० किलोपर्यंत असू शकते, त्यामुळेच एक फुल बहरण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो, असे अभ्यासक सांगतात.

टायटन अरूम सध्या ऑस्ट्रेलियामध्ये फुलले असेल तरी हे फुल मूळचे तिथले नाही. वनस्पती उद्यानात काळजीपूर्वक त्याची लागवड करण्यात आली आहे. इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा येथील वर्षावनातील ठराविक डोंगरावर ही फुले बहरतात. जिथे त्याला बुंगा बंगकाई (बुंगा म्हणजे फूल आणि बंगकाई म्हणजे मृतदेह) असे म्हणतात. इटालियन वनस्पतीशास्त्रज्ञ ओडोआर्डो बेकरी यांनी १८७८ मध्ये याचे प्रथम वर्णन केले. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने या फुलाला संकटग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. नैसर्गिक अधिवासात सध्या हजारपेक्षा कमी फुले शिल्लक आहेत. अधिवास संपुष्टात आल्याने, त्या जागी ऑइलपामची लागवड झाल्याने गेल्या दीडशे वर्षात या वनस्पतीची पन्नास टक्क्यांहून अधिक संख्या घटली असल्याचे आयूसीएनचे मत आहे.

image courtesy: www.downtoearth.org.in

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!