गोवळ – बारसु – पन्हाळे – सोलगाव – देवाचे गोठणे
हा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र बनण्याची क्षमता असलेला प्रदेश. आणि हो हा आमचा नुसता वाचाळपणा नाही की पोकळ आश्वासने. त्याला आमच्या कृतीची जोड दिली आहे. गेल्या काही वर्षात आमच्या कृतीला पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला आहे. हजारो पर्यटकांनी या प्रदेशातील अनेक ठिकाणांना भेट दिली आहे / देत आहेत. अनेक लोकांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. येथील ग्रामस्थांची सुयोग्य साथ मिळाल्यास आम्ही म्हणतो ती गोष्ट अजिबात लांब नाही.
असे काय आहे या प्रदेशात ??
कोकणात सडा म्हंटले तर डोळ्यासमोर उभे रहाते ते वैराण, रखरखीत भूप्रदेशाचे दृश्य. सरकारी दप्तरी अकारण बॅरन लँड म्हणून संबोधला गेलेले कातळपड आणि पोटखराबा क्षेत्र. कोकणातील सडा आजूबाजूच्या प्रदेशाचे अर्थकारण बदलू शकेल ? आपला विश्वास बसणार नाही. पण त्याचे उत्तर आहे होय. याचे कारण आपण ह्या सडयांकडे खऱ्या अर्थाने कधी पाहिलेच नाही .
जांभा खडकांचे कातळ सडे हे दक्षिण कोकणाचे खास वैशिष्ट्य . या सड्यांपैकी स्वतःचे वेगळेपण जपणारा सडा म्हणजे राजापूर तालुक्यातील बारसु, गोवळ, देवाचे गोठणे , सोलगाव परिसरातील सडा.
कोकणातील जांभा दगडाचा Laterite विशेषतः इथला दुय्यम (secondary) जांभ्याने बनलेला जांभा पठाराचा भाग अनेक दृष्टीने वेगळा आहे. कोकणच्या भूशास्त्रीय आणि सागर पातळीतील बदलांच्या इतिहासाच्या संदर्भात राजापूरच्या या सड्याला वेगळेच महत्व आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ह्या सड्याचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे द्वितीयक जांभा दगडाचा सर्वाधिक जाड थर या सड्याला लाभला आहे . जांभा दगडाचा एवढा जाड थर भारतात अन्यत्र कोठेही आढळून येत नाही . निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच असलेला हा सडा आपल्या पोटात मुबलक भूजल साठे बाळगून आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारसु, सोलगाव या गावातून वाहणारे बारमाही ओढे.
दक्षिणेकडे राजापूर , पन्हाळे , गोवळ तर नैऋत्य, वायव्येस देवाचे गोठणे, उत्तर दिशेस सोलगाव ही गावे या सड्याच्या कुशीत वसली आहेत. या सड्यावरील मध्य भागात बारसु हे गाव वसले आहे. त्या त्या गावाच्या नजीकच्या सड्याला त्या गावच्या नावाने ओळखले जाते. वैशिष्ट्यपूर्ण अशा या भूप्रदेशातील देवाचे गोठणेच्या गावच्या सड्यावर आश्चर्यचकित करून सोडणारी गोष्ट आढळून येते.
सुमारे 500 चौरस मीटर परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई अयोग्य दिशा दर्शन करते. जणू निसर्गातील चमत्कारच . ह्या गोष्टीला ‘चुंबकीय विस्थापन’ असे म्हणतात. ज्ञात माहिती नुसार द्वितीयक जांभा दगडात मोठ्या प्रमाणांत चुंबकीय विस्थापन दर्शविणारी ही जगातील एकमेव जागा आहे. विस्तीर्ण परिसरात एका ठराविक भागात आढळून येणारे हे निसर्ग नवल प्रत्येकाने नक्कीच अनुभवावे असेच आहे.
