चंद्रपूर: ३५ व्या पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन चंद्रपूर शहरात येत्या ११ व १२ मार्च रोजी वन अकादमी परिसरातील ‘प्रभा’ हॉल मध्ये करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहे. यावेळी पक्षी छायाचित्र प्रदर्शनाचे सुध्दा उद्घाटन करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील पक्षी अभ्यासक, तज्ञ एकत्रीत येणार आहेत. पक्षिमित्रांचा अभ्यास, संशोधन यावर सादरिकरण, व्याख्याने होणार असून या शिवाय पक्षिनिरीक्षणांचा कार्यक्रम असेल.
पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन जिल्हयातील पर्यावरण क्षेत्रातील कार्यरत इको-प्रो संस्थेने केले असुन, सह आयोजक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व चंद्रपूर वनविभाग आहे. चंद्रपूर जिल्हयातील ‘वरोरा’ तालुक्यात अस्तित्व असलेले संकटग्रस्त अशा ‘माळढोक’ पक्ष्याचे भविष्यातील संवर्धन तसेच जुनोना परिसरातुन शेवटचा ‘सारस’ पक्षी सुध्दा संपुष्टात आल्याने येथील सारस अधिवास संवर्धन यावर या संमेलनात प्रामुख्याने चर्चा होणार आहे. याकरीता ‘माळढोक व सारस’ पक्षी यावर अभ्यास असणारे तज्ञ, मार्गदर्शक यांचे सादरीकरण व अभ्यास मांडण्यात येणार आहे. सोबतच राज्यातील पाणस्थळ, रामसार दर्जा स्थळ, माळरानातील पक्षी, विवीध जलाशयावर येणारे स्थंलातरीत पक्षी, वन्यपक्षी, पक्षी अधिवास संरक्षण व संवर्धनाविषयी महत्वपुर्ण मांडणी येणारे पक्षीमित्र करणार आहे.
हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया
३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्षपद राजकमल जोब भूषावणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या सहा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, तसेच पक्षी विषयक पुस्तके प्रकाशित होणार आहेत. शिवाय, पर्यावरण अभ्यासक किशोर रिठे यांची प्रकट मुलाखत होईल, ही मुलाखत पर्यावरण कार्यकर्ते स्वानंद सोनी घेणार आहे.
संमेलनादरम्यान ‘माळढोक’ पक्षी यावर वाईल्डलाईफ इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाचे डॉ. सुतीर्था दत्ता, अहमदनगरहुन डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, डॉ. अनिल माळी, डॉ अनिल पिंपळापुरे आदि मान्यवर चर्चासत्रात सहभागी होतील. सोबतच ‘सारस’ पक्षी यावरभंडारा-गोंदिया चे मुंकुंद धुर्वे, सावन बाहेकर व रवी पाठेकर चर्चासत्रात सहभागी होतील. याशिवाय पक्षी छाायाचित्रण संरक्षण व जनजागृती, वन्यपक्षी, पाणस्थळ, रामसार स्थळ, माळरानातील पक्षी यावर सुध्दा सादरीकरण व चर्चासत्र होणार आहे.
हेही वाचा: माळढोक वाचविण्यासाठी BREEDING CENTER
यावेळी पक्षी छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार असुन यात अनेक पक्षी व पक्षी अधिवासाची छायाचित्रे प्रदर्शीत केली जाणार आहे. यासोबतच ‘पक्षी छायाचित्र स्पर्धा’ सुध्दा आयोजीत करण्यात आलेली असुन राज्य व राज्याबाहेरून सहभाग घेतलेल्या स्पर्धकांची पक्षी छायाचित्रे सुध्दा या प्रदर्शनात बघायला मिळतील. संमेलनात राज्यभरातुन येणारे जवळपास तिनशे पक्षिमित्र निवासी असणार आहे. या संमेलनात चंद्रपूर शहरातील पर्यावरण प्रेमी, पक्षी अभ्यासक विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.