हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीचे साक्ष देणारे किल्ले विजयदुर्ग Fort Vijaydurg व किल्ले सिंधुदुर्ग Fort Sindhudurg यांच्या ‘टू द स्केल’ प्रतिकृतींचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते नुकतंच सिंधुदुर्गमध्ये करण्यात आले. ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ’ या राज्यातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्थेने हाती घेतलेल्या किल्ल्यांच्या ‘टू द स्केल’ प्रतिकृती बनविण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत.
सांगली येथील श्री. रमेश बलूरगी यांनी या दोन्ही प्रतिकृती गेली वर्षभर काम करून बनविल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्यावेळी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष ऋषिकेश यादव, सचिव डॉ. राहुल वारंगे, सिंधुदुर्ग जिल्हा माउंटनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश नारकर, रत्नागिरी जिल्हा माउंटनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष विरेंद्र वणजू, एव्हरेस्ट शिखरवीर व जेष्ठ गिर्यारोहक भूषण हर्षे, रत्नागिरीचे जेष्ठ गिर्यारोहक राजेश नेने उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे पदाधिकारी डॉ. कमलेश चव्हाण, ज्योती बुआ, राजेंद्र परुळेकर, जानराव धुळप याप्रसंगी उपस्थित होते.
हेही वाचा: कासवांसाठी लढणारे भाऊ – BHAU KATDARE
याप्रसंगी बोलताना डॉ. भागवत म्हणाले, “किल्ले हि आपली स्फूर्तिस्थाने आहेत. किल्ले पाहणे, त्यांचा इतिहास जाणून घेणे हे सर्व प्रेरणादायी आहे. यासंदर्भात महासंघ जे काम करत आहे ते प्रशंसनीय आणि अभिमानास्पद आहे आणि हे कार्य असेच सुरु राहावे यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अविभाज्य भाग असलेल्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे. यासाठी विविध उपक्रम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघामार्फत राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून विविध किल्ल्यांच्या ‘टू द स्केल’ प्रतिकृती तयार करण्यात येत असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या प्रतिकृती संग्रहालयात मांडण्यात येणार आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला अभिनव पद्धतीने उजाळा देण्याचा मानस आहे.
किल्ले विजयदुर्ग व किल्ले सिंधुदुर्ग यांच्या प्रतिकृती या स्थापत्यशास्त्रातील मानकांप्रमाणे अत्यंत हुबेहूब बनविण्यात आल्या असून मूळ किल्ल्यावर पडझड झालेली असताना सदर भाग शाबूत असताना कसा असेल, याचा शास्त्रीय विचार करून प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. या प्रतिकृती महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये लवकरच पोहोचविण्यात येणार आहेत.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.