या संपूर्ण सड्यावर अष्मयुगीन मानव निर्मित कातळ खोद चित्ररूपी नवलाचा खजिना Petroglyphs / Geoglyphs मोठ्या प्रमाणात आढळून येतो . सुमारे ६० चौरस किमी क्षेत्रफळाच्या या सड्यावर विविध ठिकाणी सुमारे १६० पेक्षा अधिक कातळ खोद चित्र आढळून येतात. या चित्रांमध्ये वैविध्य आढळून येते. बारसु – पन्हाळे भागात ६० पेक्षा अधिक चित्र रचना आहेत. या चित्ररचनांमध्ये प्राणी, पक्षी, जलचर यांसोबत काही भौमितीक रचनांचे समूह आढळून येतात. या भागातील तारवाच्या सडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आशिया खंडात आढळून येणाऱ्या सर्वात मोठ्या खोद चित्र रचनांपैकी एक चित्ररचना आढळून येते. तब्बल ५७ फूट लांब व १४ फूट रुंदीची ही रचना. एका नजरेत या रचनेचा वेध घेणे अवघडच. याच भागात थोड्या दूर असलेल्या भौमितिक रचना आपल्या तर्कशक्तीला आव्हान देतात.
गोवळ परिसरातील सड्यावर सुमारे ४५ पेक्षा अधिक चित्र रचनांचा समूह आहे. प्राणी पक्षी, भौमितिक रचना यांनी हा परिसर व्यापलेला आहे.
सोगमवाडी , सोलगाव या गावांच्या सड्यावरील चित्र रचनांमध्ये मोठ्या आकाराच्या प्राण्यांचे दर्शन होते .येथील रचना वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. या चित्र रचनांमधील गवा रेडा, हत्ती, एक शिंगी गेंडा यांच्या रचना तत्कालीन कालखंडातील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानावर यांच्या भाष्य करण्यास पुरेशी बोलकी आहेत. या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ३० पेक्षा अधिक खोद चित्र रचना आढळून येतात.
देवाचे गोठणे या गावाच्या सड्यावर विविध ठिकाणी मिळून १० पेक्षा अधिक रचना आहेत. त्यात काही मनुष्याकृती कोरल्याचे दिसून येते. त्याच बरोबर येथे सड्याचा जडघडणीचे साक्षीदार असलेले लाखो वर्षांपूर्वीचे जिवाष्म देखील आढळून आले आहे .
हजारो वर्षांचा मानवाचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या या रचना आणि आपल्या अंगावर या रचना बाळगणारा सडा भारत देशाचा आणि एकूणच मानवी उत्क्रांतीचा खूप मोठा सांस्कृतिक ठेवा आहे.
वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपले वेगवेगळे रूप दाखविणारा हा सडा पावसाळ्यात वेगळेच रूप धारण करतो. सड्यावर पाण्याची लहान मोठी तळी निर्माण होतात. जवळपास ३० पेक्षा अधिक गवताच्या प्रजाती आणि १५० पेक्षा अधिक प्रजातींच्या रंगीबेरंगी कातळ फुलांनी हा परिसर खुलून जातो. हे सौन्दर्य अनुभवताना आपण भारावून जातो. सड्यावर वरची ही एक आगळी वेगळी परिसंस्था आहे. ही परिसंस्था आजूबाजूच्या फळांच्या बागा, शेती यासाठी पूरक आणि अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
या सड्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अनेक ठिकाणी शेती योग्य भागांची निर्मिती झाली आहे . पशुपालन करणाऱ्या माणसांसाठी हा सडा तर अत्यंत महत्वाचा आहे. याठिकाणी गेल्या काही वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणत शेती केली जात होती. त्याचप्रमाणे या सड्याचा कुशीतून वाहणारऱ्या खाडी किनारी असणारा प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण पिकांसाठी ओळखला जातो. गोवळची वांगी खूप प्रसिद्ध आहेत. या गावातून येणाऱ्या दिवसाच्या पहिल्या बस ला वांगी एक्सप्रेस नावाने ओळखले जाते. गावातील भाजी वरून बस सेवेला पडलेले हे नाव दुर्मिळच म्हणावे लागेल.
उन्हाळ्याच्या दिवसात रखरखीत भासणाऱ्या दक्षिण कोकणातील सड्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. पावसाचे पडणारे अधिक तर पाणी हे सडे आपल्या पोटात सामावून घेतात. आणि हे पाणी पुढे जवळपास वर्षभर सड्याचा कुशीतील गावांची पाण्याची तहान भागवतात. सड्यांवर मातीचे प्रमाण कमी असले तरी सड्यांच्या उताराच्या बाजूंवर मात्र मिश्र जंगले आढळून येतात. या जंगलांची जागा आता आंबा काजूच्या बागांनी घेतली आहे. राजापूरच्या या भागात देखील खूप मोठ्या प्रमाणात आंबा काजूच्या बागा आहेत . या बागांचे उत्त्पन्न प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या परिसरातील सड्यांवरील परिसंस्थेवर अवलंबून आहे हे दुर्लक्षून चालणार नाही.
