Dicliptera Polymorpha वणव्यांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा फुलणाऱ्या नव्या वनस्पतीचा शोध.
वणव्यांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा फुलणाऱ्या नव्या वनस्पतीचा तळेगावच्या कुरणांमधून शोध. Dicliptera Polymorpha

महाराष्ट्राच्या गवताळ कुरणांना लागणाऱ्या वणव्यात बहुतांश वनस्पती भस्मसात होत असताना त्या वणव्यांमध्ये तगून राहणाऱ्या आणि आगीचा प्रकोप शमल्यानंतर पुन्हा फुलणाऱ्या नव्या वनस्पतींचा शोध नुकताच संशोधकांनी लावला आहे. तळेगाव स्थित वनस्पती अभ्यासक आदित्य धारप आणि पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेमधील डॉ. मंदार दातार आणि भूषण शिगवण यांनी ‘डिक्लीप्टेरा पॉलीमॉर्फा’ Dicliptera Polymorpha नावाची ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती नुकतीच पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे जवळच्या गवताळ कुरणांमधून शोधली आहे. याविषयीचा त्यांचा रिसर्च पेपर इंग्लंड येथून प्रकशित होणाऱ्या ‘क्यू बुलेटिन’ नावाच्या संशोधन नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला. लंडनच्या क्यू बॉटॅनिक गार्डन, येथील जागतिक कीर्तीचे वनस्पती तज्ज्ञ डॉ. आयेन डर्बीशायर यांनीही या वनस्पतीच्या नवे असण्याला दुजोरा दिला आहे.

‘डिक्लीप्टेरा पॉलीमॉर्फा’ ही वनस्पती आगीशी सामना करुन जिवंत राहणार्‍या काही निवडक वनस्पतींपैकी आहे. इंग्रजीत या वैशिष्ठ्याला ‘पायरोफायटिक’ Pyrophytic असे म्हणतात. आफ्रिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानी, गवताळ प्रदेशात आगीच्या प्रकोपानंतर फुलोर्‍यावर येऊन, आगीनंतरच्या परिस्थितीचा स्वतःच्या फायद्या करिता उपयोग करुन घेणार्‍या अनेक वनस्पती आढळतात. मात्र भारतातून आणि नोंदली गेलेल्या थोड्याच वनस्पतींपैकी ही एक आहे. ‘पायरोफायटिक’ प्रकारातल्या या वनस्पती फुलण्यासाठी किंवा बीजप्रसारासाठी पूर्णपणे आगीवर अवलंबून असतात. मात्र ‘डिक्लीप्टेरा पॉलीमॉर्फा’ फुलण्यासाठी पूर्णपणे आगीवर अवलंबून न राहता आगीनंतरच्या परिस्थितीचा स्वतःसाठी फायदा करुन घेते. ह्या वनस्पतीचे फुलण्याचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात पावसानंतर साधारण नोव्हेंबर महिन्यात ही पहिल्यांदा फुलायला लागते. हिवाळा सरता सरता अनेक ठिकाणी स्थनिकांकडून किंवा शिकार्‍यांकडून वणवे लावले जातात. अशावेळी या वणव्यात बहुतांश गवते, झुडुपे पूर्णतः जळून जातात. अशा परिस्थितीत ‘डिक्लीप्टेरा पॉलीमॉर्फा’ चे अस्तित्व निव्वळ जमिनीखाली असणार्‍या जाडजूड मुळापुरतेच शिल्लक राहते.

हेही वाचा: एकदांडीला वाचविण्यासाठी एकवटले निसर्गप्रेमी

बर्‍याच वनस्पती अशा वणव्यांनंतर पावसाळ्याच्या पहिल्या सरींची वाट बघत निद्रितावस्थेत जातात. मात्र ‘डिक्लीप्टेरा पॉलीमॉर्फा’ ला अशा आगीच्या प्रकोपानंतर काहीच दिवसात एप्रिल – मेच्या दरम्यान परत नवीन धुमारे फुटतात. हे धुमारे बर्‍याचदा फक्त फुले असणारे अत्यंत केसाळ पुष्पदंड असतात. आगीनंतर मोकळ्या झालेल्या आसमंतचा, मुबलक उपलब्ध झालेल्या पोटॅश खताचा आणि परागीभवन करणार्‍या कीटकांना सहज आकर्षून घेता येईल अशा परिस्थितीचा हिला फायदा होतो. या स्थितीत फुलांचे पटकन परागीभवन होते आणि पावसाळ्याच्या आधी बीजप्रसार देखील होतो. पावसाळा सुरू झाला की हे बुटके फुटवे लुप्त होतात आणि पावसाळ्यात नवीन मोठे नेहमीचे फुटवे येतात आणि आणि चक्र असेच चालू राहते. भारतात आढळणार्‍या ‘डिक्लीप्टेरा’ च्या कुठल्याच प्रजातीत अशा प्रकारचे दोनदा फुलणे आजवर नोंदले गेले नाही. मात्र आफ्रिकेतल्या काही ‘डिक्लीप्टेरा’ च्या दोन – तीन जाती मात्र आगीनंतर फुलतात. त्यामुळे आफ्रिका खंडातल्या ‘डिक्लीप्टेरा’ प्रजातींशी नाते सांगणारी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती ठरते.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!