पिंजरा कशाला घेताय, पोपटाला पाळता येत नाही…. Bird Week / Pakshi Saptah
राजाने एक पोपट पाळला होता.. तो अतिशय बुद्धिमान होता. राजवाड्यात येणाऱ्या जाणाऱ्यांकडे त्याचे बारकाईने लक्ष असे. त्याला बोलता येतं हे फक्त राजाला माहिती असल्याने कोणी नसताना, पोपट त्याच्या राजाला दिवसभरातील सगळ्या बातम्या देत असे…
या आणि अशाच काही रंजक गोष्टींमुळे, बालगीतांमुळे आपल्याला पोपटाची ओळख होते. गावाकडे, छोट्या शहरांमध्ये आजही अनेकांच्या घरांमध्ये दिवाणखान्यात, वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोपटाचा पिंजरा अडकवलेला दिसतो. एवढंच कशाला दारातून येणाऱ्या जाणाऱ्यांची हे पोपट माणसाच्या हुबेहुब आवाजात नक्कल करतात, फिरक्याही घेतात. तर असा हा पोपट सर्वसामान्यांचा, बच्चे कंपनीचा लाडका पक्षी.
पण तुम्हाला माहिती आहे का, भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत पोपटाचा संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये समावेश होतो. त्यामुळे पोपटाला पाळणे, पिंजऱ्यात डांबून ठेवणे किंवा, त्याला रोज खायला देणे हा वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा आहे. जंगलातील पोपटांना पकडणे, त्यांची शिकार, खरेदी आणि विक्री याला मोठी दंडात्मक शिक्षा आहे. मात्र, सर्वसामान्यांना वन्यजीव कायद्यातील नियम माहिती नसल्याने अनेक ठिकाणी आजही पोपटाला मोठ्या प्रमाने पाळले जाते. काही लोक कबुतरांप्रमाणे पोपट्यांच्या थव्यांनाही दररोज ठरलेल्या वेळेत किलोभर धान्य खायला देऊन एक प्रकारे पाळण्याचा प्रयत्न करतात. भारतात पोपटाच्या विविध जाती सर्वत्र आढळतात, याती काही जाती अतिशय दुर्मिळ आहेत, तरीही त्यांच्या शिकारीही मोठ्या प्रमाणात होतात. एवढंच कशाला, पोपटांना खायला देतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरह टाकण्यासही कायद्याने बंदी आहे.
जुन्या काळचे पोस्टमन ते आजचे सैनिक
पोपटांची घटती संख्या लक्षात घेऊन गेल्या काही वर्षात वन विभाग, वन्यजीव प्राणीप्रेमी संस्था आणि निसर्गप्रेमींनी पोपटांना वाचविण्याची मोहीम सुरू केली आहे. कोणत्याही घरात, परिसरात पक्ष्यांना पाळले जात असेल किंवा त्यांची खऱेदीविक्री दिसली की लगेच वन विभागाला कळवले जाते. त्यांचे अधिकारी सुरुवातीला वन्यजीव कायद्याची माहिती देऊन समज देतात, तरीही ऐकले नाही तर त्या पक्षिप्रेमींवर कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात अनेक लोकांना वन विभागाने समज दिली आहे.
परदेशी पोपटांची विक्री कायदेशीर
भारतातील पोपटांच्या विक्रीला बंदी असली तरी परदेशी प्रकारातील म्हणजेच एक्झॉटिक वर्गात येणाऱ्या पोपटांना पाळण्यास आपल्याकडे परवानगी आहे.भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यामध्ये परदेशातील पक्ष्यांचा समावेश होत नाही, त्यामुळेच मकाऊ, काकाकुआ सारखे मोठ्या आकारातील रंगीत पोपट शहरातील, गावातील पेट शॉपमध्ये विक्रीसाठी ठेवलेले असतात. या पक्ष्यांची वेगवेगळ्या देशातून खरेदी केली जाते आणि भारतात आणून त्यांची विक्री, कित्येकदा प्रजननातून त्यांची संख्या वाढवून इतरत्र विक्रीसाठी पाठवले जातात. दुर्दैवाने ज्या भागातून त्यांना आणले तेथील पक्ष्यांची संख्या कमी होत असते, मात्र याचा विचार केलाच जात नाही.