हेही वाचा: कासवांसाठी लढणारे भाऊ काटदरे
सह्याद्री मध्ये उगम पावून पश्चिमेकडे वाहणारी अर्जुना नदी , राजापूर शहरापासून पुढे राजापूरची खाडी हे नाव धारण करते. ही खाडी बारसु- पन्हाळे सड्याचा दक्षिण कुशीतून वाहत देवाचे गोठणे भागात झोकदार वळण घेत उत्तर दिशेकडे वळते. ( कोकणातील खाड्यांचे हे अजून एक वैशिष्ट्य ) पुढे जैतापूर जवळ परत एकदा पश्चिमेकडे वळत आंबोळगड जवळ समुद्राला मिळते. राजापूर लॅटेराईट सरफेस नावाने भौगोलिक भाषेत ओळखल्या जाणाऱ्या या सड्याचा कुशीत वसलेले राजापूर हे इतिहास काळात एक महत्वाचे व्यापारी बंदर होते. याच कारणाने या सड्याचा कुशीत अनेक ऐतिहासिक बाबी पहावयास मिळतात. राजापूरची गढी, राजापूर बंदर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. धबधब्याच्या शेजारी असलेले ४०० वर्षांचा इतिहास लाभलेले धुतपापेश्वर मंदिर आणि परिसर आपल्याला एक वेगळी अनुभूती देऊन जातो. मध्ययुगीन भार्गवराम मंदिर – देवाचे गोठणे इत्यादी.
सड्यावरील विस्तीर्ण रानमाळ , सड्याच्या उतारावरील मिश्र जंगल, कुशीत वाहणारी अर्जुना नदी / राजापूरची खाडी , या सड्याचा मधोमध दोन भाग करणारा बारसु जवळील खोलगट भाग , तिथून वाहणारा बारमाही वहाळ या परिस्थितीमुळे संमिश्र परिसंस्था या परिसरात पहावयास मिळते. सुमारे १५० पेक्षा अधिक विविध जाती प्रजातींचे पक्षी, सुमारे ४० पेक्षा अधिक प्राणी तेवढ्याच संख्येने आढळून येणारे सरीसृप या परिसराची जैवविविधता परिपूर्ण करतात.
जगाच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ अशी सुमारे 160 पेक्षा अधिक अष्मयुगीन कातळ खोद चित्र, धोपेश्वर मंदिर, भार्गवराम मंदिर, पाखड्या यांसारख्या ऐतिहासिक वास्तू, खाडीतील जावे बेट , अमाप निसर्ग सौन्दर्य, सुमारे 10 किमी लांबीची खाडी याबाबी पर्यटन क्षेत्राचे अनेक पैलू उलगडतात.
वारसा पर्यटन, निसर्ग पर्यटन, जल पर्यटन, साहसी पर्यटन, अशी अनेक पर्यटनाची दालने या परिसरात सामावलेली आहेत. पर्यटन विषयावर आधारित खुले आकाश दर्शन , प्री हिस्टोरीक पार्क, फळ प्रक्रिया केंद्र असे अनेक प्रकल्प या भागात उभे राहू शकतात. शेती आणि बागायती यांना कृषी पर्यटनाची जोड देणे शक्य आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि आर्थिक उलाढाल निर्माण होऊ शकते.
यासाठी काय करावयास हवे , सड्यावरील वारसा स्थळात समाविष्ट होणारी कातळ खोद चित्र ठिकाणे एकमेकाला सुयोग्य मार्गाने जोडणे. ही चित्र ठिकाणे एकमेकाला जोडणे म्हणजे गोवळ, देवाचे गोठणे, सोलगाव, सोगमवाडी आणि राजापूर ही गावे एकमेकाला कमी अंतराने जोडणेच आहे. त्याचा फायदा फक्त खोद चित्र रचनांना नाही तर परिसरातील सर्व गावांना होऊ शकेल. सड्यावरील शेती, बागायती यांना खूप मोठा उपयोग होऊ शकेल. पर्यटकांना सर्व ठिकाणी जाणे सहज शक्य होईल. याचाच वापर सायकलिंग ट्रॅक म्हणून सुद्धा होऊ शकेल ही बाब पर्यटकांना आकर्षित करणारी आहे. या मार्गाच्या बाजूने विशिष्ठ प्रकारची झाडे लावल्यास , हा मार्ग पहाण्यासाठी देखील पर्यटक येउ शकतील. चित्रपट माध्यमांना देखील पुरेसा लँडस्केप या परिसरात आहे.
