सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात १०० किमीचे अंतर कापून आला नवीन वाघ Sahyadri Tiger Reserve STR
दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी पर्यटक निसर्गरम्य ठिकाणी भटकंतीसाठी रवाना झाले असताना, सह्ह्याद्रीच्या जंगलातही एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. Sahyadri Tiger Reserve STR सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये तबल्ल शंभर किलोमीटर अंतर पार करून नवीन वाघ दाखल झाला असल्याचे वन विभागाने शुक्रवारी जाहीर केले. वन कर्मचाऱ्यांना या नव्या वाघाची कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्रेही मिळाली आहेत. गेल्या वर्षीही याच काळात अजून एक वाघ जंगलात दाखल झाला होता. यात आत अजून एक नर वाघाची भर पडली आहे
गेल्या वर्षी, दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत चांदोली वन्यजीव विभागामध्ये २०१८ नंतर प्रथमच वाघाची नोंद झाली. या वाघाचे नामकरण ‘STR-TI’ करण्यात आले. क्षेत्रीय कर्मचारी वर्षभर ‘STR-TI’ वाघाची दैनंदिन गस्ती, PIP व कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून नियमित देखरेख करत आहेत. विशेष म्हणजे सह्याद्रीतील मुसळधार पावसाळ्यात देखील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘STR-TI’ वाघाच्या हालचालीवर यशस्वीरित्या देखरेख ठेवली. आनंदाची गोष्ट म्हणजे ‘STR-TI’ हा वाघ गेले वर्षभर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्येच वास्तव्य करून आहे. आपल्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांसाठी अनुकूल अधिवास व भक्ष प्राण्यांची संख्या पुरेशी उपलब्ध झाली आहे, हे ‘STR-TI’ वाघाने अधोरेखित केले आहे.
गेले वर्षभर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये व्याघ्र पुनर्स्थापनेसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. ताडोबा व्याघ्र राखीव मधून सह्याद्री व्याघ्र राखीव मध्ये वाघ पुनर्स्थापनेसाठी परवानगी प्राप्त झाली असून, लवरकरच याची कार्यवाही सुरू होणार असून, सह्याद्रीतील वाघांचे अस्तित्व पुर्नस्थापीत करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ, इतर वन्यजीव व त्यांच्या अधिवासावर देखरेख ठेवणेसाठी जंगलामध्ये कायमस्वरूपी कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत. चांदोली वन्यजीव विभागामध्ये देखील सर्वत्र कॅमेरे टॅप लावण्यात आले होते.
दि. २८ ऑक्टोबर, २०२४ रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानमध्ये अधिवास देखरेखीसाठी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी वाघाचे काही फोटो नोंद झाले. तसेच त्या भागात क्षेत्रीय कर्मच्यार्यांना गस्ती दरम्यान वाघाच्या पावलांचे ठसे देखील मिळाले. नोंद झालेले फोटो व्याघ्र प्रकल्पच्या ‘टायगर सेल’ या संशोधन विभागामध्ये तपासण्यात आले. फोटोंचे विश्लेषण केल्यानंतर संशोधन टीमला असे लक्षात आले की, हे फोटो ‘STR-T1’ या वाघाचे नसून, एका वेगळ्याच वाघाचे आहेत. सह्याद्री व्याघ्र राखीवच्या सर्व टीमसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सुरक्षेसाठी ठिकाण स्पष्ट केलेले नाही.
सह्याद्री व्याघ्र भ्रमणमार्गातील वाघांवर अभ्यास करणारे संशोधक श्री. गिरीश पंजाबी यांच्याशी सल्लामसलत केले असता, असे लक्षात आले की, हा वाघ राधानगरी अभयारण्य मध्ये १३ एप्रिल, २०२४ रोजी नोंद झाला होता. राधानगरी अभयारण्य मधून उत्तरेस भ्रमण मार्गावाटे जवळपास १०० कि.मी चा प्रवास करून, या वाघाने आपला मुक्काम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये नोंद केला आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीवचे क्षेत्रसंचालक रामानुजम, तसेच स्नेहलता पाटील, उपसंचालक चांदोली व किरण जगताप, उपसंचालक कोयना यांच्या मार्गदर्शनाखाली या नवीन वाघाचे नामकरण “STR-T2” असे करण्यात आले आहे.
हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर च्या पन्नाशी निमित्त ५० रुपयांचे विशेष नाणे
गेल्या काही वर्षात दक्षिणेस तिलारी ते राधानगरी या व्याघ्र भ्रमणमार्गामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. एकूण १४ वाघांच्या नोंदी या भ्रमणमार्गामध्ये झाल्या आहेत. तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमणमार्गातून’ STR-TI’ व ‘STR-T2’ हे दोन्ही वाघ उत्तरेस सह्याद्री व्याघ्र राखीव मध्ये नैसर्गिकरित्या आले आहेत. यावरून सह्याद्रीचा व्याघ्र भ्रमणमार्ग चांगल्या स्थितीत आहे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी अधिक अनुकूल झाला आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे तिलारी ते राधानगरी व राधानगरी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमण मार्गातील अधिवासाच्या संवर्धनाचे महत्व अधिक वाढले आहे. या व्याघ्र भ्रमण मार्गाचे अधिक उत्तम संवर्धन व संरक्षण करणे हे वनविभाग सोबत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
व्याघ्र प्रकल्प मध्ये सुरु असलेल्या उत्कृष्ट देखरेख व संरक्षण कामासाठी व ‘STR-T1’ व ‘STR-T2’ दोन्ही वाघांच्या झालेल्या नोंदीबद्दल क्षेत्रसंचालक रामानुजम यांनी सर्व क्षेत्रीय कर्मचारी व वन अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.