परदेशी पक्ष्यांना आपल्याकडील नैसर्गिक अधिवासात जगणे अवघड जाते. या परदेशी पक्ष्यांना आपल्या जंगलात किंवा शहरातील झाडांमध्ये सोडले तर आपल्याकडेच शिकारी पक्षी त्यांची शिकार करतात, किंवा इतर पक्षी त्यांना चोची मारून त्रास देतात. याही पेक्षा वाईट बाब म्हणजे या परेदशी पक्ष्यांचा स्थानिक पक्ष्यांबरोबर संबंध आल्यास, त्याच्यांकडून संसर्गजन्य आजारांचा स्थानिक पक्ष्यांमध्ये प्रसार होऊ शकतो, हे सर्वाधिक धोकादायक आहे. परदेशी आजारांमुळे आपल्या पक्ष्यांना वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यामुळेच अभ्यासक परदेशी पक्ष्यांना पाळण्यास, त्यांना आपल्या पक्ष्यांच्या जवळ येऊन देण्यास विरोध करतात.
पॅरेट नव्हे हो पॅराकीट
पोपटांचे भाऊबंद हे जगभरात आढळतात. आपल्याकडे दिसणाऱ्या पोपटांना इंग्रजीत पराकिट म्हणतात. परदेशातील विशेषतः अमेझॉनच्या खोऱ्यात आढळणाऱ्या पोपटांना इंग्रजी पॅरट हे नाव आहे. अनेकदा सर्वसामान्य माणसं आपल्या पोपटांना पॅरट म्हणून मोकळे होतात. शास्त्रीय भाषेत पोपटांच्या सिटॅसिफॉर्मिस या कुळात तब्बल ८२ प्रजाती आणि साडे तीनशेहून अधिक उपजाती आढळतात. पोपटांचा जन्म ऑस्ट्रेलियन प्रदेशात झाला असावा, असा काही अभ्यासकांचा दावा आहे. या भागात पहिल्यांदा सापडलेले पोपटांचे जीवाश्म हे फ्रान्समधील असून ते दीड कोटी वर्षांपूर्वींचे आङेत. दक्षिण अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पोपटाच्या सर्वाधिक जाती आढळतात. आकारानुसार पोपटांचे वेगवेगळे प्रकार पडतात.
भारतात मोठ्या पोपटांच्या तेरा जाती आढळतात. यातील चार जाती सगळीकडेच दिसतात. यातील कातरा पोपट हा देशात आढळणारा सर्वात लहान तर राघू हा सर्वात मोठा पोपट. आपल्याकडे दिसणाऱया पोपटांच्या प्रकारातील लालडोकी पोपट आणि नीलपंखी पोपट हे दोन देखणे पक्षी. पोपट मुख्यतः शाकाहारी आहेत. कधी कधी काही पोपट किडे खातात. झाडांना लगडलेली सर्व प्रकाराची लहान मोठी फळे हेच त्यांचे खाद्य. विशेष म्हणजे कठीण कवच असलेले फळही ते खुबीने चोचीने फोडतात. त्यातील गर खातात. पोपटाने खालेले फळ नक्कीच गोड, रसदार असणार असे गावकरी म्हणतात. काही पोपट फुलांमधील मकरंदही शोषून घेतात. पोपट हा समुहप्रिय पक्षी आहे. त्यामुळे ते समुहाने राहतात. संध्याकाळी आकाशात अनेकदा पोपटांचा थवा उडताना दिसतो. पोपट सतत बडबड करत असतात. घराजवळच्या झाडांत यांचा थवा आला तर खूप गोंगाट जाणवतो. पाळलेल्या पोपटांना योग्य प्रशिक्षण दिले तर ते काही शब्द माणसासारखे उच्चारतात. छोटी वाक्यही त्यांना बोलता येतात. इतर पक्ष्यांच्या आवाजाचीही ते नक्कल करतात. त्यामुळेच अनेकांना त्यांना पाळण्याचा मोह होतो.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com