भाई रिसबुड
कृषी पर्यटन, होम स्टे , तंबू निवास यांसारख्या बाबीना प्राधान्य देउन आलेल्या अभ्यागतांची निवास व्यवस्था निर्माण करता येउ शकेल. त्याचा फायदा निश्चितच स्थानिकांना होईल. स्थानिक कला, खाद्य संस्कृती यांना चालना मिळेल. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने रोजगार निर्माण होईल. प्रत्येक हातात काम करण्याची आणि स्वरोजगार निर्मितीची संधी यामध्ये सामावलेली आहे. अर्थात त्याचा सकारात्मक परिणाम परिसरातील अर्थव्यवस्थेवर होईल यात शंका नाही.
हा परिणाम घडविण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिकांची मनोभूमिका आणि सहकार्य. जे आहे तसे जपण्याची तयारी. डेव्हलमेंट सारख्या जडजड शब्दाच्या मागे न धावता पूरक गोष्टींची निर्मिती. नियमांच्या गुंतवळ्यात न अडकता प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्ती आणि स्थानिकांना सोबत घेत काम करण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका. या गोष्टी घडल्या तर हा परिसर महाराष्ट्रातील एक सर्वात मोठे पर्यटन स्थळ बनेल यात शंका नाही. यातून पर्यावरण व परिसंस्थेचे रक्षण होईलच आणि शास्वत विकासाची कासही धरता येईल. यातून या परिसराचे अर्थकारण पालटून जाईल.
तसे पहाता पूर्णगड ते राजापूर ह्या भागाकडे सांस्कृतिक वारसा जतन करणारा एक विलक्षण भूशास्त्रीय प्रदेश म्हणूनच बघणे इष्ट आहे. भारतातील एक मोठे पर्यटन क्षेत्र बनण्याची क्षमता या परिसरात आहे. या बाबींचा आदर राखत पर्यावरण पूरक विकासाच्या संकल्पना राबविणे गरजेचे आहे.
हेही वाचा: विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या ‘टू द स्केल’ प्रतिकृती
निसर्गयात्री संस्था सदस्यांच्या शोध कार्यातून आणि चालू असलेल्या कामातून आज हजारो पर्यटकांनी या परिसराला भेट दिली आहे देत आहेत. यात परदेशी पर्यटकांचा, अभ्यासकांचा देखील आहेत ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. संस्था सदस्यांच्या कामातून या परिसराची ओळख जगाला झाली आहे. आणि यासाठी संस्था सदस्य स्वखर्चाने अविश्रांत मेहनत घेत आहेत. यांच्या प्रयत्नांना साथ देउन पर्यावरण पूरक शास्वत पर्यटन विकास साधायचा का ?
वारसा आणि निसर्ग स्थळांचा आदर राखून त्याला पर्यटन क्षेत्राची जोड देत आर्थिक विकास साधणारी अनेक उदाहरणे आज आपल्या डोळ्यासमोर आहेत. अर्थात तिथल्या बाबींचे अंधानुकरण करणे देखील योग्य नाही. आपल्या परिसराचा परिपूर्ण अभ्यास करून त्याला पूरक गोष्टी राबविणे गरजेचे आहे.
हा सडा येथील परिसरातील अर्थकारण बदलण्याची क्षमता बाळगून आहे. गरज आहे ती दृष्टीकोनाची .
सुधीर ( भाई ) रिसबुड, रत्नागिरी
9422372020 / 9423297736
( लेखक स्वतः कोकणातील कातळ खोद शिल्प शोधकार्य अभ्यासक आहेत. त्यांनी श्री धनंजय मराठे आणि डॉ सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्या सोबत ७२ गावातून १५०० पेक्षा अधिक कातळ खोद शिल्प रचनांचा शोध घेतला आहे. त्याच बरोबर निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून दोन ठिकाणी पर्यटन प्रकल्प उभारण्याचे कामही हाती घेतले आहे. या सर्व बाबींसाठी अल्प अपवाद सोडल्यास कोणतीही मदत अभ्यासक तसेच संस्थेला मिळालेली नाही.)
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.